दहशतवादाविरोधात संयुक्त लढ्याचा भारत आणि बांगलादेशचा निर्धार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 28 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दहशतवाद आणि कट्टरता याविरुद्ध संयुक्तपणे लढा देण्याचा निर्धार भारत आणि बांगलादेशने आज केला. भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची द्वीपक्षीय बैठक झाली. त्यात उभय देशांनी हा निर्धार व्यक्त केला. तसेच विविध द्वीपक्षीय करारांवरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केले.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे काल दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आगमन झाले. त्या पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत दौऱ्यावर आलेल्या पहिल्या परदेशी पाहुण्या आहेत.

पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे स्वागत केले. आज सकाळी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी यांनी शेख हसीना यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रपती भवनात बांगलादेशच्या पंतप्रधानांचे मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना यांची द्वीपक्षीय बैठक झाली. तत्पूर्वी मोदी यांनी शेख हसीना यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.

मोदी म्हणाले, की मागील एका वर्षात उभयंतात दहा वेळा भेटी झाल्या, परंतु आजची भेट महत्त्वाची. आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या सरकारी पाहुण्या आहेत. बांगलादेश हे आपल्या नेबरहूड फर्स्ट, अक्ट ईस्ट व्हिजन, 'सागर' (सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन) आणि 'इंडो पॅसिफिक' या धोरणानुसार अग्रस्थानी आहे.

मागील वर्षभरात अखौडा (बांगलादेश) ते आगरताळा (भारत) यांना जोडणारा रेल्वे लिंक प्रकल्प तसेच बांगलादेश मोंगला पोर्ट रेल्वे मार्गाने जोडण्यात आला. मैत्रेयी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठा सुरू करणे, दोन्ही देशांत भारतीय रुपयाने व्यापाराला सुरवात करणे यासारख्या करारांचा दाखला देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'उभय देशांत संरक्षण सहकार्य मजबूत करण्याबरोबरच संरक्षण साहित्याचे उत्पादन आणि लष्कराचे आधुनिकीकरण यावरही चर्चा झाली.'

मोदी म्हणाले, दोन्ही देश दहशतवाद, कट्टरता यांचा मुकाबला करण्यासाठी आणि सीमेवर शांततेच्या मार्गान व्यवस्थापन करणे यातून परस्पर सहकार्य बळकट करणार आहेत. प्रशांत महासागर क्षेत्र योजनेत बांगलादेशने सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचेही मोदी म्हणाले. बांगलादेश हा भारताचा विकासातला भागीदार असल्याचे मोदी म्हणाले. तर, पंतप्रधान हसीना यांनी भारत आपला प्रमुख शेजारी, विश्वासू मित्र व प्रादेशिक भागीदार असल्याचे सांगताना त्यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात बलिदान देणाऱ्या भारतीय नायकांच्या स्मृतिंना अभिवादन केले.