पहलगाम हल्ला : एनआयएच्या तपासात झाले 'हे' नवे खुलासे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर चौकशीचा वेगाने तपास सुरू असून, काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी जवळपास २० ते २२ तास जंगलातून पायी प्रवास करून बैसरन व्हॅलीत पोहोचले होते. सुरक्षा दलांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली असून, अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर अधिकृत तपास सुरू झाला आहे.

हल्ल्याचे तपशील
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी दोन मोबाईल फोन हिसकावून घेतले – एक पर्यटकाचा आणि दुसरा स्थानिक रहिवाशाचा. हल्ल्यात एकूण चार दहशतवादी सहभागी होते, त्यापैकी तीन पाकिस्तानी तर एक स्थानिक होता. स्थानिक दहशतवाद्याचे नाव आदिल ठोकर असल्याचे उघड झाले आहे.

फॉरेन्सिक तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, दहशतवाद्यांनी अत्याधुनिक एके-४७ आणि एम-४ असॉल्ट रायफलचा वापर केला होता. घटनास्थळी आढळलेल्या रिकाम्या पुंगळ्या (गोळ्यांच्या शेल्स) पुरावा म्हणून जप्त करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचा व्हिडीओ पुरावा
तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला आहे. हल्ल्याच्या वेळी एका स्थानिक फोटोग्राफरने झाडावर चढून आपला जीव वाचवताना संपूर्ण हल्ल्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओच्या मदतीने हल्ल्याची अचूक टाइमलाइन समजण्यास मदत होणार आहे.

प्रत्यक्षदर्शींचा जबाब महत्त्वाचा
हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी भारतीय लष्कराचे एक लेफ्टनंट कर्नल आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित होते. ते जम्मू-काश्मीरमध्येच तैनात आहेत. त्यांनी तपास यंत्रणांना हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, त्यांच्या जबाबामुळे तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे.