Nashik TCS Case : फरार आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
निदा खान
निदा खान

 

नाशिकमधील टीसीएस (TCS) युनिटमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे शोषण आणि धार्मिक छळाचा आरोप असलेल्या निदा खानला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या ४२ दिवसांपासून फरार असलेल्या निदाला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

संयुक्त मोहिमेत मिळाले यश

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. नाशिक शहर पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून निदा खानला जेरबंद केले. तिला आज (शुक्रवारी) नाशिकमध्ये आणून स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. २६ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार होती.

नऊ कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून कारवाई

नाशिकच्या टीसीएस शाखेशी संबंधित या प्रकरणात एकूण नऊ महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण आणि धार्मिक छळाच्या गंभीर तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, निदा खान व्यतिरिक्त इतर सात आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. निदा खान ही या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) गेल्या अनेक दिवसांपासून निदाचा शोध घेत होते. पथकाने मुंबई आणि लगतच्या परिसरातही शोधमोहीम राबवली होती, मात्र ती सतत पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे तिचा ठावठिकाणा मिळवण्यात पोलिसांना यश आले. टीसीएसने आधीच संबंधित संशयित कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून अशा प्रकरणांत 'झिरो टॉलरन्स' धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे.