पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी आणि परकीय चलनाचा खर्च कमी करण्यासाठी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येत मोठी कपात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी देशाला इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि काटकसरीने खर्च करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाची अंमलबजावणी स्वतःपासून करत मोदींनी आपल्या ताफ्याचा आकार मर्यादित केला आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या अलीकडील गुजरात आणि आसाम दौऱ्यात त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली होती. एसपीजी (SPG) प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा कायम ठेवून ही कपात करण्यात आली आहे. याशिवाय, नवीन खरेदी न करता उपलब्ध असल्यास ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनीही उचलली पावले
पंतप्रधानांच्या या पावलाचा आदर्श घेत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही आपल्या ताफ्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या आणि इतर मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या तातडीने ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेश : मुख्यमंत्री मोहन यादव यांनी किमान वाहनांचा वापर करण्याचे जाहीर केले असून मंत्र्यांनाही तशाच सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र : राज्य सरकारने सर्व मंत्र्यांना अधिकृत प्रवासासाठी विमान वापरण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
गुजरात : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हेलिकॉप्टरऐवजी ट्रेन आणि एसटी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी आपला अमेरिका दौरा रद्द केला आहे.
ही काटकसर नव्हे, तर शहाणपणा
पंतप्रधान मोदींचे हे आवाहन म्हणजे 'Austerity Measures' (कडक आर्थिक निर्बंध) नसून 'Spending Wisely' (समंजस खर्च) असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सरकार भांडवली खर्च, जनकल्याणकारी योजना किंवा सबसिडीमध्ये कोणतीही कपात करत नाहीये. केवळ इंधनाचा वापर कमी करणे, आयात वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणे आणि परकीय चलन वाचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक इंधन दरातील अस्थिरता लक्षात घेता मोदींनी रविवारी देशवासीयांना कारपूलिंग, मेट्रोचा वापर आणि घरून काम (WFH) करण्यासारख्या पर्यायांचा विचार करण्याचे सुचवले होते.