ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडे बोल!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 45 m ago
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

 

ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त भारताने गुरुवारी पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. पाकिस्तान पुरस्कृत सीमापार दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला पूर्ण अधिकार असून, या धोक्याविरुद्ध जागतिक लढा अधिक मजबूत करण्याचा संकल्प भारताने व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
रणधीर जयस्वाल म्हणाले की, "आज आपण ऑपरेशन सिंदूरची पहिली वर्षपूर्ती साजरी करत आहोत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला संपूर्ण जगाने पाहिला होता. सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारताने या मोहिमेद्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे." सीमापार दहशतवाद हे पाकिस्तानचे सरकारी धोरण राहिले असून, अशा परिस्थितीत आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी भारत कोणतीही कडक पावले उचलू शकतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

परराष्ट्र मंत्र्यांचा झिरो टॉलरन्सचा संदेश
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही सोशल मीडियाद्वारे या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. "ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध भारताचा ठाम निश्चय सिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत दहशतवादाबाबत 'झिरो टॉलरन्स' (अजिबात सहन न करणे) या धोरणावर ठाम आहे," असे त्यांनी नमूद केले. ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

सिंधू जल करार स्थगितच राहणार
सिंधू जल कराराबाबत (IWT) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. "पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे सोडत नाही, तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील," असे त्यांनी स्पष्ट केले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर लादलेल्या दंडात्मक उपायांचा एक भाग म्हणून हा ऐतिहासिक करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter