अणुऊर्जा क्षेत्रात भारताची मोठी झेप! कल्पक्कममधील स्वदेशी 'पीफबीआर' अणूभट्टी यशस्वीरीत्या कार्यान्वित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 2 h ago
कल्पक्कममधील 'पीफबीआर' अणूभट्टी
कल्पक्कममधील 'पीफबीआर' अणूभट्टी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कल्पक्कम येथील भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर'ने (PFBR) 'क्रिटिकॅलिटी' (Criticality) गाठल्याबद्दल देशाचे अभिनंदन केले आहे. "भारताच्या नागरी अणुऊर्जा प्रवासातील हे एक ऐतिहासिक आणि निर्णायक पाऊल आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी या यशाचे गौरव केले आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी या अणूभट्टीत नियंत्रित अण्विक साखळी प्रक्रिया यशस्वीरीत्या सुरू झाली.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "आज भारताने आपल्या नागरी अणुऊर्जा प्रवासात एक मोठे पाऊल टाकले असून अण्विक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा गाठला आहे. कल्पक्कममधील ही अणूभट्टी जितके इंधन वापरणार नाही त्यापेक्षा जास्त इंधन तयार करण्याची क्षमता (Breeder) ठेवते. हे आपल्या शास्त्रज्ञांच्या सखोल संशोधनाचे आणि इंजिनीअर्सच्या कौशल्याचे प्रतीक आहे."

 

भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड (BHAVINI) ने विकसित केलेली ही ५०० मेगावॅट क्षमतेची अणूभट्टी भारताच्या तीन टप्प्यांच्या अणुऊर्जा धोरणात कळीची भूमिका बजावणार आहे. यामुळे भविष्यात भारताकडे असलेल्या थोरियमच्या विशाल साठ्याचा वापर करणे शक्य होणार आहे. रशियानंतर व्यावसायिक स्तरावर 'फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर' चालवणारा भारत हा जगातील केवळ दुसरा देश ठरणार आहे.

 

या अणूभट्टीची निर्मिती पूर्णपणे 'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत करण्यात आली असून, यात २०० हून अधिक भारतीय उद्योग आणि एमएसएमई क्षेत्राचा मोठा सहभाग आहे. ही अणूभट्टी तिसऱ्या पिढीतील प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सज्ज असून, आपत्कालीन परिस्थितीत ती स्वतःहून सुरक्षितरीत्या बंद होण्याची क्षमता ठेवते.

 

या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधानांनी सर्व शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्सचे मनापासून अभिनंदन केले आहे. या अणूभट्टीच्या यशामुळे भारत भविष्यात ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वयंपूर्ण होईल आणि पर्यावरपूरक ऊर्जा निर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.