नवी दिल्ली: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) मुद्द्यावर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’बद्दल असलेले भ्रम दूर करावेत आणि या यंत्रांसाठी इंटरनेटचा होणारा वापर, अनेकदा होणारे प्रोग्रॅमिंग याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात काँग्रेसचे दिग्विजयसिंह, भाकपचे डी. राजा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, शिवसेनेचे (ठाकरेगट) अनिल देसाई, भारत राष्ट्र समितीचे के. केशवराव, अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे राज्यसभेमधील नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे हे देखील बैठकीत सहभागी झाली होते. परंतु, तृणमूल काँग्रेसने बैठकीकडे पाठ फिरवली होती. तासभर चाललेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएमबद्दल असलेले आक्षेप आणि संशय याबद्दलची भूमिका विरोधकांनी स्पष्ट केली.
काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी ‘ईव्हीएम’बद्दल अनेक प्रकारचे भ्रम असल्याचा दावा केला. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील सिटिझन कमिशन ऑफ इलेक्शन्स (सीसीई) या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे ‘ईव्हीएम’बद्दल निवडणूक आयोगाला २ मे २०२२ ला प्रश्नावली देण्यात आली होती. त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने दिलेली नाहीत. अलिकडेच रिमोट मतदान यंत्रांवर निवडणूक आयोगाने बैठक बोलावली होती. त्यात सर्व पक्षांनी एकमताने रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदानाला विरोध व्यक्त केला होता. तसेच या यंत्रांचे प्रात्यक्षिक पाहणेही नाकारले होते. त्याचा संदर्भ देत दिग्विजयसिंह म्हणाले, ‘‘ईव्हीएमबद्दल देशात शंका आहे. ईव्हीएम हे स्वतंत्र परिपूर्ण यंत्र (स्टॅन्ड अलोन मशिन) असल्याचे निवडणूक आयोगातर्फे सांगितले जात होते. आता आयोगच मान्य करतो की ते स्टॅन्ड अलोन मशिन नसून उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह इंटरनेटद्वारे टाकले जाते. तसेच त्यात प्रोग्रॅमिंगही केले जाते. त्यामुळे आक्षेप व्यक्त करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाकडून मिळायला हवीत. यंत्रांबद्दल असलेली संभ्रमावस्था दूर व्हायला हवी.’’
या वेळी खासदार कपिल सिब्बल यांनी सांगितले की, ईव्हीएम खराब होतात आणि भाजपला मते जातात हा संभ्रम केवळ राजकीय पक्षांमध्ये नसून जनतेमध्येही आहे. त्यामुळे सर्व विरोधक निवडणूक आयोगाकडे जाऊन आपल्या प्रश्नांची लेखी उत्तरे मागतील. कोणत्याही यंत्रामध्ये फेरफार होऊ शकतो. म्हणूनच लोकशाही देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर केला जात नाही.