न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशावाणीवरून दर महिन्यातील अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग रविवारी संयुक्त राष्ट्रांमध्येही थेट प्रक्षेपित करण्यात आला. भारताच्या वरीष्ठ राजनैतिक अधिकारी रुचिरा कंबोज यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. न्यूयॉर्क येथे तेथील वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता हा कार्यक्रम प्रसारित झाला.
Just started. ‘Mann Ki Baat’ at Trusteeship Council, UN Headquarters New York
— Ruchira Kamboj (@ruchirakamboj) April 30, 2023
1:30am EST#MannKiBaat100 pic.twitter.com/zZ7ylf33KA
‘मन की बात’ कार्यक्रमाचे संयुक्त राष्ट्रांच्या ट्रस्टीशिप कौन्सिलमध्ये हा कार्यक्रम ऐकविण्यात आला. हा अत्यंत अभूतपूर्व आणि ऐतिहासिक क्षण होता, असे येथील भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘मन की बात हा कार्यक्रम म्हणजे भारताची एक परंपराच असून भारताच्या विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाने लाखो जणांना प्रेरणा दिली आहे. या कार्यक्रमात जनतेच्या उत्स्फुर्त सहभागाला प्रोत्साहन दिले जाते,’ असे भारतीय दूतावासाने सांगितले. ‘मन की बात’बाबत माहिती सांगणारा व्हिडिओही दूतावासाने प्रसिद्ध केला.
‘मन की बात’ या कार्यक्रमाचे सर्वांत पहिले प्रसारण तीन ऑक्टोबर २०१४ रोजी झाले होते. त्यानंतर दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी सकाळी अकरा वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे.
इतर देशांमध्येही प्रसारण
ब्रिटन, चीन, दक्षिण आफ्रिका, चिली, मोरोक्को, मेक्सिको, काँगो, इराक आणि इंडोनेशियासह विविध देशांमधील भारतीय दूतावास आणि वाणिज्य कार्यालयांमध्येही ‘मन की बात’च्या शंभराव्या भागाचे प्रसारण करण्यात आले. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी त्या त्या देशांमधील भारतीय समुदायांमधील अनेक नागरिक उपस्थित होते. रशियातील मॉस्को येथील दूतावासातही प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी अनेक भारतीय नागरिक हजर होते.
ही नव्या भारताची कथा : जयशंकर
सॉमरसेट : ‘मन की बात’ हा कार्यक्रम म्हणजे बदलत्या भारताची, म्हणजेच नव्या भारताची आणि जगाशी असलेल्या संवादाची कथा असल्याचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आज अमेरिकेतील न्यूजर्सी येथे सांगितले. ‘मन की बात’चा शंभरावा भाग ऐकण्यासाठी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भारतीय समुदायातील अनेक लोकांसह जयशंकरही उपस्थित होते. ‘भारताचे रुपांतर एका नव्या भारतात झाले आहे. सध्याचा भारत हा आधीपेक्षा वेगळा आणि अधिक महत्त्वाकांक्षी आहे. आमचा जगाशी संपर्क आणि संवाद वाढला आहे. ही त्या बदलाची कथा आहे,’ असे जयशंकर यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. या कार्यक्रमाला भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू, वाणिज्यदूत रणधीर जयस्वाल आणि इतर भारतीय वंशाचे खासदार उपस्थित होते.