काल (४ मे) जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणात मोठा इतिहास रचला आहे. सलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात ऐतिहासिक सत्तांतर घडवून आणले आहे. डाव्यांचा एकेकाळचा भक्कम बालेकिल्ला असलेल्या या राज्यात भाजपने आपला झेंडा कसा फडकवला, याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.
याच ऐतिहासिक निकालाच्या पार्श्वभूमीवर, मंजीत ठाकूर यांचे 'बंगाल में भाजपा: वाम गढ में दक्षिणपंथ की विकास यात्रा' हे पुस्तक सध्या खूप चर्चेत आले आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या या राजकीय उदयाचा सर्वात अचूक लेखाजोखा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. मंजीत ठाकूर हे दूरदर्शन आणि इंडिया टुडेचे माजी पत्रकार आहेत. त्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भारतीय राजकारणाचे अत्यंत जवळून निरीक्षण केले आहे.
बंगालने नेहमीच भक्कम आणि दीर्घकाळ टिकणारे जनादेश दिले आहेत. प्रथम डाव्या आघाडीला ३४ वर्षे आणि नंतर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला १५ वर्षे सत्ता दिली. अशा राज्यात भाजपचा उदय कसा झाला, याचा सविस्तर मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सत्तेचा अंत आणि भारतीय जनता पक्षाचा उदय या राजकीय उलथापालथीवर भाष्य करण्यासाठी सध्या 'आवाज-द व्हॉईस'च्या ऑडिओ-व्हिज्युअल विभागाचे संपादक असलेले ठाकूर हे अत्यंत योग्य व्यक्ती असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी निकालांवर सविस्तर चर्चा केली.
प्रश्न: तुमचे पुस्तक खूप दूरदृष्टीचे ठरले आहे. बंगालमधील भाजपच्या उदयाचा अंदाज तुम्हाला कसा आला?
उत्तर: बंगालमधील भाजपचा उदय ही कोणतीही अचानक घडलेली घटना नाही. के. बी. हेडगेवार यांचा कोलकातामधील काळ, एम. एस. गोळवलकर यांचे अल्प वास्तव्य आणि नंतर १९५२ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेली भारतीय जनसंघाची स्थापना पाहता, बंगाल हे ऐतिहासिकदृष्ट्या उजव्या विचारधारेचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे.
महात्मा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अकाली निधन झाले. या घटनांचा फटका या विचारधारेच्या वाढीला बसला, हे नक्कीच मान्य करावे लागेल. याच काळात अन्न आंदोलन आणि तेभागा शेतकरी आंदोलनासारख्या चळवळी उभ्या राहिल्या. लोकांचे लक्ष विचारधारेवरून पोटापाण्याच्या प्रश्नांकडे वळले. असे असले तरी, उजव्या विचारधारेची बीजे तिथे कायम रोवली गेलेली होती.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मी संपूर्ण बंगालचा दौरा केला. राज्यातील जवळपास प्रत्येक तिसऱ्या गावाला मी भेट दिली होती. तेव्हा मला तळागाळात प्रचंड मोठा असंतोष खदखदताना जाणवला. त्याच वर्षी मी 'बंगाल हे भाजपसाठी सुपीक जमीन आहे' या मथळ्याखाली एक लेख लिहिला होता. त्यावेळी तो विचार अतिशयोक्तीपूर्ण आणि वादग्रस्त मानला गेला. पण लोकांच्या या भावनांचे रूपांतर लवकरच मतात होईल, यावर माझा ठाम विश्वास होता.
प्रश्न: बंगालने ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच दीर्घकाळ सत्ता दिली आहे. भाजपकडे झालेला हा कल केवळ एक प्रयोग आहे, की त्यामागे काही सखोल कारणे आहेत?
उत्तर: काही राज्यांमधील लोक दर पाच वर्षांनी सरकार बदलतात. पण 'भाकरी पूर्णपणे करपल्याशिवाय' बंगालमधील लोक सत्ता बदलत नाहीत. १९७७ मध्ये डावी आघाडी सत्तेवर येण्यापूर्वी अनेक दशके राज्यात काँग्रेसचे वर्चस्व होते.
डाव्यांना केवळ 'एक संधी दिली' असे म्हणणे खूप वरवरचे ठरेल. डाव्या पक्षांनी स्थानिक क्लब, संस्था आणि अगदी लोकांच्या खाजगी आयुष्यातही आपली पाळेमुळे घट्ट रोवली होती. रोजगार, शेतीपासून ते आपसातील वाद मिटवण्यापर्यंत सर्वत्र पक्षाचे कार्यकर्ते हजर असायचे. २०११ मध्ये डाव्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ममता बॅनर्जी यांनाही अत्यंत प्रदीर्घ संघर्ष करावा लागला होता.
काँग्रेसमधील सुरुवातीच्या दिवसांपासून ते स्वतःचा पक्ष स्थापन करण्यापर्यंतचा त्यांचा हा राजकीय प्रवास एक दशकाहून अधिक काळ चालला. त्यानंतरच त्यांना हे यश मिळाले. या तुलनेत भाजपची वाढ अत्यंत वेगाने झाली आहे. २०१६ मध्ये केवळ तीन आमदार असलेला पक्ष कालच्या निकालात २०० हून अधिक आमदारांपर्यंत पोहोचला आहे.

प्रश्न: कालच्या निकालातून बंगाली मतदार नेमका कोणता संदेश देत आहेत?
उत्तर: हा केवळ राजकीय बदल नाही, तर एका मोठ्या वैचारिक चळवळीचे हे प्रतिबिंब आहे. भाजपने मतुआ, राजबंशी, गोरखा आणि नामशूद्र यांसारख्या समुदायांमध्ये भक्कम 'सोशल इंजिनिअरिंग' केले. तसेच दलित, ओबीसी आणि आदिवासी गटांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे प्रयत्न या निकालात अत्यंत निर्णायक ठरले.
यात काही प्रतीकात्मक गोष्टींचाही मोठा वाटा राहिला. द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्रपतीपद आणि त्यांच्या कथित अपमानाभोवती फिरणारे कथानक खूप प्रभावी ठरले. त्याच वेळी, हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही बाजूंच्या ध्रुवीकरणाने या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले.
प्रश्न: मतदारांनी यावेळी ममता बॅनर्जींना का नाकारले? हा केवळ विकासाचा मुद्दा होता का?
उत्तर: ममता बॅनर्जी यांची प्रशासनावरील पकड सैल होताना दिसली. दुसरीकडे त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे प्रस्थ मात्र वाढले. यातून पक्षामध्ये अंतर्गत नाराजी निर्माण झाली. सोबतच, प्रस्थापित सरकारविरोधातील स्पष्ट लाट तिथे पाहायला मिळाली.
विकासाच्या बाबतीत बंगाल पश्चिमी राज्यांच्या तुलनेत नक्कीच मागे आहे. पण भारतात केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. ममता बॅनर्जींची 'मा, माटी, मानुष' ही भावनिक घोषणा पूर्णपणे सत्यात उतरली नाही, ही भावना लोकांमध्ये अधिक प्रबळ झाली.
घुसखोरीसारख्या मुद्द्यांवर त्यांनी वारंवार बदललेल्या भूमिकांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेला. संदेशखालीसारख्या घटना आणि आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाभोवती झालेले मोठे वाद त्यांच्या अंगलट आले. वाढत्या गुन्हेगारीच्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा विशेषतः महिला मतदारांमध्ये प्रचंड डागाळली. एकेकाळी डाव्यांच्या ज्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीला त्यांनी प्रखर विरोध केला होता, नेमकी तशीच ओळख त्यांच्या स्वतःच्या पक्षाची बनू लागली. हा एक मोठा विरोधाभास ठरला.
हेही वाचा : Election Result 2026 : सोनार बांग्लाचा नवा अध्याय : २०२६ च्या विजयाचे मर्म आणि भाजपपुढील पेच
प्रश्न: या निवडणुकीत भाजपची सर्वात मोठी जमेची बाजू कोणती होती?
उत्तर: राजकीय हिंसाचार हा बंगालच्या इतिहासाचा अनेक वर्षांचा भाग आहे. पण भाजपने या राजकीय आखाड्यात एक तुलनेने नवीन पक्ष म्हणून प्रवेश केला. महिला मतदारांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करणे ही त्यांची सर्वात मोठी ताकद ठरली. अल्पसंख्याकांच्या कथित एकत्रीकरणाला उत्तर म्हणून हिंदू भावनांचे अत्यंत प्रभावीपणे ध्रुवीकरण करण्यात आले. यात सोशल मीडियानेही खूप मोठी भूमिका बजावली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची भाषणे आणि गाण्यांवरील व्हायरल मजकुराने लोकांचे विचार बदलण्यात मोठा वाटा उचलला.
याशिवाय, बंगाल पारंपरिकदृष्ट्या जातीच्या राजकारणाला विरोध करतो. पण या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील जाती आणि आदिवासींचे एकत्रीकरण अत्यंत निर्णायक घटक म्हणून समोर आले. बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. पण इतिहास अनेकदा अपवाद निर्माण करतो. कालचा निकाल त्याच अपवादांपैकी एक आहे. आता ही जबाबदारी समर्थपणे पेलण्याची वेळ भाजपवर आली आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter