पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर रवाना झाले. "हा दौरा भारताचे या दोन्ही देशांशी असलेले संबंध अधिक दृढ करील," असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधानांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान गुरुवारी (ता. २४) भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या करारांतर्गत भारत ब्रिटिश व्हिस्की, कार आणि काही अन्नपदार्थावरील आयातशुल्क कमी करणार आहे, तर ब्रिटन भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातील उत्पादने आणि इलेक्ट्रिक वाहनांना शुल्कमुक्त प्रवेश देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराला मंजुरी
दिली होती. ब्रिटन दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान म्हणाले, "भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यूहात्मक भागीदारी गेल्या काही वर्षात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, शिक्षण, संशोधन, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये विस्तारले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्याशी माझी भेट होणार असून, या भेटी दोन्ही देशांमध्ये विकास, रोजगारनिर्मिती साधण्यासाठी आर्थिक भागीदारी अधिक बळकट करण्याचा मुद्दा चर्चिला जाणार आहे."
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात किंग्ज चार्ल्स (तिसरे) यांचीही भेट घेणार आहेत. ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान मालदीव येथे जातील. अध्यक्ष महंमद मोईझू यांच्या निमंत्रणावरून ते मालदीव येथे जाणार असून, मालदीवच्या ६० व्या निर्मितीदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत