नवी दिल्ली
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (ट्विटर) वर एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो तयार केल्याचा मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी एलन मस्क यांच्या मालकीच्या 'X' ने अखेर आपली चूक मान्य केली आहे. भारत सरकारने पाठवलेल्या नोटीसनंतर, 'X' ने ३,५०० पेक्षा जास्त आक्षेपार्ह पोस्ट्स ब्लॉक केल्या असून ६०० हून अधिक खाती (अकाउंट्स) हटवली आहेत.
नेमका वाद काय?
एलन मस्क यांच्या 'Grok' या एआय चॅटबॉटचा वापर करून महिलांचे अश्लील फोटो तयार केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेषतः महिलांच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा भंग होईल अशा पद्धतीने या तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जात होता. बनावट खात्यांच्या माध्यमातून महिलांचे फोटो अपलोड करून ते एआयच्या मदतीने अश्लील बनवले जात होते.
सरकारची कडक भूमिका
या गंभीर प्रकाराची दखल घेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) 'X' ला नोटीस पाठवून जाब विचारला होता. तसेच अशा बेकायदेशीर गोष्टी त्वरित थांबवून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. 'X' ने यावर उत्तर दिले असले तरी, सरकारने ते 'अपुरे' असल्याचे म्हटले आहे. या प्लॅटफॉर्मने भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी नेमकी काय पावले उचलली, याची स्पष्ट माहिती दिलेली नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी उठवला आवाज
शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या विषयावर आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले होते. सोशल मीडियावर महिलांसाठी सुरक्षित वातावरण असावे आणि एआय टूल्सवर कडक निर्बंध लादले जावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. बनावट खाती चालवणारे पुरुष महिलांच्या फोटोंचा गैरवापर करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
पुढील कारवाई काय?
'X' ने आता स्पष्ट केले आहे की, ते भारतीय कायद्यांचे पूर्ण पालन करतील आणि यापुढे अशा प्रकारच्या अश्लील प्रतिमांना व्यासपीठावर परवानगी दिली जाणार नाही. सरकारने या कंपन्यांना कडक इशारा दिला असून, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्या कोणत्याही तंत्रज्ञानाला किंवा युजरला थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.