येत्या २५ नोव्हेंबरपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होत आहे. विरोधी पक्षांचा विरोध मोडून काढत वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक तसेच 'एक राष्ट्र- एक निवडणूक' ही विधेयके मंजूर करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असेल. २० डिसेंबरपर्यंत चालणारे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीच्या विचाराधीन आहे. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात पारित करता यावे म्हणून समितीने पुढच्या आठवड्यात ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि लखनौमध्ये जाऊन विविध भागधारकांशी चर्चा करण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठका बोलविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती आज केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी 'एक्स'वर दिली. यंदा २६ नोव्हेंबर रोजी संसदेच्या केंद्रीय कक्षात ७५ वा संविधान दिवस साजरा करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
निवडणुकीनंतर अधिवेशन
वक्फ दुरुस्ती विधेयकाव्यतिरिक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी मोदी सरकार 'एक राष्ट्र-एक निवडणूक' विधेयक मांडण्याची शक्यता आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. वायनाडच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यास काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वद्रा यांचे या अधिवेशनात संसदेत प्रथमच पदार्पण होण्याची शक्यता आहे.