भारतात इस्लामच्या प्रभावी प्रसाराचा इतिहास काही हजार वर्षांपूर्वी सुरू होतो. येथूनच मुस्लिम कवींमध्ये कृष्णप्रेम दिसून येते. अमीर खुसरो यांच्या काळापासून शायरीत म्हणजेच कवितेमध्ये कृष्णप्रेमाचा प्रवाह निर्माण झाला आणि तो आजही सुरू आहे. या कवींनी कृष्णावरील प्रेमाची गोडी कवितेच्या माध्यमातून दिली. अशाच काही मुस्लिम कवींबद्दल या लेखातून जाणून घेऊया.
भक्ती चळवळ आणि सुफीवाद
त्या कवींबद्दल जाणून घेण्यापूर्वी, साहित्याच्या इतिहासाच्या त्या भागाची जाणीव असणे देखील महत्त्वाचे आहे जिथे प्रेमाचा प्रवाह फुटतो. भारतीय कवितेतील भक्तीचा काळ १४ व्या शतकापासून उदयास आला असे मानला जाते. सुफीवाद याच सुमारास काव्यात प्रस्थापित झाला होता. सुफी कवी हे खरे तर प्रेमी कवी होते आणि त्यांच्या कवितांमध्ये रहस्यभाव ठळकपणे दिसत होता. म्हणजे एका स्तरावर कविता ऐहिक प्रेमाच्या अनुभूतीने ओतलेली दिसते आणि दुसऱ्या स्तरावर ती आध्यात्मिक प्रेमाचा अनुभवही देते.
अमीर खुसरोचे कृष्णावरील प्रेम
हजरत निजामुद्दीन औलिया यांचे सर्वात आवडते शिष्य अमीर खुसरो मानले गेले. अमीर खुसरो यांच्याशी कृष्णाच्या प्रेमा संदर्भात एक घटना सांगितली जाते. असे म्हणतात की, हजरत औलियाच्या स्वप्नात कृष्ण प्रकट झाला होता आणि त्यानंतर औलिया यांनी खुसरोला कृष्णासाठी काहीतरी तयार करण्यास सांगितले होते. याच प्रेरणेने अमीर खुसरो यांनी 'छाप तिलक सब छीन ली रे मोसे नैना मिला के' ही उत्कृष्ट रचना केली. तुम्हाला या रचनेत थेट कृष्णाचे नाव सापडणार नाही. मात्र त्या आशयाची काव्य तुम्हाला सापडतात. यामुळे आपला विश्वास बसेल की खुसरो यांनी या रचना कृष्णाला समर्पित केल्या आहेत.
उदाहरणार्थ : 'रे सखी में जो गई थी पाणी भरण को, छे झपट मोरी मटकी पत्की मोसे नैना मिला के।'
सुफी काळातील आणखी काही कृष्णप्रेमी
ओडिशा राज्याचे राज्यपाल असलेले गांधीवादी विश्वंभर नाथ पांडे यांनी त्यांच्या एका लेखात सूफीवादाची तुलना वेदांताशी केली. यामध्ये त्यांनी सांगितले की,”सईद सुलतान या कवींनी ‘नबी बंगश’ या ग्रंथात इस्लामच्या मान्यतेनुसार कृष्णाला पैगंबर ही पदवी दिली होती.
नाथ पांडेंच्या या लेखात अली रझा नावाच्या कवीचाही उल्लेख आहे ज्याने राधा आणि कृष्णाच्या प्रेमावर खूप काही लिहिलं. सुफी कवी अकबर शाह यांच्या उल्लेखासोबतच पांडे यांच्या म्हणण्यानुसार बंगालचे सुलतान, नाझीर शाह आणि सुलतान हुसेन शाह यांनी महाभारत आणि भागवत पुराणाचा पहिल्यांदाच बंगालीत अनुवाद केला.
रासखान यांचे कृष्ण प्रेम
दिल्लीतील गदारोळामुळे हताश झालेल्या रासखानने वृंदावन आणि मथुरा हे आपले घर बनवले. या मागचे कारण असे की, रासखान हा कृष्णाच्या प्रमात होता. रासखान यांचे मूळ नाव सईद इब्राहिम. अनेक समीक्षक आणि अभ्यासक रासखान यांच्या कवितांना सूरदास यांच्या काव्य रचनेच्या बरोबरीचे मानतात. सईद इब्राहिम यांच्या बद्दल असे सांगितले जाते की त्यांनी सर्वप्रथम भगवद्गीतेचा फारसीमध्ये अनुवाद केला होता.
रितिकालचे आलम शेख
रितिकालीन कवी आलम शेख यांनी ‘आलम केली’, ‘श्याम स्नेही’ आणि ‘माधवनाल-काम-कांडला’ इत्यादी पुस्तकांची रचना केली. ‘हिंदी साहित्याचा इतिहासा’मध्ये आचार्य रामचंद्र शुक्ल यांनी लिहिले आहे की आलमचा प्रेमाच्या दृष्टिकोनातून 'रसखान'शी संबंध असावा. आलम यांच्या कृष्ण कवितेच्या काही ओळी पहा
पालने खेलत नंद-ललन छलन बलि,
गोद लै लै ललना करति मोद गान है..
‘आलम’ सुकवि पल पल मैया पावै सुख,
पोषति पीयूष सुकरत पय पान है.
रहीमने कृष्ण कविताही रचली
दरबारी कवी म्हणून ओळखले जाणारे अब्दुल रहीम खानखाना हे तुलसीदासांचे जवळचे मित्र असल्याचेही म्हटले जाते. रहीम यांनी वेळोवेळी कृष्ण कविताही रचल्या. त्यांनी रचलेल्या काव्यातील काही अंश
जिहि रहीम मन आपुनों, कीन्हों चतुर चकोर
निसि बासर लाग्यो रहे, कृष्ण चन्द्र की ओर
ललित कलित माला का जवाहर जड़ा था
चपल चखन वाला चांदनी में खड़ा था
कटितर निच मेला पीत सेला नवेला
अलिबिन अलबेला ‘श्याम’ मेरा अकेला
नाझीर अकबराबादी दुसरा रासखान होता?
रितीकाळ संपत आला होता आणि नाझीर अकबराबादी यांचे कृष्ण प्रेम हे उदाहरण म्हणून देऊ जावू लागले. ज्याप्रमाणे मीराच्या कृष्णावरील प्रेमाची राधाशी तुलना केली जाते, त्याचप्रमाणे नाझीरच्या कृष्ण कवितेची रासखानशी तुलना केली जात असल्याची शक्यता आह. अकबराबादी यांची कृष्णप्रेम रचनेतील काही ओळी
तू सबका ख़ुदा, सब तुझ पे फ़िदा, अल्ला हो ग़नी, अल्ला हो ग़नी
है कृष्ण कन्हैया, नंद लला, अल्ला हो ग़नी, अल्ला हो ग़नी
तालिब है तेरी रहमत का, बन्दए नाचीज़ नज़ीर तेरा
तू बहरे करम है नंदलला, ऐ सल्ले अला, अल्ला हो ग़नी, अल्ला हो ग़नी
इतकंच नाही तर नाझीरसाठी कृष्ण एका पैगंबरासारखा दिसतो. कृष्णचरितासह रासलीलाच्या वर्णनाबरोबरच, नाझीर यांनी 'बलदेव जी का मैला' नावाची कविता लिहिली. जी कृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांच्यावर आधारित आहे. नजीर यांची 'कन्हैयाचे बालपण' ही कविताही गाजली.
वाजिद अली शाह यांचे कृष्णावर प्रेम
लखनौ राज्याचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह यांची गणना कृष्णप्रेमींमध्ये केली जाते. नावाने नवाब पण स्वभावाने कवी आणि कलाकार असलेल्या वाजिद अली शाह यांनी १८४३ मध्ये राधा-कृष्णावर नाटक केले होते. लखनौचे इतिहास तज्ज्ञ रोझी लेवेलिन जोन्स यांनी 'द लास्ट किंग ऑफ इंडिया'मध्ये लिहिले आहे की, राधा-कृष्णाच्या नाटकाचे दिग्दर्शन करणारे वाजिद अली शाह हे पहिले मुस्लिम राजा होते. जोन्सच्या म्हणण्यानुसार, नवाब वाजिद अली शाह यांचे चाहते त्यांना अनेक नावे देत असत, त्यापैकी एक नाव 'कन्हैया' देखील होते.
आणि काही महत्त्वाचे कवी
विचारवंत, कवी, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी मौलाना हसरत मोहनी असोत किंवा प्रसिद्ध आणि आदरणीय उर्दू कवी अली सरदार जाफरी असोत, कृष्णावरचे प्रेम आणि कृष्णाचे तत्त्वज्ञान मुस्लिम कवींमध्ये नेहमीच ओळखले जाते. सरदार जाफरी यांची ही रचना पहा...
अगर कृष्ण की तालीम आम हो जाए
तो फित्नगरों का काम तमाम हो जाए
मिटाएं बिरहमन शेख तफ़र्रुकात अपने
ज़माना दोनों घर का गुलाम हो जाए.
याशिवाय मौलाना जफर अली, शाह बरकतुल्ला आणि ताज मुघलानी यांसारख्या कवींची नावेही कृष्णाच्या प्रेमाशी निगडित आहेत. किंबहुना, कृष्णाने निर्माण केलेले प्रेमाचे तत्त्वज्ञान हे धर्माच्या पलीकडे आहे आणि माणसाला प्रत्येक परिस्थितीत प्रेमाचा मार्ग दाखवण्याचा एक अनोखा मार्ग आहे. साहित्याच्या इतिहासाचा अजून शोध घेतला तर धर्माच्या सीमा ओलांडलेल्या आणि कृष्णप्रेमावर काही लिहिणाऱ्या अशा अनेक कवींची नावे सापडतील.
शेवटी एक लोकप्रिय शेर कथा
जर आपण कृष्णाच्या प्रेमाच्या कवितेबद्दल बोललो आणि या चरोळीचा उल्लेख केला नाही तर ते पूर्ण होत नाही
लाम के मानिन्द हैं गेसू मेरे घनश्याम के
वो सभी काफ़िर हैं जो क़ायल नहीं इस लाम के
आता ही कविता कोणत्या कवीची आहे? याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. ही कविता फिराक गोरखपुरी यांनी म्हटल्याचे अलाहाबादमध्ये प्रसिद्ध आहे, परंतु मध्य भारतातील अनेक विद्वानांचे असे मत आहे की हे दोहे पंडित बृजनारायण चकबस्त यांनी म्हटले आहे. तसेच या कवितेच्या कवींमध्ये आणखी दोन नावे घेतली जातात. मुसाहिब लखनवी आणि ताज बीबी. ताज मुघलानी ही बहुधा ताज बीबी असावी जी या कवितेशी संबंधित आहे. पण त्यांच्या उर्वरित कवितेकडे पाहता, ही कविता त्यांची म्हणून स्वीकारण्यात अडचण येते. मुसाहेबांच्या बाजूनेही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, पण शेर नेमका कोणाचा याबाबत आजतागायत एकमत किंवा बहुमत नाही. पण भाषा आणि प्रेम या दोन्ही पातळ्यांवर ही कविता इतकी अप्रतिम आहे की तुम्ही आयुष्यभर त्याचा आनंद घेऊ शकता.
अनुवाद - फजल पठाण