INDIAN PARLIAMENT: पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून? शिवसेना आणि टीएमसीच्या बंडखोर खासदारांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
भारतीय संसद
भारतीय संसद

 

नवी दिल्ली 

संसदेचे बहुचर्चित पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन साधारणपणे तीन आठवडे चालेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केला. मात्र, संसदीय कामकाजविषयक कॅबिनेट समितीने (CCPA) यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

नेहमीपेक्षा लहान अधिवेशन?

साधारणपणे संसदेचे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन चार आठवडे चालते, ज्यामध्ये २० बैठका होतात. मात्र, याआधीही अनेकदा संसदेची अधिवेशने कमी कालावधीसाठी घेण्यात आल्याची उदाहरणे आहेत. यंदाचे अधिवेशन पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महत्त्वपूर्ण विजयानंतर पार पडणार असल्याने, सत्ताधारी पक्ष अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाईल असे मानले जात आहे.

बंडखोर खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष

या पावसाळी अधिवेशनात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांमधील बंडखोरीचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. टीएमसीच्या २० आणि ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी केली आहे. या मागणीवर अध्यक्षांचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

दुसरीकडे, राज्यसभा सदस्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या शपथविधीनंतर, वरच्या सभागृहातही सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) पारडे अधिक जड झाले आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा मोठा राजकीय सामना रंगण्याची चिन्हे आहेत.