राजीव नारायण
पोर्टफोलिओमधून लाखो रुपये गायब होताना पाहणाऱ्या भारतातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी ही केवळ 'मार्केट करेक्शन' राहिलेली नाही. जागतिक पातळीवरील पैसा, तेलाच्या किमती, व्याजदर आणि चलनांमधील चढउतार यामुळे हजारो कोटींची कागदी संपत्ती कशी उद्ध्वस्त होऊ शकते, याचा एक कठीण धडा सर्वांना मिळाला आहे.
जेव्हा आपला पोर्टफोलिओ लाल रंगात दिसू लागतो, तेव्हा मनात एक विचित्र शांतता दाटून येते. सगळे आकडे आणि शेअर्स तिथेच असतात. प्रत्यक्ष काहीही गायब झालेले नसते. तरीही कालपर्यंत २५ लाखांवर असलेला पोर्टफोलिओ अचानक २२ लाख, २० लाख किंवा त्याहूनही खाली येतो. ज्यांनी कोटींची गुंतवणूक केली आहे, त्यांचा हा कागदी तोटा सहज लाखो रुपयांच्या घरात जातो. शेअर बाजार सध्या एका वेदनादायक आणि अस्वस्थ करणाऱ्या टप्प्यातून जात आहे आणि हेच भारतीय गुंतवणूकदारांसमोरचे आजचे वास्तव आहे.
सप्टेंबर महिना गुंतवणूकदारांसाठी खरोखरच कठीण राहिला. निफ्टी ५० मध्ये ६.१ टक्क्यांची घसरण झाली, तर सेन्सेक्सने ५.८ टक्के गमावले. मार्च महिन्यानंतरची निर्देशांकांमधील ही सर्वात मोठी घसरण ठरली. विदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात इक्विटीमधून २.७ अब्ज डॉलर्स (२६,०१४ कोटी रुपये) बाहेर काढले. यामुळे २०२६ या वर्षातील त्यांनी काढून घेतलेल्या एकूण रकमेचा आकडा २६.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
ऑक्टोबर महिन्याची सुरुवातही दिलासादायक झालेली नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया ९६ रुपयांच्या पुढे घसरला आहे. ब्रेंट क्रूडचा (कच्च्या तेलाचा) दर प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर गेला आहे आणि अमेरिकन १० वर्षांच्या ट्रेझरी बाँडचे उत्पन्न ५.३ टक्क्यांच्या वर पोहोचले आहे. ही केवळ एक समस्या नसून, अनेक समस्या एकाच वेळी एकत्र आल्या आहेत.
जेव्हा पैशांची हालचाल होते
विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत, याचा अर्थ भारतात काहीतरी मूलभूत चूक घडली आहे असा होत नाही. पैसा नेहमी अशा ठिकाणी प्रवास करतो जिथे परतावा, जोखीम आणि तरलता यांचे गणित सर्वात आकर्षक असते. आता हेच गणित बदलले आहे.
अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी बाँडचे उत्पन्न २००२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. ५.३ टक्क्यांचा हा परतावा गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत आहे. जेव्हा जगातील सर्वात मोठी बाँड बाजारपेठ कमी जोखमीवर जास्त परतावा देऊ लागते, तेव्हा विदेशी भांडवल टिकवून ठेवण्यासाठी भारतासारख्या विकसनशील बाजारांना संघर्ष करावा लागतो.
त्यानंतर येते चलनाची महत्त्वाची गोष्ट. विदेशी गुंतवणूकदार भारतातील आपल्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त 'निफ्टी'वरून ठरवत नाही. रुपयाचे पुन्हा डॉलर्समध्ये रूपांतर केल्यावर काय हाती लागते, याचाही तो हिशोब करतो. भारतातील शेअरची किंमत मजबूत असली तरी, घसरणारा रुपया मिळणाऱ्या नफ्याला खाऊन टाकतो. यामुळे ९६ रुपयांच्या पुढे गेलेला डॉलर हा विदेशी गुंतवणूकदाराच्या गणितातील एक महत्त्वाचा भाग बनतो.
शेअर्सची ही विक्री एक चक्र तयार करते. विदेशी गुंतवणूकदार शेअर्स विकतात, त्यामुळे रुपयावर दबाव येतो. चलन कमकुवत झाल्यामुळे भारतीय मालमत्ता परदेशी गुंतवणूकदारांसाठी कमी आकर्षक ठरतात आणि यातून आणखी विक्री वाढते. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार याला आधार देऊ शकतात आणि ते तसे करतही आहेत. पण जागतिक स्तरावरील विक्रीची प्रत्येक लाट ते एकटे रोखू शकत नाहीत.
कच्च्या तेलाचे संकट
भारतासमोर आणखी एक नाजूक प्रश्न आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तो म्हणजे कच्चे तेल. पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या पुरवठ्याबाबतच्या चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पुढे गेले असून, ते सध्या १०६ ते १०७ डॉलर्सच्या आसपास फिरत आहे.
तेल आयात करणाऱ्या भारतासारख्या अर्थव्यवस्थेसाठी महागडे कच्चे तेल मारक ठरते. यामुळे देशाचे आयात बिल वाढते, चालू खात्यावर दबाव येतो आणि महागाई आटोक्यात ठेवणे कठीण होते. वाढलेला उत्पादन खर्च थेट ग्राहकांवर टाकता न आल्यास कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होतो. यातून शेअर बाजारासाठी एक समस्या निर्माण होते, ती म्हणजे 'अनिश्चितता'. तेल किती महाग होईल आणि किती काळ तिथे टिकेल, याची अनिश्चितता बाजारपेठेला आवडत नाही.
