भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी राजधानी दिल्लीत पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना मतांची अपेक्षा न ठेवता मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचा, असे आवाहन केले. भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोप भाषणात ते बोलत होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मजबूत करण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत त्याबद्दल त्यांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रांच्या माहिती नुसार, पंतप्रधान मोदींनी सर्व धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला. शिवाय त्यांनी सदस्यांना विद्यापीठे आणि चर्चला भेट देण्यास ही सांगितले. "पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांना पसमंदा मुस्लिम, बोहरा समुदाय, मुस्लिम व्यावसायिक आणि सुशिक्षित मुस्लिमांना इ भेटा, मात्र त्या बदल्यात मतांची अपेक्षा ठेऊ नका," असे सांगितल्याची माहिती ही सूत्रांनी दिली.
तसेच कोणत्याही समुदायाविरुद्ध अस्वीकार्य टिप्पणी करण्यापासून दूर राहण्याचे निर्देश मोदी यांनी भाजप नेत्यांना दिले. पारंपारिक समारोपन संबोधनादरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताच्या विकासासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे, त्यामुळेच देशाच्या या विकासाठी आपले योगदान दुप्पटीने दिले पाहिजे. 'अमृत काल'चे रुपांतर 'कर्तव्य काल'मध्ये झाले पाहिजे, तरच देशाची वेगाने प्रगती होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पने अंतर्गत सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, तसेच एकमेकांची भाषा आणि संस्कृतीशी जुळवून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या सर्व आघाड्यांना सीमावर्ती भागातील गावांशी अधिक जोडण्याचे आवाहन केले. भाजप कार्यकर्त्यांनी महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांच्या विकासात आपली भूमिका बजावावी, असेही ते म्हणाले.
याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण वाचवण्याचा मंत्रही दिला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी, पक्षाने राजकीय ठराव, सामाजिक आणि आर्थिक ठराव आणि भारताच्या G20 अध्यक्षपदावर केंद्रित असलेल्या परराष्ट्र धोरणांवरील ठराव स्वीकारले.