वर्क फ्रॉम होम नाकारले आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला; अमेरिकन कंपनीला २१० कोटींचा दंड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

अमेरिकेतील एका कंपनीला त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या नवजात मुलीच्या मृत्यूनंतर २२.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २१०.५१ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'हाय-रिस्क' प्रेग्नन्सी (धोकादायक गर्भधारणा) असतानाही संबंधित कर्मचाऱ्याची घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) विनंती कंपनीने नाकारली होती. या निर्णयाला न्यायालयाच्या ज्युरींनी या दुर्दैवी घटनेसाठी मुख्यत्वे जबाबदार धरले आहे.

नेमकी घटना काय?

फेब्रुवारी २०२१ मध्ये, ओहायोमधील चेल्सी वॉल्श या कंपनीच्या कर्मचाऱ्याला धोकादायक गर्भधारणेमुळे अकाली प्रसूतीचा धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शारीरिक हालचालींवर मर्यादा आणण्याचा, विश्रांती घेण्याचा आणि घरूनच काम करण्याचा सल्ला दिला होता. १५ फेब्रुवारी रोजी चेल्सी यांनी आपली कंपनी 'टोटल क्वालिटी लॉजिस्टिक' (TQL) कडे घरून काम करण्याची रीतसर परवानगी मागितली.

मात्र, कंपनीने त्यांची ही विनंती फेटाळून लावली. त्याऐवजी त्यांना ऑफिसला येण्याची सक्ती करण्यात आली किंवा विनावेतन रजा घेण्यास सांगण्यात आले. रजा घेतल्यास त्यांचे उत्पन्न बुडणार होते आणि आरोग्याचा विमा (Health Insurance) देखील धोक्यात येणार होता.

९० मिनिटांत बाळाचा मृत्यू

त्यावेळी चेल्सी या २१ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. डॉक्टरांचा सल्ला असूनही त्यांना तीन दिवस ऑफिसमध्ये जाऊन काम करावे लागले. अखेर २४ फेब्रुवारी रोजी कंपनीने त्यांच्या घरून काम करण्याच्या विनंतीला मंजुरी दिली. पण दुर्दैवाने त्याच दिवशी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मॅग्नोलिया असे या चिमुकलीचे नाव ठेवण्यात आले होते. जन्मानंतर तिचे हृदय धडधडत होते आणि ती श्वासही घेत होती. तिला आईच्या छातीवर ठेवण्यात आले, पण अवघ्या दीड तासात (९० मिनिटे) तिने आईच्या कुशीतच प्राण सोडले.

न्यायालयाचा निकाल

चेल्सी वॉल्श यांच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, कंपनीने 'वर्क फ्रॉम होम' नाकारल्यामुळेच मॅग्नोलियाचा मृत्यू झाला. ज्युरींना हा युक्तिवाद पटला. ज्युरींनी सुरुवातीला २५ दशलक्ष डॉलर्सची भरपाई जाहीर केली होती, पण या घटनेत कंपनीची ९० टक्के चूक असल्याचे सांगत ही रक्कम २२.५ दशलक्ष डॉलर्स (२१० कोटी रुपये) निश्चित केली.

वॉल्श कुटुंबाचे वकील मॅथ्यू सी. मेट्झगर म्हणाले, "चेल्सी वॉल्श आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत होत्या आणि त्यांनी फक्त घरून काम करण्याची परवानगी मागितली होती. कंपनीच्या नकारामुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, असे ज्युरींना आढळले आहे. या तरुण कुटुंबासाठी हा अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहे."

दरम्यान, कंपनीच्या प्रवक्त्या ज्युलिया डौघर्टी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असला, तरी कंपनीने न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. कंपनी आता कायदेशीर पर्यायांचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. 'टोटल क्वालिटी लॉजिस्टिक' ही अमेरिकेतील मोठी मालवाहतूक ब्रोकरेज फर्म असून तिचे ९,००० कर्मचारी आणि ६ अब्ज डॉलर्सहून अधिक उत्पन्न आहे.