एक माजी मुख्यमंत्री आणि रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे (रॉ) एक माजी प्रमुख... त्यांच्यातील मैत्री आणि त्यातून उलगडणारा जम्मू-काश्मीरचा अलीकडचा इतिहास प्रस्तुत पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. माजी मुख्यमंत्री म्हणजे जम्मू-काश्मीरचे नेते फारूख अब्दुल्ला आणि गुप्तचर म्हणजे ए. एस. दुलात. 'इंटेलिजन्स ब्युरो'त (आयबी) १९८७ मध्ये जम्मू-काश्मीरचे संयुक्त संचालक म्हणून दुलात काश्मीरला गेले. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना होणारा आर्थिक व शस्त्रास्त्रांचा पुरवठा, राज्यातील राष्ट्रविरोधी प्रवृत्तींवर लक्ष ठेवणे ही प्रमुख जबाबदारी असते.
त्यावर्षी मार्च महिन्यात विधानसभेची निवडणूक झाली होती. फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले. काश्मीर खोऱ्यात १९८७ मध्ये दहशतवाद्यांचा प्रचंड उपद्रव होता. रोज बॉम्बस्फोट, हत्या होत होत्या. निवडणुकांनंतर दुलात काश्मीरला गेले होते. दिल्लीत आयबीचे तेव्हाचे प्रमुख एम. के. नारायण यांनी "ते (फारूख) आपल्या (देशाच्या) बाजूने आहेत आणि आपले त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते लक्षात ठेवा" असे दुलात यांना सांगून ठेवले होते.
या पुस्तकातून काश्मीर आणि फारूख अब्दुल्लाच्या संदर्भातील काही नवीन गोष्टी कळतात. घटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या परिस्थितीचा आणि गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीनंतरच्या स्थितीचाही आढावा त्यात आहे. फारूख यांना समजून घेणे सोपे नाही. नवी दिल्लीशी चांगले संबंध असणे काश्मीरसाठी आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे. १९८१मध्ये केलेल्या पहिल्या राजकीय निवेदनातही श्रीनगर आणि दिल्लीमध्ये आपण सेतू बनू इच्छित आहोत, असे फारूख म्हणाले. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी काश्मीरला गेल्या होत्या. तिथे त्यांनी शेख अब्दुल्ला यांना आपण राजकारण सोडण्याचा गंभीरपणे विचार करत आहोत, असे म्हटले होते.
मात्र शेख अब्दुल्लांनी इंदिरा गांधी यांना "तुम्ही असा विचार कसा काय करू शकता", असे विचारले. काश्मिरात काही दिवस त्या राहिल्या आणि राज्याच्या वेगवेगळ्या मंदिरांत गेल्या. फारूख त्यांच्यासोबत होते. दिल्लीत त्या परतल्या तेव्हा त्या पूर्णतः बदललेल्या होत्या. त्याच इंदिरा गांधींनी १९८४ मध्ये आपले सरकार बरखास्त केले, त्याचा फारूख यांना मोठा धक्का बसला होता, हे या पुस्तकातील निवेदनातून स्पष्ट होते.
जम्मू-काश्मीरच्या २००२च्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी फारूख यांचे नाव उपराष्ट्रपतिपदासाठी दुलात यांच्या घरी सुचवले. वाजपेयी यांच्यासोबतच्या एका बैठकीत दुलात यांनी फारूख यांना उप-राष्ट्रपती करण्याच्या शक्यतेबद्दल विचारलेलं. तेव्हा वाजपेयी यांनी "तुमचा विचार चांगला आहे. त्यासाठी प्रयत्न करा", असे म्हटले होते. केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानीही तयार होते. त्यांचा विचार उमर अब्दुल्ला यांना मुख्यमंत्री करण्याचा होता. आपण उपराष्ट्रपती होणार, असे फारूख यांना वाटू लागले. एपीजे अब्दुल कलाम यांची निवड राष्ट्रपतिपदासाठी झाल्याने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही अल्पसंख्याक समाजाचे करता येणार नाहीत, म्हणून फारूख यांची संधी गेली.
दुलात यांनी पुस्तकात मुफ्ती मोहम्मद सय्यदची मुलगी डॉ. रुबिया सैद यांचे १९८९ मध्ये करण्यात आलेले अपहरण आणि काठमांडू ते दिल्ली विमानाच्या (आयसी-८१४) अपहरणाबद्दलही लिहिले आहे. दोन्ही वेळा फारूख मुख्यमंत्री होते. रुबियाचे अपहरण झाले, तेव्हा मुफ्ती केंद्रात गृहमंत्री होते. रुबियाच्या किंवा कोणाच्याही बदल्यात दहशतवाद्यांना सोडण्याचे धोरण फारूखना मान्य नव्हते. मात्र, त्यांचा निरुपाय झाला. १९९९च्या डिसेंबरमध्ये काठमांडू ते दिल्लीला निघालेल्या विमानाचे अपहरण करून कंदाहार येथे नेण्यात आले. ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात तीन दहशतवाद्यांना सोडण्यासाठी भारत सरकार तयार झाले. त्यातला मुस्ताक जरगर काश्मीरच्या तुरुंगात होता. त्याला सोडण्यापेक्षा आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे सांगून ते गव्हर्नर गेरी सक्सेना यांच्या घरी गेले. फारूख यांना त्यावेळी राज्यपालांनी समजावले, ही माहितीही लेखक देतात.
पुस्तक : द चीफ मिनिस्टर अॅन्ड द स्पाय : अॅन अनलाइकली फ्रेंडशिप
लेखक : ए. एस. दुलात