'विकसित भारत' आणि 'मिशन २०४७' या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेली 'मुस्लीम महिला बुद्धिवंत परिषद' केवळ एका चर्चासत्रापुरती मर्यादित न राहता, ती राष्ट्र, समाज आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यावर मंथन करणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरली. नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडलेल्या या मेळाव्यात देशहितासाठी अनेक महत्त्वपूर्ण संकल्प सोडण्यात आले.
या परिषदेत देशभरातील सुमारे १०० सुशिक्षित, जागरूक आणि आत्मविश्वासी मुस्लीम महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता, ज्यांनी राष्ट्र उभारणीसाठी आपली स्पष्ट कटिबद्धता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक डॉ. इंद्रेश कुमार यांनी भूषवले.
यावेळी शिक्षण मंत्रालयाच्या ‘NCMEI’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. शाहीद अख्तर, जामिया हमदर्द विद्यापीठाचे कुलसचिव कर्नल ताहिर मुस्तफा, ज्येष्ठ पत्रकार नघ्मा सहर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शालिनी अली, वक्फ बोर्डाच्या सदस्या सबिहा नाझ, डॉ. शाइस्ता आणि डॉ. असरा अख्तर यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
परिषदेला संबोधित करताना डॉ. इंद्रेश कुमार यांनी अत्यंत परखड संदेश दिला. ते म्हणाले, "भारताचे मुस्लीम हे भाडेकरू नसून या मातीचे हक्काचे मालक आहेत". १९४७ नंतर ज्यांनी भारताला आपली मातृभूमी म्हणून निवडले, ते तेव्हाही भारतीय होते, आजूनही आहेत आणि अनंतकाळापर्यंत भारतीयच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुस्लीम आणि भारत यांच्यातील नाते केवळ वास्तव्याचे नसून ते प्रेम, जबाबदारी आणि आपुलकीचे आहे. समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन करत त्यांनी भर दिला की, आपले पूर्ण लक्ष मुलांच्या शिक्षणावर आणि देशाच्या उद्याच्या भवितव्यावर असले पाहिजे.
देशाच्या नशिबाला आकार देण्यात महिलांची भूमिका मध्यवर्ती असल्याचे सांगताना डॉ. कुमार यांनी मुलांच्या शिक्षणाला प्रगत भारताचा आधारस्तंभ मानले. त्यांनी मुलगा आणि मुलगी यांच्यात पूर्ण समानता राखण्याचे आणि वैयक्तिक सुखाचा त्याग करूनही शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. धार्मिक शिक्षण माणुसकी आणि मूल्ये शिकवते, तर आधुनिक शिक्षण नागरिकांना राष्ट्रीय विकासात योगदान देण्यास सक्षम करते, असे मत त्यांनी मांडले.
शिक्षण: प्रगतीचे एकमेव साधनज्येष्ठ पत्रकार नघ्मा सहर यांनी शिक्षणाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, आज मुस्लीम महिला अनेकदा पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत अधिक गांभीर्याने आणि निष्ठेने काम करताना दिसतात. उच्चशिक्षित महिलांच्या लग्नाबाबतच्या चिंतांवर बोलताना त्या म्हणाल्या की, शिक्षण मर्यादित करणे हा यावर उपाय नसून अधिक पुढे जाणे हाच मार्ग आहे. प्रगतीचे खरे मोजमाप गुणवत्ता हेच आहे आणि त्यात धर्म कधीही अडथळा ठरू नये.
डॉ. शालिनी अली यांनी महिलांच्या बहुआयामी शक्तीवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, महिला जन्मापासूनच विशेष देणगी घेऊन येतात. मुलगी म्हणून त्या मूल्ये जपतात, शिक्षणामुळे स्वावलंबी होतात आणि आई म्हणून मुलांच्या पहिल्या गुरू बनतात. कुटुंबाचे व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करण्यात महिला निपुण असतात आणि शिक्षणामुळे अशा महिला समाजासाठी अनमोल संपत्ती ठरतात.
डॉ. अली यांनी सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराबाबतही इशारा दिला. सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण मजकुराचा प्रतिकार करण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले. कोणतीही पडताळणी न करता संदेश पुढे न पाठवणे, ही देखील एक प्रकारची देशसेवाच आहे, असे त्यांनी नमूद केले.
वक्फ बोर्डाच्या सदस्या सबिहा नाझ यांनीही समुदायामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याची आणि जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षण हाच सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक सक्षमीकरणाचा एकमेव मार्ग असल्याचे त्या म्हणाल्या.
या परिषदेचा समारोप शिक्षण, देशभक्ती, सामाजिक सलोखा आणि महिला सक्षमीकरणाच्या एका प्रेरणादायी संदेशाने झाला. 'विकसित भारत' घडवण्यासाठी मुस्लीम महिला खांद्याला खांदा लावून जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहेत, हेच या परिषदेने सिद्ध केले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -