नवी दिल्ली
भारतीय तटरक्षक दलामध्ये (ICG) महिला अधिकाऱ्यांच्या समावेशासाठी आणि त्यांच्या सेवा शर्तींमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने मंगळवारी एका नवीन धोरणात्मक सुधारणेची घोषणा केली आहे. या धोरणामुळं महिला उमेदवारांना पुरुषांच्या बरोबरीने कायमस्वरूपी नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच त्यांना आयसीजीच्या जहाजांवर महत्त्वाच्या मोहिमांवर तैनात केले जाणार आहे.
कर्तव्य भवन-२ येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दोन महत्त्वाच्या धोरणात्मक सुधारणांचे अनावरण केले. सागरी सुरक्षा यंत्रणेत 'नारी शक्ती' आणि समान संधी वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार, महिला उमेदवारांना शॉर्ट सर्व्हिस अपॉइंटमेंट्स (SSA) आणि पर्मनंट अपॉइंटमेंट्स (PA) मध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाईल, तर पुरुष उमेदवारांसाठीही शॉर्ट सर्व्हिस अपॉइंटमेंटचा पर्याय खुला करण्यात आला आहे. आता महिला कर्मचाऱ्यांनाही पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणेच उच्च पातळीचे प्रशिक्षण आणि करिअर प्रगतीची समान संधी मिळणार आहे. याआधी महिला कर्मचाऱ्यांना मुख्यतः लॉजिस्टिक भूमिकांमध्ये नियुक्त केले जात होते, परंतु या नवीन धोरणामुळं त्या आता ऑपरेशनल, एक्झिक्युटिव्ह आणि टेक्निकल भूमिकांमध्येही कार्यरत राहू शकतील.
याशिवाय, संरक्षन मंत्रालयाने आणखी एक महत्त्वाची सुधारणा लागू केली आहे, ज्या अंतर्गत ड्युटीवर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या आयसीजी जवानांना अनुग्रह अनुदानासाठी 'मृत घोषित' (presumed dead) मानण्याच्या प्रक्रियेला सुलभ करण्यात आले आहे. यामुळे अशा कठीण प्रसंगात जवानांच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत व प्रशासकीय प्रक्रिया जलद होईल आणि त्यांना विनाकारण प्रतीक्षा करावी लागणार नाही. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि आयसीजी महासंचालक परमेश शिवमणी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.