पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; दरड कोसळल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाट आणि लोणावळा परिसरात वाहतुकीचा खोळंबा
मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाट आणि लोणावळा परिसरात वाहतुकीचा खोळंबा

 

मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि डोंगरातून कोसळणाऱ्या दरडींमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेस वे) आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक सोमवारपासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणे टाळावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या जाहीर आवाहनात म्हटले आहे की, "नागरीकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यान कोणताही प्रवास करू नये. ज्यांचा प्रवासाचा बेत आहे, त्यांनी आपला प्रवास पुढे ढकलावा आणि सरकारी यंत्रणांकडून येणाऱ्या वाहतूक सूचना व अपडेट्सचे पालन करावे."

'मिसिंग लिंक'वर पिलर कोसळला, जुन्या मार्गावर पाणी
मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या पर्यायी मार्गांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील 'कनेक्टिंग लिंक' आणि 'मिसिंग लिंक' दरम्यान एक काँक्रीटचा पिलर रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने तोदेखील खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला आहे.

लोहगड जवळील पाटण गावात दरड कोसळली; कुटुंब अडकल्याची भीती
लोहगड किल्ल्याजवळील पाटण गावात मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली एक कुटुंब अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अतिवृष्टीचा धोका पाहता पुणे जिल्हा प्रशासनाने आज सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.

नवनिर्मित 'मिसिंग लिंक'च्या बोगद्याजवळ दरड
दोन महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या १३ किलोमीटरच्या खोपोली-कुसगाव 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील बोगदा क्रमांक २ च्या एक्झिटजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे सोमवार पहाटेपासूनच पुणे ते मुंबई बाजू कडील वाहतूक वळवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सोमवारी पहाटे ४ वाजल्यापासूनच वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळ आणि महामार्ग पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

लोणावळ्यात वाहनांच्या रांगा, प्रवासी अडकले
सांगलीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका प्रवाशाने सांगितले की, "मिसिंग लिंक बंद झाल्यामुळे आम्हाला लोणावळामार्गे वळवण्यात आले. मात्र, आता पहाटे ४ वाजेपासून आम्ही लोणावळा शहरातून जाणाऱ्या एक्स्प्रेस वेच्या भागात बंपर-टू-बंपर ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत." महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा घाट परिसरात झालेल्या पाणीसाठवणूक आणि दरडींमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.