वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला, तरी विद्यार्थ्यांचा लढा इथेच संपलेला नाही, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसने घेतली आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील चांदिवली भागात काँग्रेसतर्फे वरिष्ठ नेते नसीम खान आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वात 'तिरंगा' मार्च काढण्यात आला. बैल बाजार महापालिका शाळेपासून सुरू झालेला हा मोर्चा साकीनाका मेट्रो स्टेशन येथे सांगता पाडला. यावेळी बोलताना नसीम खान म्हणाले, "धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे विद्यार्थ्यांच्या लढ्यातील केवळ पहिले पाऊल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष तपास होऊन सर्व दोषींना कडक शिक्षा होत नाही, तोपर्यंत खरा न्याय मिळणार नाही."
विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
या आंदोलनादरम्यान नसीम खान यांनी मागणी केली की, NEET पेपर लीकविरोधात मुंबई आणि महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष आपले आंदोलन अधिक तीव्र करेल, असा पुनरुच्चार काँग्रेस नेत्यांनी केला. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विविध विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा मिळाला होता.