जगातील विविध देशांमधील संघर्ष, इंधनाचे वाढते दर आणि जागतिक व्यवस्थेतील प्रचंड गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, आता 'भारताची वेळ आली आहे' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केले.
जागतिक समुदायाकडे सध्या ज्या सर्वांगीण आणि शाश्वत उपायांची कमतरता आहे, ते उपाय देण्याची क्षमता केवळ भारतामध्येच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
पश्चिम आशियातील युद्धाचा संदर्भ देत आणि ज्या देशांचा या संघर्षाशी थेट संबंध नाही त्यांनाही याचा कसा फटका बसत आहे, हे सांगताना भागवत म्हणाले की, जग नेहमी शक्ती बाळगणाऱ्यांचेच ऐकते. त्यामुळे आपल्याला आपला देश 'परम वैभवशाली' आणि शक्तिशाली बनवावा लागेल. "जगातील युद्धांशी ज्या देशांचा थेट संबंध नाही, ते देखील यामध्ये ओढले जात आहेत. युद्ध इराण आणि अमेरिकेत सुरू आहे, पण इंधनाचे दर इथे भारतात वाढत आहेत," असे सरसंघचालक म्हणाले.
जागतिक शांतता
सरसंघचालक पुढे म्हणाले की, जगभरातील लोकांना हे माहीत आहे की भारत नेहमी सत्याची भाषा बोलतो, तरीही केवळ ते सत्य आहे म्हणून त्याचा स्वीकार केला जात नाही. शक्तिशाली देश नेहमी आपल्या मनाप्रमाणे वागतात आणि ज्यांच्याकडे ताकद नसते ते त्यांचे ऐकतात आणि मान खाली घालतात. तुम्ही दुसऱ्या देशावर कब्जा करा, कोणावर बॉम्ब टाका किंवा जगाचा इंधन पुरवठा खंडित करा, हे सर्व केवळ ताकदीच्या जोरावरच घडते. भारत हा आध्यात्मिक आणि धार्मिक जीवनाचा देश असल्याने जगाला 'धर्म' आणि सन्मार्ग दाखवणे हेच भारताचे ध्येय आहे.
आज संपूर्ण जग अंतर्गत भांडणांमध्ये अडकले आहे. विकास आणि पर्यावरण रक्षण या दोन्ही गोष्टींमध्ये सुवर्णमध्य कसा साधायचा, हे जगाला समजेनासे झाले आहे. अशा वेळी जगाला भारताची नितांत गरज आहे, कारण या सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवणारे 'तत्त्व' इतर कोणत्याही देशात उपलब्ध नाही. जग आता एका नवीन मार्गाचा शोध घेत आहे आणि तो मार्ग भारतच दाखवू शकतो, म्हणूनच आता भारताची वेळ आली आहे. मात्र, केवळ वेळ आल्याने गोष्टी घडत नाहीत, तर आपल्याला त्या वेळेसाठी स्वतःला सज्ज करावे लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अंतर्गत आव्हानांवर चिंता
सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, मानवी हक्क आणि सामाजिक हित यांच्यातील गोंधळात जग अडकले आहे. एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत अधिकार दिले की समाजाचे हित धोक्यात येते आणि जर समाजाला जास्त अधिकार दिले तर व्यक्तीचे स्वातंत्र्य धोक्यात येते. भौतिक विकासासाठी पर्यावरणाचे शोषण केले जात आहे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी विकास थांबवण्याची मागणी केली जात आहे. या गोंधळातून मार्ग काढण्याची क्षमता भारताच्या जीवनमूल्यांमध्ये आहे. भारताला 'विश्वगुरू' बनण्यापासून जर काही रोखत असेल, तर ती आपली अपूर्ण तयारी आहे.
आपल्याच समाजात असे काही लोक आहेत जे आपापसात भेद निर्माण करण्याचे काम करत आहेत. भारताला जागतिक पातळीवर मोठे होऊ न देणाऱ्या शक्ती सामाजिक जीवनात छोटी-छोटी कारणे शोधून अशांतता निर्माण करण्यासाठी टपून बसल्या आहेत. जर ही भारतीय मूल्ये मजबूत झाली तर जागतिक मंचावरून आपले स्थान जाईल, अशी भीती वाटणारे अनेक घटक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या परंपरांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कुमार मंगलम बिर्ला यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे कौतुक केले. १०० वर्षे जुनी असलेली ही संस्था देशासमोरील आव्हानांच्या काळात नेहमीच समाज आणि राष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे, असे बिर्ला म्हणाले.