कारगिल विजय दिनानिमित्त शूरवीरांना अभिवादन; 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांना संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

संरक्षण उत्पादन, लष्करी साहित्याची निर्यात आणि मित्र देशांसोबतच्या राजकीय सहकार्याच्या क्षेत्रात भारत सतत नवी शिखरे गाठत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. आपल्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.

कारगिल विजय दिन आणि शौर्य यात्रा
'कारगिल विजय दिना'चा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, "२६ जुलै हा असा दिवस आहे जो आपल्या मनात अभिमानाची भावना भरतो आणि आपल्या शूर सैनिकांच्या असाधारण शौर्याची आठवण करून देतो. कारगिलची उंच शिखरे, प्रतिकूल हवामान आणि शत्रूचे आव्हान - या सर्व परिस्थितीचा सामना करत आपल्या सैनिकांनी अतुलनीय धैर्य दाखवले." आजचा भारत केवळ आपल्या नायकांचे स्मरण करत नाही, तर त्यांची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवत असून या भावनेतून 'शौर्य विजय यात्रा' आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत
सैनिकांच्या धैर्यासोबतच भारत आपली तांत्रिक क्षमताही सातत्याने मजबूत करत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारतीय नौदलात दाखल झालेली 'आयएनएस महेंद्रगिरी' ही अत्याधुनिक युद्धनौका भारतातच डिझाइन करून तयार करण्यात आली आहे आणि त्यातील ७५ टक्क्यांहून अधिक साहित्य स्वदेशी आहे. याशिवाय, 'डीआरडीओ'ने पिनाका लाँग-रेंज गाइडेड रॉकेट आणि 'कुशा' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. इंडोनेशियासोबत ब्राह्मोस आणि अस्त्र क्षेपणास्त्रांबाबत झालेला करार हा भारतीय संरक्षण तंत्रज्ञानावरील जागतिक विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.  

अंतरिक्ष क्षेत्र आणि युवा नवोन्मेषक
खासगी क्षेत्रातील पहिल्या 'विक्रम-१' रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, ही अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक घटना आहे. अंतराळ क्षेत्र खासगी उद्योगांसाठी खुले केल्याने तरुण संशोधकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय 'कॅच द रेन' अभियानांतर्गत पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे आणि क्रीडा क्षेत्रातील भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. ७ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या 'राष्ट्रीय हातमाग दिना'निमित्त स्थानिक विणकरांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.