नैऋत्य मान्सूनचा प्रवास महाराष्ट्राच्या दक्षिण भागातच स्थिरावल्याने देशात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या आकडेवारीनुसार, ४ जून ते १८ जून या कालावधीत देशात सामान्य पावसाच्या तुलनेत ४१ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. देशात या काळात ७२.२ मिमी पावसाची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ ४२.६ मिमी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात पावसाची तूट ६७ टक्के, पूर्व आणि ईशान्य भारतात ४२ टक्के, दक्षिण द्वीपकल्पात २२ टक्के आणि उत्तर-पश्चिम भारतात ६ टक्के इतकी आहे.
मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास मंदावण्यास पाच प्रमुख हवामानविषयक घटक कारणीभूत ठरले आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सून प्रवाहातील तीव्रता कमी होणे, कमी दाबाचे पट्टे नसणे आणि भूमध्य रेषेवरील वारे कमकुवत होणे यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढचा प्रवास थांबला आहे. याशिवाय, 'मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन' (MJO) ची स्थितीही सध्या कमकुवत असल्याने पुढील ४-५ दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पाऊस विरळ स्वरूपाचाच राहण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा संथ प्रवास आणि पॅसिफिक महासागरातील 'एल निनो' स्थितीमुळे खरिपाच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या पार्श्वभूमीवर राज्यांच्या कृषी विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी किंवा अनियमित राहण्याची शक्यता आहे, तिथे जिल्हावार आपत्कालीन पीक नियोजन तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून जलसंधारण, पीक पद्धतीत बदल आणि पर्यायी पीक नियोजनावर भर देण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.