दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास आता वेगाने पुढे सरकत आहे. या तपासाचा भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी (१ डिसेंबर २०२५) जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशातील नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या धडक कारवाईत तपास यंत्रणेच्या हाती अनेक डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, ही शोधमोहीम जम्मू-काश्मीरमधील शोपियान, कुलगाम, पुलवामा आणि अवंतीपोरा या जिल्ह्यांमधील आठ ठिकाणी राबवण्यात आली. तसेच, उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एका ठिकाणीही छापा टाकण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमधील कारवाई ही स्फोटातील आरोपी डॉ. शाहीन याच्या खंदारी बाजार येथील निवासस्थानी करण्यात आली.
या छाप्यांमध्ये संशयितांच्या घरातून विविध डिजिटल उपकरणे आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. स्फोटामागील कटाचा पूर्ण उलगडा करण्यासाठी या साहित्याची आता फॉरेन्सिक तज्ज्ञांमार्फत बारकाईने तपासणी केली जात आहे.
फरिदाबादमध्ये मिळाले होते घबाड
याआधी २६ आणि २७ नोव्हेंबरला एनआयएने या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई आणि डॉ. शाहीन सईद यांच्याशी संबंधित ठिकाणांवर मोठे छापे टाकले होते. हे दोन्ही आरोपी व्यवसायाने डॉक्टर असून ते हरियाणातील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित आहेत.
त्या कारवाईदरम्यान तपास यंत्रणेला मोठ्या प्रमाणात रोकड, परकीय चलन, सोने आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. या पुराव्यांचे विश्लेषण सध्या सुरू असून, त्यातून कटाची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सात आरोपी कोठडीत
लाल किल्ल्याबाहेर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने आतापर्यंत सात प्रमुख आरोपींना अटक केली आहे. एनआयएची पथके सध्या या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. तपासात समोर येणाऱ्या नवीन धाग्यादोऱ्यांनुसार देशभरात विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे.