१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीर जवानांना आज संपूर्ण देशाने अभिवादन केले. या हल्ल्याच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे शहीद जवानांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी आपल्या संदेशात जवानांच्या भक्ती, दृढनिश्चय आणि देशसेवेचा गौरव केला आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "२०१९ मध्ये आजच्या दिवशी पुलवामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांचे स्मरण करताना, त्यांची भक्ती, दृढनिश्चय आणि देशसेवा नेहमीच आपल्या सामूहिक चेतनेत कोरलेली राहील. प्रत्येक भारतीय त्यांच्या या अदम्य साहसातून शक्ती मिळवतो." जवानांच्या या त्यागामुळेच देश सुरक्षित असून त्यांचे शौर्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
१४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारताच्या सुरक्षेच्या इतिहासातील 'ब्लॅक डे' म्हणून ओळखला जातो. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ताफ्यावर एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन आदळले होते. या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने अवघ्या काही दिवसांतच पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर 'एअर स्ट्राईक' करून शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले होते.
पंतप्रधानांसह उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील जवानांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, "पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांचे सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मृतीत नेहमीच कोरले जाईल आणि एक मजबूत आणि सुरक्षित भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील."
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट करत म्हटले की, दहशतवाद हा संपूर्ण मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू असून भारत तो मुळापासून नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे. शूर जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
आज देशभरात विविध ठिकाणी शहीद जवानांच्या स्मरणार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि लष्करी तळांवर जवानांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.