JHARKHAND MAOIST: एक कोटींचे बक्षीस असलेला कुख्यात माओवादी मिसिर बेस्रा पोलिसांच्या जाळ्यात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 3 h ago
 झारखंडमधील धनबाद येथून एक कोटींपेक्षा अधिक बक्षीस असलेला कुख्यात माओवादी मिसिर बेस्रा याला अटक.
झारखंडमधील धनबाद येथून एक कोटींपेक्षा अधिक बक्षीस असलेला कुख्यात माओवादी मिसिर बेस्रा याला अटक.

 

रांची

झारखंडमधील सुरक्षा दल आणि पोलिसांना नक्षलवादविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले असून, १ कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस असलेला कुख्यात माओवादी मिसिर बेस्रा याला मंगळवारी संध्याकाळी धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला आहे.

मिसिर बेस्रा हा झारखंड आणि ओडिशामधील विविध राज्यांमध्ये माओवादी कारवायांसंबंधी अनेक गंभीर प्रकरणांमध्ये हवा होता. गिरिडीह जिल्ह्यातील हरलाडीह येथील निवासी असलेला बेस्रा याला धनबाद जिल्ह्यातील बारवड्डा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मणियाडीह परिसरातून अटक करण्यात आली. या धडक कारवाईदरम्यान त्याच्यासोबत इतर दोन माओवाद्यांनाही जेरबंद करण्यात आले आहे.

१६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दरम्यान, याच दिवशी झारखंड पोलिसांसमोर १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये एकूण ३९ लाखांचे एकत्रित बक्षीस असलेल्या सहा जणांचा समावेश आहे. यामध्ये १२८ गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आणि १५ लाखांचे इनाम असलेला संतोष महतो उर्फ ​​वासुदेव दा उर्फ ​​दिलीप याच्यासह दोन उपझोनल कमिटीचे सदस्य आणि दोन एरिया कमिटीचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. सुरक्षा यंत्रणांच्या या सक्त कारवाईमुळे राज्यातील नक्षली चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.