ज्ञान आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील इस्लामचे योगदान

Story by  test | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Contribution of Islam in the field of knowledge and culture
Contribution of Islam in the field of knowledge and culture

 

 
-अब्दुल कादर मुकादम
 
इस्लामचा विचार आणि अभ्यास राजकीय दृष्टिकोनातून जितका झाला आहे त्याच्या शतांशानेही त्याचा सांस्कृतिक व ज्ञानक्षेत्रातील योगदानाचा झालेला नाही. किंबहुना इस्लामचे असे काही योगदान आहे, हेच अनेकांना मान्य नाही; पण इस्लामच्या पहिल्या तीन-चार शतकांच्या इतिहासावर नजर टाकली तरी हे योगदान किती व्यापक आणि महत्त्वपूर्ण आहे, याची कल्पना येऊ शकेल. ग्रीक भाषेतील तत्त्वज्ञान, विज्ञान, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखेतील ज्ञान अरब संशोधकांनी आणि अभ्यासकांनी नवव्या ते तेराव्या शतकाच्या काळात अरबी भाषेत भाषांतरित केले व तेथूनच ते युरोपात गेले. म्हणूनच या काळखंडाला इस्लामच्या इतिहासात भाषांतर युग म्हटले जाते. अरबांच्या या ज्ञान लालसेसंदर्भात रॉम लॅंडो या पाश्‍चात्त्य अभ्यासकाने फार मार्मिक टिप्पणी केली आहे. त्याने म्हटले आहे, की इस्लामपूर्व काळातील अरब समज, ज्ञान आणि संस्कृतीच्या क्षेत्रात अतिशय प्राथमिक अवस्थेत होता, हे लक्षात घेतले की पैगंबरांच्या निधनानंतरच्या केवळ दोन शतकांच्या काळात अरबांनी ज्या वेगाने आणि ज्ञानसाधनेच्या बांधिलकीने सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती केली ते एक आश्‍चर्य वाटू लागते. प्रगतीचा हा टप्पा गाठण्यास ख्रिश्‍चन संस्कृतीला १५०० वर्षे लागली. हे पाहिले, की अरबांचे हे सांस्कृतिक कर्तृत्व अधिकच उठून दिसते. (इस्लाम अँड द अरबज, पृष्ठ १६५).
 
इस्लाम भारतात आल्यानंतरही इस्लामी संशोधकांनी व अभ्यासकांनी ज्ञानोपासनेची ही परंपरा त्याच निष्ठेने पुढे चालू ठेवली. त्यांच्या या ज्ञान साधनेला त्यांनी धर्म, भाषा, देश, विषय असल्या कुठल्याही मर्यादा घालून घेतल्या नव्हत्या. त्याची ज्ञानसाधना पूर्वग्रह विरहित होती. याच विशुद्ध, ज्ञानलालसेने त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व तर मिळविलेच; परंतु त्या भाषेतील समृद्ध ज्ञानभांडार अरबी व परशीयन भाषेत भाषांतरित केले.
 
अल्‌-बेरूबी व अमीर खुस्त्रो हे याच परंपरेतील विद्वान! त्यांची नावे थोड्या फार प्रमाणात परिचित आहेत; पण अपरिचित असलेल्या संशोधकांची यादीही मोठी आहे. त्यापैकी अबू सालेह्‌ शुएब हा एक. त्याने महाभारताचे परशीयन भाषेत भाषांतर केले आहे. पुढे इ. स. 1026 मध्ये अबू हसन जलाली याने त्याची आणखी एक सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली. याच सुमारास इन्न-उढ्‌-मुक्कप्रभा याने पंचतंत्र या नितीकथा संग्रहाचे "कलीलेह्‌-ओ-दिमनेह' या नावाने अरबी भाषांतर केले. त्यानंतर गझनवी सुलतान इब्राहीम इबन मसूदच्या काळात, दारुल इन्शा या संस्थेचा सचिव अबुल मा अली मुस्तौफी याने त्याची परशीयन आवृत्ती काढली. त्यानंतर मुल्ला हुसेन वा इज काशिफी याने त्याची अन्वरे सुहेली या नावाने आणखी एक गद्यात्मक आवृत्ती काढली. ही आवृत्ती परशीयन भाषेत होती; पण भाषांतरकर्त्याने त्यात अरबी काव्यपंक्ती आणि वाक्‌प्रचार यांचा वापर केला. त्यानंतर सम्राट अकबर याच्या सांगण्यावरून अब्दुल फझल याने काशिफीच्या "अन्वरे सुहेली'ची एक सुबोध आवृत्तीही काढली.
 
सुलतान फिरोज शाह तुघलख (१३५१  ते १४१३ इ.) याने नागरकोट राजाचा पराभव केला, तेव्हा ज्वालामुखी मंदिरात त्याला जवळजवळ तेराशे संस्कृत ग्रंथ आढळले. त्यात अनेक ग्रंथ खगोलशास्त्रावरचे होते. त्याने तेथील पंडितांबरोबर चर्चा करून आणि त्यांच्या सहकार्याने त्याने या ग्रंथांची परशीयन भाषेत भाषांतर करून घेतले. त्यातील इझुद्दीन खालीद खानी याने भाषांतरित केलेला दलाई-अल्‌-फिरुज शाही हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. याच काळातील आणखी एक भाषांतरित ग्रंथ म्हणजे वराहमिहीरचा पंचसिद्धांतिक हा होय. हा ग्रंथ शम्स-ए-शिराजी याने तर्जुमा-ए-बराही या नावाने भाषांतरित केला. संगीत दर्पण या शास्त्रीय ग्रंथाचा घुनयहुल मुनैया या नावाचा भाषांतरित ग्रंथही उपलब्ध आहे.
 
सुलतान सिकंदर लोधीच्या कारकिर्दीत मिया बहावत खान याने अगाध महावैद्यक या वैद्यकशास्त्रावरील ग्रंथाचे केलेले भाषांतर म्हणजे या परंपरेतील महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. तिब्बचे सिकंदरी या वैद्यक शास्त्रावरील भाषांतरित ग्रंथात मानवी शरीररचना, रोगनिदान, उपचार, औषधोपचार पद्धती या विषयी तपशीलवार विवेचन आहे. (युनानी वैद्यकशास्त्रावर आयुर्वेदाचा खूपच प्रभाव आहे आणि युनानी परंपरेने हे ऋण मुक्तपणे मान्य केले आहे, हेही इथे नमूद करावेसे वाटते.)
 
ज्ञान साधनेची ही परंपरा काश्‍मीर आणि दक्षिणेतील मुस्लिम राजवटींनीही पाळलेली तत्कालीन इतिहासावरून दिसते. कल्हण याचा राजतरंगिणी हा ग्रंथ काश्‍मीरच्या मध्ययुगीन इतिहासाचा आधारग्रंथ मानला जातो. बाहरूल अस्मार या नावाने त्याचे भाषांतर झाले आहे; पण भाषांतरकर्त्याचे नाव मात्र उपलब्ध नाही. हैदर मलिक बिन हसन मलिक याने मात्र त्याचा "तारिखे कास्मीरी' हा ग्रंथ या भाषांतराच्या आधारे लिहिला आहे. "बहारिस्तान-ए-शाही' आणखी एक ग्रंथ याच साधनांच्या आधारे लिहिला गेला आहे.
 
सम्राट अकबराच्या कारकिर्दीत (१५५६-१६०५ ) तर या ज्ञान साधनेला राजाश्रयच मिळाला होता. त्यामुळे या काळात तत्त्वज्ञान, विज्ञान आणि इतर विषयांवरील महत्त्वाच्या संस्कृत ग्रंथांच्या भाषांतराला विशेष उत्तेजन मिळाले होते. खुद्द अकबराच्या ग्रंथसंग्रहात संस्कृत, परशीयन, अरबी, ग्रीक अशा अनेक भाषांतील ग्रंथ होते. संस्कृत भाषेतील ज्ञानभांडार परशीयनमध्ये भाषांतरित करण्यासाठी अनेक विद्वानांची खास नेमणूक करण्यात आली होती. तत्कालीन प्रसिद्ध कवी फैजी, इतिहासकार अब्दुल कादीर बदायुबी, धर्मशास्त्रज्ञ नकीब खान तत्त्वज्ञ सुलतान ठाणेसरी आणि प्रसिद्ध विचारवंत मुल्ला शिरी, ही त्यापैकी काही नावे! अकबराचा वजीर अबुल फझल याचाही या विद्वानात समावेश करावा लागेल. यांना त्यांच्या कार्यात सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी तत्त्वज्ञान व विज्ञान याविषयांतील अनेक तज्ज्ञ पंडितांचीही नेमणूक करण्यात आली होती.
 
अब्दुल कादीर बदायुनी याने भवन खान (हा धर्मांतरित ब्राह्मण होता.) याच्या सहकार्याने रामायणाचे भाषांतर केले. त्यानंतर त्याच्या आणखी चार संक्षिप्त आवृत्याही निघाल्या होत्या. त्यातील पहिली गिरधटदास कायस्थ याने काढली होती व ती बादशहा जहांगीरला अर्पण करण्यात आली होती.
 
अकबराच्याच कारकिर्दीत महाभारताच्या अठरा पर्वांचे परशीयन भाषांतर "रझम नामा' या नावाने करण्यात आले होते. कवी फैजी याने या गद्य भाषांतरात सुधारणा करून त्यात आणखी दोन पर्वांच्या भाषांतराची भर घातली. फैजीने भगवत गीता, भास्कराचार्यांचा "लीलावती' हा ग्रंथ आणि सोमसागराच्या कथा, सरित सागरचेही भाषांतर केले होते. त्याने नलोपाख्यानाचे "नल-दामन' या नावाने मसनवी वृत्तांत काव्यारूप भाषांतरही केले. वेदांत तत्त्वज्ञान, योगवाशिष्ठ आणि भागवत पुराण यावर आधारित त्याचा शरिकुल मारिफत हा ग्रंथ परशीयन भाषेत सर्वात महत्त्वपूर्ण मानला जातो.
 
अब्दुल कादीर बदायुनी याने सम्राट अकबराच्या आदेशावरून सिंहासन बक्तीशीचे खिराद अफजा या नावाने भाषांतर केले. जहांगीरच्या काळात सिंहासन बत्तीशीची किस्सा-ए-बिक्रमाजीत व गुल अफसान अशी आणखी दोन भाषांतरेही झाली होती. त्याचप्रमाणे मुल्ला शिरी याने व्यासांच्या हरीवंश या कृष्ण चरित्राचे "हरिबन्स' या नावाने भाषांतर केले आहे.
 
औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिकोहू हा या सर्व विद्वानांचा शिरोमणी मानला पाहिजे. बनारसला जाऊन तेथील पंडितांकडून तो संस्कृत भाषा शिकला. संस्कृतवर त्याचे उत्तम प्रभुत्त्व होते. त्याने "सिरे अकबर' या नावाने उपनिषदांचे भाषांतर केले. त्याच बरोबर योगवाशिष्ठ व भगवत गीतेचेही त्याने परशीयन भाषांतर केले आहे; परंतु त्याचा मज्मे-उल-बहारेन (हिंदू आणि मुस्लिम या दोन महासागरांचा संगम) हा ग्रंथ सर्वात महत्त्वाचा मानला पाहिजे. हा ग्रंथ म्हणजे भारतातील मिश्र संस्कृतीचे प्रतीक आहे. दुर्दैव असे की औरंगजेबावर अनेक कादंबऱ्या, नाटके लिहिली गेली आहेत; परंतु दारा शुकोह या सुफी संत प्रवृत्तीच्या शोकांत नायकावर मराठीत एकही पुस्तक नाही.
 
औरंगजेबाच्या बाबतीत विरोधाभास असा, की संगीतद्वेष्टा या सम्राटाच्या कारकिर्दीत मिर्झा रोशन दामीर याने भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य या विषयावरील पारिजातक या ग्रंथाचे "तर्जुमा-अल-पारिजातव्य' या नावाने भाषांतर केले आहे.
 
ही यादी आणखी वाढविता येऊ शकेल; पण स्थलाभावी ते शक्‍य नाही. म्हणून काहींचा ओझरता नामोल्लेख करत आहे. बहरूल हयात (अमृतकुंड), मुफारीउद कुलुब (हिलेपदेश), रागाए हिंदी (धृपद गायकीतील चीजांचा संग्रह), राग विबोद राग दर्पण यातील संगीत शास्त्रावरील चर्चा, ही त्यापैकी काही नावे आहेत.
 
वरील सर्व विद्वानांचे हे सांस्कृतिक योगदान भारतीय मिश्र संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे तर आहेच; पण त्यातून त्यांच्या ज्ञान साधनेचेही प्रत्त्यंतर येणे, हेही तितकेच खरे आहे.