त्रिपुरात ८१ टक्के मतदानाची नोंद

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
त्रिपुरा मतदार प्रातिनिधिक छायाचित्र
त्रिपुरा मतदार प्रातिनिधिक छायाचित्र

 

त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुका गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी पार पडल्या. या राज्यात २०१८ ते २०२३  पर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार होते. त्या सरकारमध्ये माणिक साहा यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पहिले. 


त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा आहे. या राज्याची ३६.७१ लाख लोकसंख्या आहे. राज्यात ८ जिल्हे आहेत. येथे सर्वाधिक लोकसंख्या बंगाली समाजाची आहे. येथील प्रमुख भाषा बंगाली, इंग्लिश आणि कोकबोरोक आहेत. 

त्रिपुरा विधानसभेची सदस्यसंख्या ६० आहे. २०२२ च्या निवडणुकीत भाजपने ५५ आणि मित्रपक्ष आयपीएफटीने उरलेल्या ५ जागांवर उमेदवार उभे केले होते. २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३६ जागांवर विजय मिळवला होता. 

त्रिपुरामध्ये ६० जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीसाठी सायंकाळी चारपर्यंत ८१ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ५० हजार मतदारांचे मतदान होणे बाकी होते, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढू शकते असेही सांगण्यात आले. ज्या मतदारांनी आधीच टोकन घेतले होते त्यांना सायंकाळी सहानंतर देखील मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती. 

तत्पूर्वी २०१८ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी सायंकाळी ९.३० पर्यंत मतदान चालले होते. तेव्हा ७९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा प्रथमच ‘ब्रू’ निर्वासितांना मतदानाचा हक्क मिळाला असून ३७ हजार १३६ ‘ब्रू’ नागरिकांपैकी १४००५ नागरिक हे मतदानासाठी पात्र ठरले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास ३ हजार ३३७ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली होती. किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळता अन्यत्र शांततेमध्ये मतदान पार पडले.