फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंडिया वन’ या विशेष विमानाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर केल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असल्याने हा मार्ग निवडण्याशिवाय पर्याय नव्हता. पाकिस्तानने परवानगी दिल्यानंतर मोदींचे विमान त्यांच्या हद्दीतून गेले.
४६ मिनिटांचा पाकिस्तानमधून प्रवास
पाकिस्तानी वृत्तसंस्था 'एआरवाय' च्या माहितीनुसार, मोदींचे विमान शेखपुरा, हफिजाबाद, चकवाल आणि कोहाट या पाकिस्तानच्या भागांमधून फ्रान्सच्या दिशेने गेले. एकूण ४६ मिनिटांपर्यंत भारताच्या पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत होते.
यापूर्वीही पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर
ही पहिलीच वेळ नाही, याआधी ऑगस्ट २०२४ मध्ये युक्रेनहून दिल्लीला परतताना पंतप्रधान मोदींच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास केला होता. त्यावेळी विमानाने चित्राल मार्गे पाकिस्तानात प्रवेश केला आणि नंतर इस्लामाबाद व लाहोरच्या हवाई नियंत्रण कक्षातून भारताच्या दिशेने मार्गक्रमण केले.
२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर तणाव, नंतर नागरी उड्डाणांना परवानगी
२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता, ज्यामुळे पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. मात्र, नागरी उड्डाणांसाठी नंतर परवानगी देण्यात आली आणि महत्त्वाचे हवाई कॉरिडॉर खुले करण्यात आले.