युरोपीय देशांची शस्त्रे भारतावर चालवली जातात; फिनलंडमध्ये एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्यांना सुनावले खडे बोल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

फिनलंडमधील कुलतारंता संवाद (Kultaranta Talks) कार्यक्रमात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युरोपीय देश आणि अमेरिकेला सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. युरोपीय देशांची शस्त्रे भारतावर हल्ले करण्यासाठी वापरली जातात, मात्र भारताने कधीही युरोपच्या सुरक्षेला धोका पोहोचवला नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. तसेच, जागतिक ऊर्जा बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी खुद्द अमेरिकेनेच भारताला रशियन तेल खरेदी करण्याची विनंती केली होती, असा मोठा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

युरोपीय शस्त्रांचा भारतावर वापर

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतावर 'नैतिकदृष्ट्या दुटप्पी' भूमिका घेतल्याचा आरोप करणाऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांची कोंडी केली. ते म्हणाले, "कोणत्याही युरोपीय देशावर भारतीय शस्त्रांनी हल्ला झालेला नाही. पण भारताच्या बाबतीत युरोपीय शस्त्रांबाबत असे म्हणता येणार नाही. युरोपीय देश अशी शस्त्रे विकतात ज्यांचा वापर भारतावर हल्ला करण्यासाठी होतो." त्यांचा हा रोख पाकिस्तानला युरोपीय देशांकडून वर्षानुवर्षे मिळणाऱ्या लष्करी सामग्रीकडे होता. "आम्ही भारतीयांनी युरोपला धोका पोहोचवणारे कोणतेही कृत्य कधीही केलेले नाही," असे जयशंकर यांनी ठणकावून सांगितले.

तेल खरेदीबाबत अमेरिकेचा दुटप्पीपणा

रशियन तेल आयातीबाबत भारताच्या धोरणाचे समर्थन करताना जयशंकर यांनी अमेरिकेच्या दुटप्पीपणावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी भारत रशियाकडून फारसे तेल खरेदी करत नव्हता. मात्र युद्धानंतर जागतिक ऊर्जा बाजारपेठेत खळबळ माजल्यानंतर, अमेरिकेनेच भारताला बाजारातील स्थिरता कायम राखण्यासाठी रशियन तेल खरेदी करण्याची विशेष विनंती केली होती.

अमेरिकेच्या निर्बंधांच्या धोरणावर टीका करताना जयशंकर म्हणाले, "जेव्हा त्यांना सोयीचे असते तेव्हा निर्बंध लादले जातात आणि जेव्हा सोयीचे नसते तेव्हा ते मागे घेतले जातात. यात कोणतेही महान तत्त्व नाही. आम्ही सगळे प्रौढ आहोत आणि हा काय खेळ चालला आहे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे यात नैतिकतेचा आव आणण्याची काहीही गरज नाही."

देशाचे आर्थिक हित सर्वोपरी

भारताची ऊर्जा खरेदी ही जागतिक बाजारपेठेतील वास्तविकता आणि देशाच्या आर्थिक गरजांवर आधारित असल्याचे त्यांनी मंचावरून स्पष्ट केले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युरोपीय देशांनी मध्यपूर्वेतील तेल मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे भारताला ناईलाजाने रशियन तेलाकडे वळावे लागले, असे जयशंकर यांनी निदर्शनास आणून दिले. भारताने नेहमीच युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी मुत्सद्देगिरी आणि संवादाचे आवाहन केले असून, देशाची इंधन सुरक्षा ही कोणत्याही बाह्य दबावापासून मुक्त राहील, याची पुष्टी त्यांनी या युरोप दौऱ्यात केली.