याच कारणामुळे सध्याची मार्केट करेक्शन फक्त कंपन्यांची कमाई किंवा देशांतर्गत विकासावरून समजून घेता येत नाही. एखादी कंपनी उत्तम कामगिरी करत असली, तरी तिचे शेअर्स घसरू शकतात. कारण, त्या कंपनीचे शेअर्स बाळगणारा गुंतवणूकदार जागतिक घडामोडींना प्रतिसाद देत असतो.
स्वतःचे आर्थिक नियोजन मोडू नका
लहान गुंतवणूकदारांनी दिवसभर फक्त स्क्रीनकडे पाहत बसू नये. आपण गुंतवणुकीत टिकून राहू शकतो का? हा मूलभूत प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. सहा महिन्यांच्या खर्चासाठी असलेला 'इमर्जन्सी फंड' (आणीबाणी निधी) आकर्षक वाटत नाही किंवा तो मोठा परतावाही देत नाही. पण वैद्यकीय बिल, नोकरी जाणे किंवा कौटुंबिक अडचण आल्यास केवळ बाजार घसरला म्हणून तोट्यात शेअर्स विकण्याची वेळ हा फंड नक्कीच टाळू शकतो.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, ही गुंतवणूक तुम्ही दीर्घकाळासाठी केली होती का? एक मार्केट करेक्शन कोणत्याही उत्तम कंपनीला एका रात्रीत वाईट बनवत नाही. तसेच घसरणारा प्रत्येक शेअर स्वस्त आणि फायदेशीर ठरतोच असे नाही. म्हणूनच, घाबरून घाईघाईत शेअर्स विकणे आणि कोणताही विचार न करता नवीन शेअर्स खरेदी करणे, या दोन्ही गोष्टी धोकादायक ठरू शकतात.
ज्यांची एसआयपी (SIP) चालू आहे आणि जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत, त्यांनी बाजारात गुंतवणूक का सुरू केली होती, याची आठवण ठेवावी. करेक्शनच्या काळात भावनांच्या आहारी गेल्याने दीर्घकालीन रणनीतीचे नुकसान होऊ शकते. याचा अर्थ वास्तवाचा विचार न करता प्रत्येक एसआयपी चालूच ठेवावी असा होत नाही, किंवा घसरणारा प्रत्येक मोठा शेअर खरेदी करावा असाही होत नाही.
तुमचे सर्व निर्णय स्क्रीनवरील लाल-हिरव्या रंगावरून न ठरवता, गुंतवणुकीच्या मूळ कारणावर आधारित असावेत.
समोर असणारी कठीण परीक्षा
आता पुढे काय? हा सर्वांना सतावणारा प्रश्न आहे. अनेक गोष्टी भारताच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे याचे कोणतेही ठाम उत्तर नाही. अमेरिकेतील उत्पन्न चढेच राहिल्यास, तेल १०० डॉलर्सच्या वर राहिल्यास आणि भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास विदेशी गुंतवणूकदार सावध राहू शकतात. हे दबाव कमी झाल्यास बाजूला गेलेला पैसा पुन्हा नवीन संधी शोधू लागेल.
विदेशी विक्रीला भारतीय गुंतवणूकदार भक्कमपणे तोंड देत आहेत. बाजारात सध्या दोन भिन्न शक्ती कार्यरत आहेत: जागतिक धोक्याला प्रतिसाद देणारा विदेशी पैसा आणि देशाच्या विकासावर विश्वास ठेवणारा देशांतर्गत पैसा. गुंतवणूकदारांसाठी हा धडा उपयुक्त आहे.
शेअर बाजार म्हणजे एकाच दिशेने जाणारी लिफ्ट नाही. तो अनेक वर्षे वेगाने वर जातो आणि प्रत्येक घसरण तात्पुरती असल्याचा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण करतो. पण मग अचानक किंमती वेगाने खाली येतात. सध्याच्या घसरणीने प्रचंड प्रमाणात कागदी संपत्ती नष्ट केली आहे. अशा वेळी बाजारातून पळ काढणे किंवा सर्वात कमी किमतीत शेअर पकडण्याचा प्रयत्न करणे, असा मोह सर्वांना नक्कीच होईल. पण या दोन्ही गोष्टींसाठी धैर्याची गरज नसते, तर त्या केवळ एक अंदाज असतात.
हेही वाचा: भारताला आता असा देश बनावं लागेल, ज्याला पर्याय शोधणं जगासाठी कठीण असेल!
स्वतःचा आर्थिक पाया सुरक्षित ठेवणे, आणीबाणीसाठी पुरेसा रोख पैसा बाळगणे आणि आपल्या शेअर्सची पुनर्तपासणी करणे हा एक चांगला दृष्टिकोन आहे. आर्थिक परिस्थिती आणि जोखीम घेण्याची क्षमता असल्यास, एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी हळूहळू पैसे गुंतवणे योग्य ठरेल. बाजारातील घसरणीचे रूपांतर स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक संकटात होऊ न देणे, हेच गुंतवणूकदारांनी टाळले पाहिजे. शेवटी, घसरणाऱ्या बाजारात सर्वात महागडी चूक 'आधीच शेअर्स खरेदी करणे' ही नसते; तर सर्वात वाईट वेळी 'शेअर्स विकायला भाग पडणे', हीच सर्वात मोठी चूक असते.