पहलगाम हल्ला : महाराष्ट्रील मुस्लिम ‘असा’ करताहेत निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 d ago
पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना मुस्लिम समाज
पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना मुस्लिम समाज

 

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे.  दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. शुक्रवारी जुमाच्या नमाजनंतर महाराष्ट्रातही काळ्या फिती बांधून पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन मुस्लिम समाजाने दहशतवादी हल्ल्याचा कडाडून विरोध केला. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, मुंब्रा, खर्डी, पालघर, पनवेल  या भागात मुस्लिम समाजाने रस्त्यावर येत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तसेच निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या घरात शिरून खात्मा करण्याची मागणी केली. 

मुस्लिमबहुल मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात देखील निषेध मोर्चा निघाला होता. यावेळी कौसा जामा मशीद, रिझवी बाग मस्जीद, तनवीर नगर, रशीद कंपाऊंड येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांन पाकिस्तान मुर्दाबाद, 'हमारी जान... हिंदुस्थान' अशा घोषणा दिल्या. तर दुसरीकडे मुस्लीम महिलांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीला जोड्याने मारत निषेध केला. 

खडर्डी येथे पहलगाम हल्ल्याचा निषेध 

खडर्डी येथील मुस्लीम बांधवांनी एकत्र येत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत निदर्शन केली. मुस्लीम बांधवांनी हाताला काळ्या फिती बांधून कादरी मस्जिदमध्ये नमाज अदा केली. यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत दहशतवाद्यांवर केंद्र सरकारने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. 

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमने नोंदवला निषेध 

औरंगाबाद येथील क्रांती चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळत एमआयएमने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, "आता भाषणबाजी बंद करून पंतप्रधानांनी थेट कारवाई करावी.केंद्र सरकार जी कारवाई करेल त्याला आमचा पाठिंबा असेल." यावेळी जमलेल्या मुस्लिम समुदायाने  हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवाय 'काश्मिरसे आवाज आयी... हिंदू- मुस्लीम भाई भाई, मुर्दाबाद मुर्दाबाद... पाकिस्तान मुर्दाबाद, फासी दो फासी दो, आतंकवादियों को फासी दो, आयएसआय मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या.

छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात AIMIM पक्षाने आंदोलन केले. पाकिस्तानचा झेंडा जाळला. माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले: "नमाज पठण करताना काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो. दहशतवाद्यांविरुद्ध वेळीच कारवाई झाली असती, तर हा हल्ला झाला नसता." "पाकिस्तान मुर्दाबाद" च्या घोषणांनी परिसर दणाणला. 

केडगाव मुस्लिम बांधवांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केडगाव येथील शाही जामिया मशिदीच्या वतीने मुस्लिम बांधवांनी काळ्याफिती बांधून निषेध व्यक्त करत शुक्रवारची नमाज अदा केली. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी उस्मान मनियार म्हणाले, “पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर क्रूरपणे हल्ला केला. ही एक मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांसह पाकिस्तानला धडा शिकवा, अशी केडगावमधील मुस्लिम समाजाची मागणी आहे.” 

सासवडमधील मुस्लिमांकडून निषेध व्यक्त 

सासवड येथील शिवतीर्थ चौकात मुस्लिम समुदायाने निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून "भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद" अशा घोषणा दिल्या. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय" अशा घोषणांनी परिसर दणाणला. 

अहमदनगर सर्जेपुरा भागात नमाजनंतर मृतांना श्रद्धांजली

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप २६ नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शुक्रवारी दुपारी सर्जेपुरा येथील तांबोळी कब्रस्तान मरकज येथे नमाज अदा केल्यानंतर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी काळ्या फिती लावून या भ्याड हल्ल्याचा विरोध दर्शवला.

अब्दुल सलाम खोकर म्हणाले की, “दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. हे माणुसकीच्या तत्त्वांना पायदळी तुडवणारे कृत्य आहे. बायसरनमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानवजातीच्या विरोधात आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे समाजात दहशतीचं वातावरण निर्माण होतं.”

तर हाजी मन्सूर शेख म्हणाले की, “ईस्लाम हा शांती, प्रेम, सहिष्णुता व मानवी मूल्यांचा धर्म आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचे समर्थन इस्लाम करत नाही. धर्माविरोधातील हे कृत्य आहे. निष्पाप लोकांचे प्राण घेणाऱ्यांना मानवी समुदायात जागा नाही. मुस्लिम समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो. अशा प्रवृत्तीच्या विरोधात सर्व भारतीय खंबीरपणे उभे आहोत.”

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे पहलगाम हल्ल्याचा निषेध

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील भारतीय पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला. या भ्याड कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि मृत भारतीय बांधवांना विजापूर वेस येथे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मेणबत्ती पेटवून पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. समस्त मुस्लिम मावळ्यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आम्ही सारे भारतीय एकोप्याने आणि बंधुत्व जपणारे आहोत, भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी ही करण्यात आली.  

सोलापूर येथे काळ्या फिती बांधून नमाज

काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटक मारले गेले. या पार्श्वभूमीवर नरखेड जामा मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

सोलापूर येथील मुख्य मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून नमाज पठण केले. AIMIM पक्षाने "काळ्या फिती बांधून नमाज अदा करा" असे आवाहन केले होते. AIMIM पदाधिकारी शौकत पठाण म्हणाले: "दहशतवाद्यांना जात नसते. मुंबईत 26/11 हल्ल्यात अनेक मुस्लिमांनी प्राण गमावले. देशात भाईचारा राहावा, हिंदू-मुस्लिम वाद नको. हल्ल्याला प्रतिउत्तर देणे महत्त्वाचे आहे." 

नाशिक येथे हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नाशिक येथील मुस्लीम समाजाकडून निषेध करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ धर्मगुरु तथा खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "दहशतवादी हल्ला किंवा कोणत्याही प्रकारची हिंसेला इस्लाम धर्मात अजिबात थारा नाही. निष्पाप लोकांना मारण्याची शिकवण इस्लाम देत नाही. दरम्यान, शहरातील मुस्लीम समाजातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या नॅशनल उर्दू कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी निषेध रॅली काढली.

सिंधुदुर्ग येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध 

कुडाळ येथील मुस्लिम समाजाने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी कुडाळच्या तहसीलदारांच्या यांच्या मार्फत राज्य व केंद्र शासनाला अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. 

नांदगाव खंडेश्वर येथे नमाजाद्वारे निषेध

नांदगाव खंडेश्वर शहरातील मुस्लिम समुदायाने जामा मस्जिद, मदीना मस्जिद, आयेशा मस्जिद, फैयाज-ए-गरीब नवाज मस्जिद आणि कुरेशी मस्जिद येथे काळ्या फिती लावून जुमाची नमाज अदा केली. नमाजानंतर त्यांनी आंदोलन करून हल्ल्याचा निषेध नोंदवला. त्यांनी हल्ल्याला अमानुष संबोधले. 

नेवासा येथे श्रद्धांजली सभा

नेवासा शहरातील अहिल्यानगर येथील मदीना मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. मौलाना जुनेद म्हणाले: "इस्लाम धर्म नाहक हत्या माफ करत नाही. हे पाप आहे. हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हायला हवी. सर्वधर्मीयांनी एकजुटीने या संकटाचा मुकाबला करायला हवा." 

कुडाळ येथे निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मुस्लिम समुदायाने हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्यामार्फत राज्य आणि केंद्र सरकारला निवेदन पाठवले. निवेदनात त्यांनी सांगितले: "अशा हिंसक आणि मानवी मूल्यांना काळिमा फासणाऱ्या कृत्यांचे समर्थन होऊ शकत नाही. आमचा समाज शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या बाजूने आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हायला हवी." 

उरुळी कांचन येथे पोलिसांना निवेदन

उरुळी कांचन (पुणे) येथील मुस्लिम समुदायाने पोलिसांना निवेदन दिले. त्यांनी मागणी केली की हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी. त्यांनी सांगितले: "या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमच्या निष्पाप देशबांधवांचा बळी गेला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो." वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

सटाणा येथे मेणबत्ती मार्च

सटाणा येथील जामा मस्जिदपासून मुस्लिम समुदायाने मेणबत्ती मार्च काढला. हा मार्च शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संपला. पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना पाकिस्तानच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. मौलाना नुरी आणि फईम शेख यांनी हल्ल्याला अमानुष संबोधले.

अलिबाग येथे शांततापूर्ण निषेध

अलिबाग येथील जामा मस्जिदसमोर मुस्लिम बांधवांनी शांततेत निषेध नोंदवला. त्यांनी हातात राष्ट्रध्वज घेत मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. नसीम बुकबाइंदडर, वसीम साखरकर, अश्रफ घट्टे, मुश्ताक घट्टे, जाफर सय्यद आणि फरीद सय्यद यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

नवी मुंबई येथे श्रद्धांजली सभा

नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुस्लिम समुदायाने हल्ल्याचा निषेध केला. मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. इकबाल शेख, अन्वर शेख, जब्बार खान, समीर बागवान, रउफ शेख, मुबीन काझी, दिलावर नळबंद यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. त्यांनी एकजुटीने अतिरेकवादाविरुद्ध आवाज उठवला. 

पनवेल येथे निषेध मोर्चा

पनवेल येथे मुस्लिम नाका परिसरातून निषेध मोर्चा काढला गेला. "पाकिस्तान मुर्दाबाद, अतिरेकवाद मुर्दाबाद" अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले. मोर्चात सहभागी नागरिकांनी सांगितले: "हल्ल्यामुळे मुस्लिम समाज बदनाम झाला. पण भारतीय मुस्लिम नेहमीच देशहितासाठी जगेल." मुस्लिम नाका येथील सुविधा मेडिकलजवळ सायंकाळी पाच वाजता मोर्चाला सुरुवात झाली. 

रत्नागिरी येथे पाकिस्तानचा झेंडा पायदळी

रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात मुस्लिम समुदायाने निषेध सभा घेतली. "पाकिस्तान मुर्दाबाद" अशा घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला. "भारत माता की जय" च्या घोषणांनी परिसर दणाणला. हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. निषेध सभेदरम्यान दहशतवादाविरोधी फलक हातात धरले. 

मालेगावात हिंदू-मुस्लिम एकजुटीने बंद

मालेगावात हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन कडकडीत बंद पाळला. पाकिस्तान समर्थक अतिरेकी संघटनांच्या भ्याड कृत्याचा निषेध केला. ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाच्या वतीने मौलाना उमरेन रहमानी यांनी निषेध व्यक्त केला. त्यांनी सांगितले: "अतिरेकवादाचा बिमोड करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत." वक्फ बोर्डासाठी सुरू असलेले आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली. 

वाशीम येथे मेणबत्ती लावून श्रद्धांजली

वाशीम येथे दिघेवाडी चौकात मुस्लिम समुदायाने मेणबत्ती लावून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. "पाकिस्तान मुर्दाबाद, अतिरेकवाद मुर्दाबाद, हिंदू-मुस्लिम भाई-भाई, हम सब एक है" अशा घोषणा दिल्या. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलकांनी एकजुटीने दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter