देशातील बळीराजासह संपूर्ण जनता ज्याची आतुरतेने वाट पाहत असते, तो नैऋत्य मान्सून अखेर गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. सामान्यतः मान्सून १ जूनच्या सुमारास केरळमध्ये पोहोचतो, ज्याच्यासोबतच देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या हंगामाची सुरुवात होते. यंदा मान्सून काही दिवस उशिराने दाखल झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या उर्वरित भागांसह संपूर्ण लक्षद्वीप बेट समूह, केरळ, माहे, तसेच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांत पुढे सरकला आहे. याशिवाय बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागातही मान्सूनने प्रगती केली आहे. यापूर्वी हवामान विभागाने २६ मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता, मात्र प्रत्यक्षात त्याला काही दिवसांचा विलंब झाला.
यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
मान्सूनचे आगमन झाले असले तरी हवामान विभागाने गेल्या आठवड्यात आपल्या सुधारित अंदाजात स्पष्ट केले आहे कि, यंदा देशात मोसमी पाऊस सामान्य पातळीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, या वर्षी भारतात दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) केवळ ९० टक्के पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या मानकानुसार, जर मान्सून हंगामात पाऊस ९० टक्क्यांपेक्षा कमी झाला तर तो 'अपुऱ्या' पावसाच्या श्रेणीत मोडतो.
दीर्घकालीन सरासरी म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात ३० ते ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत पडलेल्या पावसाची सरासरी होय. १९७१ ते २०२० या कालावधीतील आकडेवारीवर आधारित संपूर्ण देशातील हंगामी पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेंटीमीटर आहे.
'एल निनो'चे सावट
यंदा पाऊस कमी पडण्यामागे पॅसिफिक महासागरात निर्माण होणारी 'एल निनो' (El Nino) स्थिती कारणीभूत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे भारतातील मान्सूनच्या पावसावर नकारात्मक परिणाम होतो आणि पाऊस कमी पडतो. सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक प्रदेशात एल निनोची स्थिती सक्रिय होत आहे. जून महिन्यात हा प्रभाव कमी असला तरी सप्टेंबर महिन्यापर्यंत एल निनोची स्थिती मध्यम ते तीव्र स्वरूपाची होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.