गांधींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आपल्या आत्मचरित्रात म्हटलेले आहे की, जोपर्यंत आपण दुसऱ्या लोकसमूहांच्या धार्मिक श्रद्धा आपल्या स्वत:च्या समजून त्यांचा आदर करत नाही, तोपर्यंत या पृथ्वीवर कायमस्वरूपी शांतता नांदू शकणार नाही. महात्मा गांधी यांच्या यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्यात विविध धर्म, जाती आणि समाजातील लोक सहभागी झाले होते. विशेषतः मुस्लीम समुदायातील काही प्रमुख सहकाऱ्यांनी गांधीजींच्या विचारधारेवर आणि गांधींनीही या सहकाऱ्यांवर मोठा प्रभाव टाकला.
गांधींनी एके ठिकाणी म्हटलेले आहे की, ‘इस्लाम हा तलवारीच्या जोरावर पसरला नसून त्यात एका मागोमाग एक झालेल्या संत पुरुषांच्या आणि सुफी फकिरांच्या प्रार्थनायुक्त प्रेमाने तो पसरला आहे, हे मी अत्यंत थोर मुसलमान मंडळींच्या सहवासात आल्याने शिकलो.’ भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महात्मा गांधीचे हे काही महत्त्वाचे मुस्लिम सहकारी आणि अनुयायी जे गांधीजींच्या अहिंसात्मक लढ्याचे महत्त्वाचे भाग होते. हिंदू-मुस्लीम ऐक्य साधण्यासाठी आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.
खान अब्दुल गफ्फार खान (सरहदी गांधी):
खान अब्दुल गफ्फार खान हे गांधीजींचे अत्यंत जवळचे सहकारी होते आणि त्यांना 'सरहदी गांधी' किंवा 'फ्रंटियर गांधी' म्हणून ओळखले जाते. ते उत्तर-पश्चिम सीमांत प्रांतातील होते. त्यांनी 'खुदाई खिदमतगार' नावाच्या अहिंसावादी संघटनेची स्थापना केली. खान अब्दुल गफ्फार खान यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठा वाटा उचलला आणि गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वांचा पुरस्कार केला. त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारने सन्मानही केला.
मौलाना अबुल कलाम आझाद:
मौलाना आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते हिंदू-मुस्लीम ऐक्याचे समर्थक होते. फाळणीच्या विरोधातील बुलंद आवाज होते. इस्लामी पंडित असलेले मौलाना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री बनले. गांधीच्या सहवासात आल्यानंतर त्यांची राजकीय समज अधिक प्रखर आणि सर्वसमावेश झाल्याचे त्यांनी अनेक ठिकाणी मान्य केले आहे.
डॉ. मुख्तार अहमद अन्सारी:
डॉ. अन्सारी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि गांधीजींचे सहकारी होते. पूर्वी ते अखिल भारतीय मुस्लिम लीगचे प्रमुख सदस्य होते. मात्र नंतर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि स्वतःला देशासाठी झोकून दिले. पुढे 1927 मध्ये त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले. डॉ अन्सारी यांनी गांधीजींचे वैद्यकीय सल्लागार म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली.
रफी अहमद किडवाई:
रफी अहमद किडवाई राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. गांधीजींच्या नेतृत्वाखाली ते अनेक चळवळींमध्ये सहभागी झाले होते. विशेषतः उत्तर प्रदेशात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याचे त्यांनी काम केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे अन्न आणि शेतीमंत्री झाले.
हकीम अजमल खान:
हकीम अजमल खान हे गांधीजींच्या असहकार चळवळीत सक्रिय होते. ते दिल्लीचे प्रख्यात युनानी वैद्य होते. ते जामिया मिलिया इस्लामिया या शैक्षणिक संस्थेचे सह-संस्थापकही होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्यलढ्यात ते अग्रभागी होते. हिंदू-मुस्लीम ऐक्य साधण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदानही अनन्यसाधारण होते.
ख्वाजा अब्दुल हमीद:
गांधीजींच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन ख्वाजा अब्दुल हमीद यांनी शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि उद्योग क्षेत्रात मोठे योगदान दिले. जगप्रसिद्ध सिप्ला या औषधनिर्मिती कंपनीचे संस्थापक होते. भारतीय औषध क्षेत्राला स्वावलंबी करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला.
आसफ अली:
आसफ अली हे काँग्रेसचे सक्रिय सदस्य आणि गांधीजींचे निकटचे सहकारी होते. त्यांनी अनेक सत्याग्रहांमध्ये भाग घेतला. विशेषतः 'भारत छोडो' चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे बर्लिनमधील पहिले राजदूत झाले.
सैफुद्दीन किचलू:
सैफुद्दीन किचलू हे पंजाबमधील काँग्रेसचे प्रमुख नेते होते. गांधींच्या असहकार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. गांधीजींचे जवळचे सहकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात आपला आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी ब्रिटीशांचा मोठा रोषही ओढवून घेतला.
बदरुद्दीन तैयबजी:
तैयबजी हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश होते. ते काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. 1887 मध्ये त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी काम केले. त्यांची राष्ट्रवादी आणि उदारमतवादी भूमिका गांधीजींच्या चळवळीला प्प्रेरणा देणारी ठरली.
डॉ. जाकिर हुसेन:
डॉ.जाकिर हुसेन हे स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजींचे निष्ठावान सहकारी होते. शैक्षणिक क्षेत्रातील ते महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे ते सह-संस्थापक होते. त्यांनी गांधींच्या स्वावलंबनाच्या तत्त्वांचा पाठपुरावा केला. देशसेवेतील शिक्षणाचे त्यांनी जनतेला पटवून दिले. त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपदही भूषवले.
अब्बास तैयबजी:
अब्बास तैयबजी हे गांधींच्या असहकार चळवळीत सहभागी झालेले न्यायाधीश होते. त्यांनी आपले न्यायाधीश पद सोडून असहकार चळवळीत भाग घेतला. ते स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वाच्या सत्याग्रहांमध्ये सहभागी होते आणि गांधींच्या मृत्यूनंतरही त्यांनी देशासाठी आपले योगदान दिले.
मुहम्मद अली आणि शौकत अली:
हे दोघे भावंडे 'अली बंधू' म्हणून ओळखले जात. त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीत सक्रिय भाग घेतला. मुस्लिम समुदायाला राष्ट्रवादी विचारांची प्रेरणा रुजवण्यात त्यांचा मोठा हात होता. त्यांनी खिलाफत चळवळीचे नेतृत्वही केले. अली बंधू हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी आयुष्यभर समर्पित राहिले.
युसुफ मेहरली:
युसुफ मेहरली एक क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेता आणि मुंबईतील एक लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व होते. ते गांधीजींच्या अहिंसावादी विचारांशी प्रेरित होते, परंतु ते क्रांतिकारक कार्यकर्ते आणि समाजवादी विचारसरणीच्या नेतृत्त्वात अग्रगण्य होते.
युसुफ मेहरली आणि गांधी यांचा सहसंबंध दाखवणारी सर्वात मोठी ऐतिहासिक घटना म्हणजे त्यांनी 'Quit India' म्हणजेच 'भारत छोडो' हे घोषवाक्य तयार केले होते. 1942 च्या भारत छोडो चळवळीवेळी हे वाक्य भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक बनले. गांधीजींनी या चळवळीचे नेतृत्त्व केले आणि मेहरली यांनी या चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली.