'ऑपरेशन सिंदूर'ला विराम देण्यात आला आहे. पण पूर्णविराम कधीच दिला जाणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर' सतत सुरू राहील, अशी मोदी सरकारची भूमिका आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत स्पष्ट केली. विरोधकांनी लष्कराचे मनोधैर्य, शौर्य आणि पराक्रमावर राजकारण करून भारतमातेच्या शौर्याच्या सिंदूरमध्ये राजकारणाची भेसळ करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर 'वरील चर्चेची सुरुवात केली आणि लोकसभेत केलेल्या निवेदनातील बहुतांश मुद्यांचा पुनरुच्चार केला.
पहलगामच्या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना यश आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ सिंह यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी मतदारयाद्यांची फेरपडताळणी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चर्चेची मागणी करीत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
'किती विमाने पाडली ते सांगणार नाही'
"या लष्करी कारवाईत पाकिस्तानची किती विमाने पडली हे मी सांगू इच्छित नाही. आपल्या प्रत्येकाला त्याची माहिती आहे. त्याचा तपशील विस्तृतपणे दिल्यास हे सभागृह दहा मिनिटांपर्यंत टाळ्यांनी निनादत राहील," असा दावा राजनाथ सिंह यांनी केला.
'मोदी-ट्रम्प यांची चर्चाच नाही'
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान किंवा पहलगामच्या घटनेपासून आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झालेली नाही, ही बाब परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. या स्पष्टीकरणानंतर या विषयावर बोलण्याचे काहीही औचित्य नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.
निर्धारित लक्ष्य साध्य
'ऑपरेशन सिंदूर दरम्यान निर्धारित करण्यात आलेले लक्ष्य आपल्या लष्कराने साध्य केले, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. "विरोधी पक्षांना 'ऑपरेशन सिंदूर' योग्य वाटत नसेल तर त्याचा पर्याय काय आहे, हे त्यांनी जनतेला सांगावे. विरोधी पक्ष सत्तेत असताना धोरणपंगुत्वाने देशाचे नुकसान केले. आताही विरोधी बाकांवर असताना त्यांची धोरणात्मक दिवाळखोरी लोकशाही आणि देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे," असा टोला राजनाथ सिंह यांनी लगावला.
पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या अणुयुद्धाच्या धमकीमुळे आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये निरपराध नागरिक गमावले आहेत. पण यापुढे आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. 'ऑपरेशन सिंदूर 'दरम्यान पाकव्याप्त काश्मीर ताब्यात का घेतले नाही, असा सवाल विरोधक विचारत आहेत. त्यांच्या पाकव्याप्त काश्मीर प्रेमाविषयी शंका वाटते. पण उशिराने का होईना, विरोधी पक्षांना ही सद्बुद्धी आली असेल तर तो दिवस निश्चितपणे उगवेल जेव्हा पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांची भारतात घरवापसी होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.