अमीर सुहेल वानी
भारताचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे इथली मिळून-मिसळून राहण्याची वृत्ती. एकमेकांना सामावून घेणं आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदणं हा तर आपल्या मातीचा गुणच आहे. याच भावनेचं सर्वात देखणं रूप म्हणजे आपली गंगा-जमुनी तहजीब. उत्तर भारतातल्या ज्या प्रदेशातून गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संगम होतो, तिथूनच हा शब्द रूढ झाला. पण आज हा केवळ एक शब्द राहिला नसून ती आपल्या जगण्याची रीत बनली आहे. हिंदू-मुस्लीम परंपरा आणि भारतीय अध्यात्माचा वारसा जेव्हा दुधात साखरेसारखा मिसळला, तेव्हा त्यातून ही एक समृद्ध संस्कृती आकाराला आली. हे केवळ एखादं तत्वज्ञान नाही, तर तो एक जिवंत अनुभव आहे, जिथे लोक कसलाही संकोच न बाळगता आपापल्या श्रद्धेसह एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होतात.
या संस्कृतीच्या मुळाशी केवळ कर्मकांडं नसून अध्यात्माचा एक मोठा आधार आहे. शतकानुशतके शेजारी म्हणून राहताना, व्यापाराच्या निमित्ताने किंवा कला-संगिताच्या माध्यमातून हा वारसा नैसर्गिकरीत्या बहरत गेला. यात राजा-महाराजांपेक्षा सुफी संत, कवी, कारागीर आणि सामान्य माणसांचा वाटा जास्त मोठा आहे. विशेषतः भक्ती आणि सुफी परंपरेने या संस्कृतीला नवसंजीवनी दिली. दोन्ही बाजूंनी कर्मकांडापेक्षा ईश्वरावरच्या प्रेमाला आणि बाह्य ओळखीपेक्षा माणसाच्या आंतरिक बदलाला जास्त महत्त्व दिलं. संत कबीरांसारख्या महात्म्यांनी तर साध्या भाषेत संकुचित धार्मिकतेवर कोरडे ओढले आणि 'माणुसकी' हाच खरा धर्म असल्याचं सांगितलं. सुफी संतांच्या दर्ग्यांमध्येही सर्वधर्मीयांचं स्वागत झालं, जिथे जात-पात न मानता सर्वांनीच नतमस्तक व्हायचं ठरवलं.
आपलं हे सहजीवन केवळ बोलण्यात नाही, तर आपल्या भाषेत, कलेत आणि वास्तुकलेतही स्पष्ट दिसतं. हिंदुस्तानी ही भाषा म्हणजे संस्कृत, पर्शियन आणि अरबी अशा अनेक भाषांच्या मेळातून तयार झालेला एक सांस्कृतिक पूल आहे. गझल असो किंवा भजन, कव्वाली असो किंवा भक्तीगीतं, यात आपल्याला एक सामायिक सूर ऐकायला मिळतो. शास्त्रीय संगीतातही हिंदू-मुस्लीम कलाकारांनी एकमेकांच्या साथीने अनेक राग समृद्ध केले. अगदी मुस्लीम कवींनी कृष्णावरच्या लावण्या-रचना केल्या, तर हिंदू गायकांनी मोठ्या भक्तीने सुफी कलाम गायले.
वास्तुकलेतही हाच मेळ दिसतो. दिल्ली, आग्रा, लखनौ या शहरांतल्या इमारतींकडे पाहिलं की लक्षात येतं, तिथले घुमट, कमानी आणि नक्षीकाम हे पूर्णपणे परदेशी नाही आणि पूर्णपणे देशीही नाही, तर ते अस्सल भारतीय आहे.
मोठ्या कलाविष्कारांपेक्षाही आपली रोजची वागणूक या संस्कृतीची साक्ष देते. दिवाळीला दिवे लावणं, ईदला शिरखुर्मा खाणं किंवा सुफी संतांच्या उर्समध्ये उत्साहाने सामील होणं, हे आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनलं. खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते कपड्यांच्या फॅशनपर्यंत आपण एकमेकांकडून बरंच काही घेतलंय. अध्यात्मिक पातळीवरही ही संस्कृती आपल्याला सांगते की, सत्य एकच असतं, फक्त त्याच्याकडे जाण्याचे मार्ग वेगळे असू शकतात. या विचारामुळे एकमेकांच्या श्रद्धेबद्दल आदराची भावना निर्माण झाली.
लखनौची नजाकत असो किंवा दख्खनची संस्कृती, काश्मीर-पंजाबमधल्या लोकपरंपरा असोत की बंगालचं साहित्य, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला 'एकमेकांत मिसळलेला' हा समाज दिसतो. पण आजच्या धावपळीच्या आणि शहरी वातावरणात हा गंगा-जमुनी वारसा कुठेतरी काचेसारखा नाजूक झाला आहे. संकुचित ओळखीच्या राजकारणात आपण पूर्वी सहजपणे जपत असलेलं हे सहजीवन आता धोक्यात येत आहे. ही हानी केवळ सामाजिक नसून ती आपल्या मूल्यांची हानी आहे. कारण याच संस्कृतीने आपल्याला संयम आणि दुसऱ्याच्या श्रद्धेतही देवाचं रूप पाहण्याची दृष्टी दिली होती.
या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे केवळ जुन्या आठवणी काढणं नव्हे, तर एकमेकांना समजून घेणारी मनं पुन्हा तयार करणं आहे. यात संगीत, साहित्य आणि कला मोठी भूमिका बजावू शकतात. कबीराचे दोहे किंवा अमीर खुस्रोची गाणी आजही सर्व सीमा ओलांडून आपल्याला एकत्र आणतात. एकमेकांच्या पवित्र जागांना आदराने भेट देणं आणि सण-उत्सव एकत्र साजरे करणं, हाच विश्वासाचा 'दुवा' पुन्हा जोडण्याचा मार्ग आहे.
शेवटी, गंगा-जमुनी तहजीब म्हणजे मानवाच्या अशा एका प्रवासाचं नाव आहे, जिथे विविधता ही अडचण नसून ती आपली ताकद आहे. गंगा आणि यमुना जेव्हा एकत्र मिळतात, तेव्हा त्या आपली ओळख हरवत नाहीत, तर त्या एका मोठ्या आणि सुपीक प्रवाहाची निर्मिती करतात. भारताची ही संमिश्र संस्कृतीही अशीच आहे. ध्रुवीकरणाच्या आजच्या जगात, ही संस्कृती आपल्याला आठवण करून देते की नम्रता आणि दुसऱ्याबद्दलचा आदर ही आपली कमजोरी नसून ती आपल्या सुसंस्कृतपणाची ओळख आहे. हा वारसा टिकवणं ही आजच्या काळाची गरज आहे, कारण जिथे दोन विचारधारांचा संगम होतो, तिथेच खऱ्या सौंदर्याचा जन्म होतो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -