मुन्नी बेगम
मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे राज्यभरात उत्साहाचे आणि धावपळीचे वातावरण आहे. या शपथविधी सोहळ्याला संस्मरणीय आणि वेगळे रूप देण्याच्या उद्देशाने खानापाडा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर एका विशेष डिझाईनचा आकर्षक मंच उभारण्यात आला आहे. आसामची समृद्ध संस्कृती, सण-उत्सव आणि जीवनशैलीचे एकत्र दर्शन घडवणारा हा मंच प्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री नुरुद्दीन अहमद आणि त्यांची दोन मुले, राज अहमद व दीप अहमद यांनी उभारला आहे.
पद्मश्री नुरुद्दीन अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली राज आणि दीप यांनी अगदी कमी वेळेत ही मोठी जबाबदारी पार पाडली आहे. एवढ्या कमी वेळेत इतक्या मोठ्या आकाराचा मंच उभारणे हे या दोन्ही कलाकारांसाठी एक मोठे आव्हान होते. पण त्यांनी पूर्ण निष्ठेने आणि कल्पकतेने हे काम निर्धारित वेळेत पूर्ण केले.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतातील विविध राज्यांमधील अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि निमंत्रित पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच मंचाच्या प्रत्येक भागात आसामची ओळख प्रकर्षाने दिसेल असा प्रयत्न करण्यात आला आहे. मंचाच्या सजावटीत आसामी समाजजीवनातील विविध घटकांना स्थान देण्यात आले आहे.
Inspected arrangements in Khanapara, where the NDA 3.0 Govt is set to take oath tomorrow in presence of Adarniya @narendramodi ji. pic.twitter.com/feUHAGdsB4
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) May 11, 2026
शिल्पकार दीप अहमद म्हणतात, "आम्हाला शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुख्य मंच उभारण्याची जबाबदारी मिळाली होती. इतक्या कमी वेळेत इतके मोठे काम पूर्ण करणे हे आमच्यासाठीही एक मोठे आव्हान होते. पण हा कार्यक्रम आसामसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आम्ही आमची पूर्ण ताकद पणाला लावून काम करत आहोत."
ते पुढे म्हणाले, "मंचावरून आसामची एक विशेष झलक दिसावी, हे आमचे उद्दिष्ट होते. आम्ही मंचावर आसामची जीवनशैली, सण-उत्सव, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक परंपरा यांचे प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य मंचावर संसदेच्या प्रतिकृतीसह आसामचे सांस्कृतिक घटक जोडण्यात आले आहेत. दुसरीकडे, जवळच्या इतर मंचांवर 'सत्त्र' संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे."
दीप अहमद पुढे म्हणाले, "वडील नेहमी आमच्या कामावर लक्ष ठेवून विविध बाबींवर मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांचा अनुभव आणि सल्ला आमच्यासाठी मोलाचा आहे. आजही वडील आमचे काम नेहमीप्रमाणे बारकाईने पाहत आहेत आणि कुठे काही चूक राहिल्यास ती आमच्या निदर्शनास आणून देत आहेत."
मंच उभारणीत लाकूड, फायबर, शिल्पकला आणि आधुनिक रोषणाईचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. मंचाच्या विविध भागांमध्ये आसामी लोकसंस्कृतीची प्रतीके, पारंपारिक नक्षी आणि वास्तुकलेची झलक दाखवण्यात आली आहे. विशेषतः सत्त्र संस्कृती, नामघराचे वातावरण आणि आसामच्या पारंपारिक कलेचे विविध घटक मंचाच्या सजावटीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
हा मंच आसामची संस्कृती आणि वारसा देशासमोर मांडण्याचे एक विशेष माध्यम आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना आसामच्या वारशाची आणि सांस्कृतिक विविधतेची अनुभूती घेता यावी, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

दरम्यान, खानापाडा येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवली आहे, पाहुण्यांसाठी विविध सुविधाही सुनिश्चित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाबाबत सामान्य जनतेमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भाजप सरकारला नेहमीच 'अल्पसंख्याक विरोधी' सरकार म्हटले जाते, तरीही आज त्याच सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा मुख्य मंच उभारण्याची जबाबदारी अल्पसंख्याक समाजातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींवर आहे.
खानापाडा येथील हा विशेष मंच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला एक नवा आयाम देतोय. तसेच हा सोहळा आसामच्या गौरवशाली वारशाला देशभरात नव्याने झळाळी देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मंच उभारणीच्या या उपक्रमातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, आसामी कला आणि संस्कृतीची मुळे किती खोल आणि समृद्ध आहेत. आधुनिकतेच्या काळातही आपली परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याच्या या प्रयत्नाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
विशेष म्हणजे, पद्मश्री नुरुद्दीन अहमद हे १९७५ पासून हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती घडवण्याचे आणि चित्रकलेचे काम करत आहेत. इस्लाममध्ये मूर्तीपूजा निषिद्ध असल्याने सुरुवातीला त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. पण आज हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज त्यांच्या कामाचा स्वीकार करून कौतुक करत आहेत. आणि आता त्यांची दोन्ही मुले, दीप अहमद आणि राज अहमद, त्यांच्याच पाऊलवाटेवरून चालत आहेत. नुरुद्दीन अहमद यांचे काम, निष्ठा आणि दीर्घकाळाची साधना विचारात घेऊनच नुकताच त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नळबारी जिल्ह्यातील हातीकुची येथे जन्मलेले कलासक्त व्यक्तिमत्त्व पद्मश्री नुरुद्दीन अहमद यांच्या एकनिष्ठ साधनेमुळे, अथक प्रयत्नांमुळे आणि कष्टांमुळे अनेक कलाकृती साकारल्या गेल्या. त्यांच्या हस्तस्पर्शाने गेल्या काही काळात ऐतिहासिक स्मारके, अनेक अजरामर दृश्ये, अभिजात कला आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे पूर्ण आकाराचे पुतळे जिवंत झाले आहेत.
लहानपणापासूनच कला-शिल्पाविषयी तीव्र आकर्षण वाटणाऱ्या नुरुद्दीन अहमद यांनी साकारलेले विविध मान्यवरांचे पुतळे, आसामच्या विविध संस्कृतींची प्रतीके, आणि वारशाशी जोडलेल्या अनेक संपत्तीचे नमुने त्यांच्या कलात्मक निर्मितीचे पुरावे आहेत. आसामी जनतेने अकाली गमावलेला सर्वांचा लाडका गायक झुबिन गर्ग याचे प्रतीकात्मक रूप साकारण्यापासून ते सरूसजाई येथील 'झुमाईर बिनंदिनी'चे मुख्य प्रवेशद्वार उभारण्यापर्यंत त्यांनी काम केले आहे. कार्यक्रमाचा मुख्य मंच सजवण्यापासून ते 'अॅडव्हांटेज आसाम २.०' साठी बोरझार ते खानापाडापर्यंत एकूण २० तोरणे आकर्षक रूपात सजवण्याची मोठी जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर होती.
२०१७ मध्ये दुर्गापूजेत बांबूपासून १०१ फूट उंच मूर्ती बनवून त्यांनी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'साठी तयारी केली होती, मात्र दुर्दैवाने वादळ आणि पावसामुळे त्या मूर्तीचे नुकसान झाल्याने तो विश्वविक्रम होऊ शकला नाही. पण त्या वादळानेही नुरुद्दीन अहमद यांचे मनोधैर्य खचले नाही. २०१७ मध्येच दुर्गापूजेला अवघे सहा दिवस उरले असताना दिवस-रात्र एक करून ते मूर्ती पुन्हा उभारण्यात मग्न झाले आणि एक आठवडा पूर्ण होण्याआधीच एका दिवसात ते काम पूर्ण केल्यानंतर ती मूर्ती 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये समाविष्ट करण्यात आली.
आसाम साहित्य सभेच्या पाठशाला अधिवेशनातील विज्ञान मेळाही नुरुद्दीन अहमद यांच्या हाताच्या स्पर्शाने जिवंत झाला होता. महाभारतातील पांडवांच्या राज्याची राजधानी इंद्रप्रस्थ, द ग्रेट वॉल ऑफ चायना, रोमचे कोलोझियम यांसह विविध थक्क करणाऱ्या कलात्मक कामांमुळे कीर्ती मिळवणारे नुरुद्दीन अहमद एक यशस्वी कलाकार आहेत. शिवाय त्यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला काहिलीपाडा येथील 'राजदीप स्टुडिओ' अनेक कलाकारांच्या आणि शिल्पकारांच्या प्रतिभेला वाव देण्यासोबतच त्यांना जीवन आणि उपजीविकेचा मार्गही दाखवत आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter