पाकिस्तानी आर्मीच्या कट्टर कृत्यांचा असा झाला पर्दाफाश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
LeT दहशतवाद्याच्या जनाज्याच्या नमाजमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत सहभागी झालेला लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर हाफिज अब्दुल रौफ
LeT दहशतवाद्याच्या जनाज्याच्या नमाजमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत सहभागी झालेला लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर हाफिज अब्दुल रौफ

 

अजमल शाह

लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसूरी याने नुकतीच दिलेली कबुली अत्यंत धक्कादायक आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायिक दृष्टीकोन जपण्याचा पाकिस्तानी लष्कराचा जो काही थोडासा प्रयत्न सुरू होता, तो उरलासुरला मुखवटाही आता गळून पडला आहे. जगातील महासत्तांनी आता तरी जागे व्हायला हवे, असा इशारा देणारा हा व्हिडिओ आहे. यात कसूरी याने स्पष्टपणे दावा केला आहे की, "पाकिस्तानी लष्कर आपल्या शहीद सैनिकांच्या अंत्यविधीचे नेतृत्व करण्यासाठी (नमाज-ए-जनाजा पढण्यासाठी) मला खास आमंत्रण देते." हे वक्तव्य म्हणजे एखाद्या दहशतवादी नेत्याची केवळ बढाई नाही. तर पाकिस्तानी लष्करी व्यवस्थेच्या मुळाशी किती खोलवर सडलेली वृत्ती रुजली आहे, याची ही एक भयानक कबुली आहे. भारताने गेली अनेक दशके मांडलेल्या भूमिकेला यामुळे दुजोरा मिळतो. 

पाकिस्तानी लष्कराचे गणवेशधारी सैनिक आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे जिहादी यांच्यात कोणताही फरक नाही, हेच भारताने नेहमी सांगितले आहे. हे दोन्ही एकाच कट्टरतावादी नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना कोणत्याही देशाचा कायदा नव्हे, तर एक समान जहाल विचारसरणी जोडून ठेवते. भारताला अस्तित्वहीन शत्रू मानून हजार जखमांनी रक्तबंबाळ करून नष्ट करणे, हेच त्यांचे ध्येय आहे. एक व्यावसायिक लढवय्यी फौज म्हणून पाकिस्तानी लष्कराने उभा केलेला देखावा आता उद्ध्वस्त झाला आहे. धार्मिक कट्टरतावादाची एक सशस्त्र टोळी असेच त्याचे खरे स्वरूप समोर आले आहे. जिथे दहशतवाद ही केवळ एक रणनीती नसून, एक आध्यात्मिक कर्तव्य मानले जाते.

या अधोगतीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला मुख्य बातम्यांच्या पलीकडे जाऊन या संस्थेच्या मूळ ढाच्याकडे पाहावे लागेल. पाकिस्तानी लष्कर हे अनेक दशकांपूर्वीच, विशेषतः हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांच्या कार्यकाळातच एक पारंपरिक सैन्यदलाची चौकट मोडून बाहेर पडले होते. त्यांच्याच काळात लष्कराचे व्यावसायिक ब्रीदवाक्य बदलून त्याजागी 'इमान, तकवा, जिहाद-फी-सबिलिल्लाह' (श्रद्धा, पावित्र्य आणि अल्लाच्या मार्गातील जिहाद) हे नवीन वाक्य स्वीकारले गेले. हा केवळ नावापुरता केलेला बदल नव्हता, तर सैनिकांच्या मानसिकतेचीच ती पूर्णपणे पुनर्रचना होती. 

धर्मयुद्धाला सैनिकाचे प्राथमिक कर्तव्य मानून, राष्ट्राचे संरक्षण आणि धार्मिक विस्तारवाद यातील सीमारेषाच पुसून टाकण्यात आली. काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीतून बाहेर पडणाऱ्या कॅडेट्सना केवळ सीमांचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात नव्हते, तर त्यांना वैचारिक लढाई लढण्यासाठी तयार केले जात होते. या बदलाचे परिणाम अत्यंत भयानक झाले आहेत. गेल्या काही वर्षांत ही कट्टरता बराकींपासून ते मेसपर्यंत आणि शेवटी रावळपिंडीतील मुख्यालयाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत झिरपली आहे. याचा परिणाम असा झाला की, लष्करी नेतृत्व लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद यांसारख्या गटांना राज्यासाठी धोका मानत नाही, तर त्यांना आपली 'स्ट्रॅटेजिक ॲसेट्स' (धोरणात्मक संपत्ती) आणि वैचारिक बंधू समजते.

या वैचारिक समानतेमुळेच पाकिस्तानी लष्कराने निरपराध भारतीयांचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांना सातत्याने संरक्षण दिले, पोसले आणि बळकट केले. एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेले 'ऑपरेशन सिंदूर' या वेळी जगाने ही मिलीभगत उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्या काळातील गुप्तचर अहवाल आणि समोर आलेले दृश्य पुरावे यातून त्यांच्या संगनमताचे एक विद्रूप चित्र उभे राहिले. पाकिस्तानी लष्कराच्या रुग्णवाहिका आणि जवान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह घेऊन जाताना दिसले. जेव्हा एखाद्या देशाचे राष्ट्रीय सैन्य घोषित दहशतवाद्यांना रसद पुरवते आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करते, तेव्हा तो देश एक कायदेशीर शासन म्हणून वागण्याचा अधिकार गमावतो. 

अण्वस्त्रे हाती असलेली ती एक बेबंद टोळी बनते. कसूरी याने सैनिकांच्या अंत्यविधीचे नेतृत्व करण्याचा केलेला दावा हा याच प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. लष्करी तुकड्यांमध्ये दहशतवादी नेतृत्वाबद्दल असलेला आदर आणि स्वीकारार्हता यातून दिसून येते, जे अत्यंत भीतीदायक आहे. याचा अर्थ असा होतो की, सामान्य पाकिस्तानी सैनिक आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी दहशतवादी सरदाराकडे पाहतो आणि या गटांकडून होणाऱ्या हिंसक कृत्यांचे समर्थन करतो.

ही यंत्रणा सुरळीत असून त्यातील केवळ काही घटक बिघडलेले आहेत, असा युक्तिवाद अनेकदा समर्थकांकडून केला जातो. मात्र, अशा घटनांची वारंवारता आणि व्याप्ती पाहता हा युक्तिवाद पूर्णपणे फोल ठरतो. ही सडलेली वृत्ती संस्थात्मक आहे. भ्रष्टाचारासाठी नव्हे, तर 'हिज्ब-उत-तहरीर'सारख्या कट्टरतावादी संघटनांशी संबंध असल्यामुळे आणि ज्या राज्याचे रक्षण करण्याची शपथ घेतली, तेच राज्य उलथवून 'खिलाफत' स्थापन करण्याचा कट रचल्यामुळे ब्रिगेडियर आणि मेजर दर्जाच्या सेवेतील अधिकाऱ्यांना अटक झाल्याचे आपण पाहिले आहे. 

पाकिस्तानच्या स्वतःच्या नौदल आणि हवाई तळांवर, उदा. पीएनएस मेहरानवर झालेले हल्ले आपण पाहिले आहेत. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, आतल्या मदतीशिवाय आणि हल्लेखोरांच्या विचारसरणीला सहानुभूती असणाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे हल्ले होणे अशक्य होते. हे काही अपवाद नाहीत; तर हे एका अशा लष्कराचे लक्षण आहे, ज्याने कट्टरतावादाच्या सुसरीला इतका काळ खायला घातले की, आता तो प्राणी घरातच राहायला आला आहे. भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी कट्टरतावादाचे विष पेरून आपली स्वतःची फौज सुरक्षित ठेवता येईल, असे पाकिस्तानी लष्कराला वाटत होते. पण 'परसात साप पाळून ते फक्त शेजाऱ्यांनाच चावतील अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे असते', हे इतिहासाने दाखवून दिले आहे. त्यांनी भारताविरुद्ध वापरलेल्या द्वेषाच्या विचारसरणीने आता त्यांच्याच रक्तात विष कालवले आहे. त्यांचे अधिकारी सहानुभूतीदार आणि सैनिक धर्मांध बनले आहेत.

भारताच्या दृष्टीकोनातून पाहता, या वास्तवामुळे आपल्याला शेजारी राष्ट्राशी वागण्याच्या पद्धतीत कायमस्वरूपी बदल करणे आवश्यक झाले आहे. रावळपिंडीमध्ये एक समजूतदार, धर्मनिरपेक्ष लष्करी नेतृत्व आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सुटतील, या भ्रमात राहून आंतरराष्ट्रीय समुदाय अनेक वर्षांपासून संवादाचा आग्रह धरत आहे. हा एक मोठा गैरसमज आहे. रावळपिंडीमध्ये शांततेसाठी कोणीही भागीदार नाही. कारण तिथल्या सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन धर्मनिरपेक्ष आणि बहुलवादी भारताशी शांततेने सहअस्तित्व राखण्याच्या कल्पनेलाच मुळातून नाकारतो. संघर्षावरच त्यांचे अस्तित्व आणि सत्ता टिकून आहे. उद्या जर शांतता प्रस्थापित झाली, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि राजकारणावर असलेली लष्कराची पकड ढिली होईल. त्यामुळेच आगीचा हा खेळ सुरू ठेवण्यात त्यांचा स्वार्थ आहे. ही आग कधीच विझू नये यासाठी ते अशा कट्टरतावादी हस्तकांचा वापर करतात.

शेवटी लष्कर-ए-तोयबाच्या नेतृत्वाने केलेला हा खुलासा पाकिस्तानी लष्कराच्या चारित्र्यावर अखेरचा शिक्कामोर्तब करतो. ही एक अशी संस्था आहे, जिने आपली नैतिक दिशा गमावली आहे. धार्मिक कट्टरतावादाच्या नशेत त्यांनी आपली व्यावसायिक सचोटी गहाण ठेवली आहे. ते आधुनिक लष्कराचा गणवेश घालत असतील, पण त्यांच्या कृतीतून मध्ययुगीन धर्मयुद्धाची मानसिकता दिसून येते. भारतासाठी हा धडा स्पष्ट आणि कठोर आहे. आपण गाफील राहून चालणार नाही. सीमेपलीकडून येणारे धोके केवळ भू-राजकीय नसून वैचारिक आहेत, हे ओळखून आपण अत्यंत सावध आणि आक्रमक बचावाची भूमिका घेतली पाहिजे. 

पाकिस्तानी लष्कर हे केवळ एक शत्रू सैन्य नाही, तर ते या क्षेत्राला अस्थिर करू पाहणाऱ्या एका कट्टरतावादी चळवळीची सशस्त्र शाखा आहे. जोपर्यंत जग हे वास्तव ओळखत नाही आणि त्यांना त्याच पद्धतीने वागणूक देत नाही, तोपर्यंत हिंसाचाराचे सावट उपखंडावर कायम राहील. भारताने आपल्या संरक्षणासाठी ठाम आणि कणखर राहिले पाहिजे. दहशतवाद्यांना आपल्या मृतांना आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करणाऱ्या फौजेशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, त्यामुळे हा धोका मुळासकट नष्ट करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.

(लेखक जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय, श्रीनगर येथे वकील म्हणून कार्यरत आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter