अमृतपालसिंगचा पोलिसांकडून तपास सुरूच

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
मंगळावरपर्यंत इंटरनेट सेवा स्थगित
मंगळावरपर्यंत इंटरनेट सेवा स्थगित

 

 खलिस्तान समर्थक अमृतपालसिंग याच्या मुसक्या आवळण्यासाठी पंजाब पोलिसांची आज सलग तिसऱ्या दिवशी शोध मोहीम सुरू होती. अमृतपाल हा पोलिसांच्या हाती लागला नसला तरीसुद्धा त्याचे काका आणि चालकाने जालंधरमध्ये पोलिसांसमोर शरणागती पत्करली. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तूर्त इंटरनेट आणि एसएमएस सेवा मंगळवार (ता.२१)दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. अमृतपालचे काका हरजित सिंग आणि त्यांचा चालक हरप्रितसिंग यांनी रविवारी रात्री मेहातपूर भागातील बुलंदपूर गुरुद्वारा येथे शरणागती पत्करली. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक (बॉर्डर रेंज) नरेंद्र भार्गव आणि अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.

 

हरजितसिंग शरणागती पत्कारत असतानाचे काही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले असून यावेळी त्यांच्याकडे ३२ बोअरचे पिस्तूल एक ते सव्वा लाख रुपये रोख रक्कम होती. एका तस्कराकडून खरेदी करण्यात आलेल्या आलिशान मर्सिडीज कारमध्ये बसून ते पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी तूर्त ही कार देखील जप्त केली आहे. हरजित आणि हरप्रित यांचा ताबा अमृतसर ग्रामीण पोलिसांकडे आहे. गायक आणि पंजाबी कार्यकर्ता दीप सिद्धू याने स्थापन केलेल्या ‘वारिस पंजाब दे’ ही संघटना ताब्यात घेण्यासाठी हरजित यांनीच अमृतपालला मदत केल्याचे बोलले जाते. हरजित यांनीच वेळोवेळी अमृतपालचे समर्थन केल्याची बाब उघड झाली आहे. आपल्या साथीदारांच्या सुटकेसाठी अंजाला पोलिस ठाण्यावर सशस्त्र जमावासह हल्ला केल्याप्रकरणी अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी याआधीच त्यांच्याविरोधात गुन्हेही नोंदविले आहेत.

 
पाच साथीदारांना एनएसए
अमृतपालसिंगच्या पाच साथीदारांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी आज दिली. आतापर्यंत या प्रकरणामध्ये पाचजणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून ११४ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अन्य परकी घटकांचा संबंध आहे का? हे देखील पडताळून पाहिले जात आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दलजितसिंग कलसी, भगवंत सिंग, गुरमित सिंग आणि प्रधानमंत्री बाजेके यांच्याविरोधात ‘एनएसए’अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांना आसामच्या दिब्रुगड केंद्रीय तुरुंगात हलविण्यात आले आहे.

दिवसभरात
- पंजाबमध्ये नाकाबंदी, सुरक्षेमध्येही वाढ
- अनेक भागांतील सार्वजनिक वाहतूक बंद
- जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशच्या सीमा सील
- दलजित कलसीला परदेशातून मदत निधी
- दिल्लीत ब्रिटिश उच्चायुक्तालयासमोर आंदोलन
 

आत्मघातकी हल्लेखोरांची निर्मिती
केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतपाल व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली आत्मघातकी हल्लेखोर तयार करत होता. ‘आयएसआय’च्या सांगण्यावरूनच हे सर्वकाही केले जात होते. पाकिस्तानातून बेकायदेशीररीत्या शस्त्रे मागविली जात होती तसेच ती येथे साठवून ठेवली जात होती. या शस्त्रांच्या माध्यमातून आनंदपूर खालसा फोर्स तयार केली जात होती. अमृत संचारच्या नावाखाली हे सगळे काही सुरू होते.