जम्मू
अमरनाथ यात्रेकरूंसाठी आणि जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. अमरनाथ यात्रा मार्गावरील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी ३,५०० कोटी रुपयांच्या ६० किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पांची तयारी सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. यामध्ये केवळ अमरनाथ यात्रा मार्गच नाही, तर माता वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या भाविकांसाठी ८८० कोटी रुपयांचे कटरा इंटरमोडल स्टेशन उभारले जाणार आहे, जे रेल्वे, रस्ते आणि हेलिपॅड सेवांना एकत्र जोडेल.
याव्यतिरिक्त, केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ३०,००० कोटी रुपयांच्या ५४ रोप-वे प्रकल्पांचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात अमरनाथ गुहा मंदिर, शंकराचार्य मंदिर, थजीवास ग्लेशियर आणि भद्रवाहसह आठ ठिकाणी १६,००० कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले जातील.
जम्मू-काश्मीरमधील दळणवळण सुलभ करण्यासाठी ५०,००० कोटी रुपयांचे चार हाय-स्पीड कॉरिडॉर्स उभारले जात आहेत. यामध्ये जम्मू-उधमपूर-श्रीनगर आणि श्रीनगर-बारामुल्ला-उरी यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. यामुळे काश्मीर खोरे, चेनाब खोरे आणि सीमेवरील महत्त्वाच्या भागांशी संपर्क सुधारून पर्यटन, व्यापार आणि लष्करी हालचालींना मोठी मदत होईल.
या सर्व विकासकामांमध्ये ४१,००० कोटी रुपयांचा दिल्ली-अमृतसर-कटरा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये या प्रकल्पाचा १४३ किलोमीटरचा भाग ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे दिल्ली ते कटरा हे अंतर ५८ किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच, श्रीनगर आणि जम्मू रिंग रोडमुळे शहरांमधील ट्रॅफिकची समस्या सुटून दळणवळण अधिक जलद होणार आहे.