आयकर विभागाने सामान्य नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारायला न लावता त्यांच्या हितासाठी काम करावे, असे आवाहनात्मक प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केले. मुंबईतील नरीमन पॉइंट या व्यावसायिक क्षेत्रात आयकर विभागाच्या १३ मजली 'आयकर सिंधु' या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावर नाराजी
कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्र्यांनी शासकीय जमिनींवरील बेकायदेशीर अतिक्रमणे आणि सरकारी विभागांच्या ढिसाळ कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "आयकर विभागासारख्या बलाढ्य संस्थेला स्वतःच्या इमारतीसाठी मंजुरी मिळवताना एवढा संघर्ष करावा लागला, यावरून सामान्य नागरिकाला आपल्या कामासाठी किती त्रास सहन करावा लागत असेल याची कल्पना येते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांना विनाकारण फेऱ्या मारायला लावू नये."
अतिक्रमणांवर थेट बोट
ज्या जागेवर १.१३ लाख चौरस फुटांची 'आयकर सिंधु' इमारत उभारण्यात आली आहे, ती जागा १९७३ पासून आयकर विभागाच्या ताब्यात होती. तरीही त्यावर अतिक्रमणे झाली. "आपल्या स्वतःच्या मालमत्तांचे रक्षण करण्यात आपण निष्काळजीपणा दाखवतो, हे आपल्या प्रशासकीय व्यवस्थेतील ढिसाळपणाचे लक्षण आहे," अशा शब्दांत सीतारामन यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचे आवाहन
आयकर गोळा करणे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे हे काम करताना प्रत्येक अधिकाऱ्याने अत्यंत प्रामाणिक राहणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी दिला. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आश्वासनही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिले. बीएसएनएलच्या जागा सरकारी हस्तांतरणाद्वारे मिळवून देऊन अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.