पश्चिम आशियातील युद्धाच्या सावटातही भारत प्रगतीपथावर; पंतप्रधान मोदींचा विश्वास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पश्चिम आशियातील संघर्षाचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. जगातील भीषण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही भारत प्रगती, विकास आणि विश्वासाच्या संकल्पासह पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. एका समिटमध्ये बोलताना पंतप्रधानांनी भारताच्या वाढत्या जागतिक शक्तीचा गौरव केला. गेल्या २३ दिवसांत भारताने आपली रिलेशनशिप बिल्डिंग, निर्णयक्षमता आणि संकट व्यवस्थापन क्षमता जगाला दाखवून दिली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

आज जग विविध गटांमध्ये विभागलेले असताना भारताने मजबूत आणि व्यापक भागीदारी निर्माण केली आहे. लोक अनेकदा विचारतात की भारत नक्की कोणाच्या बाजूने आहे? त्यावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, "आम्ही भारताच्या हितासाठी उभे आहोत. भारत शांतता आणि संवादाच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे."

पंतप्रधानांनी १.४८ लाख कोटी रुपयांच्या ऑइल बाँड्सचा उल्लेख केला. हा निर्णय भावी पिढ्यांवर आर्थिक ओझे टाकणारा होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही या निर्णयाच्या दीर्घकालीन परिणामांची कबुली दिली होती, याकडे मोदींनी लक्ष वेधले. २००४ ते २०१० दरम्यान काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती संकटात होत्या. त्यावेळी देशाच्या हितापेक्षा सत्तेला महत्त्व देत १४८,००० कोटी रुपयांचे ऑइल बाँड्स जारी केले गेले. 

या बाँड्सची परतफेड २०२० नंतर करायची होती. गेल्या ५-६ वर्षांत आमच्या सरकारने काँग्रेसचा हा 'पाप' धुण्याचे काम केले आहे. १४८,००० कोटी रुपयांच्या ऐवजी देशाला व्याजासह ३ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागली. म्हणजे आम्हाला जवळजवळ दुप्पट रक्कम द्यावी लागली. हे पाप धुण्याची किंमत देशाला खूप महाग पडली आहे, असेही ते म्हणाले.

कोरोना महामारीनंतर आव्हाने एकामागून एक वाढतच गेली आहेत. असे एकही वर्ष गेले नाही ज्याने भारत आणि भारतीयांची कसोटी घेतली नाही. पण १४० कोटी देशवासियांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारत प्रत्येक संकटाचा सामना करत पुढे जात आहे. युद्धाच्या परिस्थितीतही जगातील अनेक देश भारताचे धोरण आणि रणनीती पाहून थक्क झाले आहेत. २८ फेब्रुवारीपासून जगात जी खळबळ उडाली आहे, त्या प्रतिकूल स्थितीतही भारत विकास आणि विश्वासाने पुढे जात आहे.

जागतिक पुरवठा साखळी डळमळीत होत असताना भारताने लवचिकता आणि विविधतेचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे. आखाती देशांपासून ते पाश्चात्य जगापर्यंत आणि ग्लोबल साऊथपासून ते शेजारील देशांपर्यंत भारत सर्वांचा विश्वासू जोडीदार बनला आहे. ऊर्जा, खते किंवा जीवनावश्यक वस्तू असोत, भारतीय नागरिकांना किमान समस्यांना सामोरे जावे लागेल याची खात्री करण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.