अस्थिरतेच्या गर्तेत पाकिस्तान

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
पाकिस्तानातील राजकीय नेते
पाकिस्तानातील राजकीय नेते

 

‘पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली’च्या २६६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अपक्षांना शंभरावर जागा मिळण्याचा विक्रम झाला आहे; तर रिंगणातील पाकिस्तान मुस्लिम लिग (नवाज) (पीएमएल-एन) आणि बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या परंपरागत स्पर्धकांना अनुक्रमे ७२ आणि ५३ जागा मिळाल्या. निवडणूक आयोगाकडून नेमकी माहिती अद्याप आलेली नाही.

शिवाय, महिला, अल्पसंख्यांकाच्या सत्तर जागा निवडलेल्या पक्षातून भरल्या जातील. तथापि, या त्रिशंकू स्थितीवर तोडग्यासाठी हे दोन्हीही पक्ष एकत्र आले तरी बहुमताचा जादुई आकडा गाठता येत नाही. दुसरीकडे अपक्षांना सरकार स्थापता येत नाही. त्यामुळे गंभीर पेच आहे.

या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षातर्फे आणि `बॅट` पक्षचिन्हावर निवडणूक लढवता आलेली नाही. तरीही त्यांना अपक्ष रिंगणात उतरून मोठी बाजी मारली.

तमाम राजकीय निरीक्षकांनी,विश्‍लेषकांनी लष्कराचा पाठिंबा या मुद्याचा संदर्भ देत नवाज शरीफ यांना सत्ता मिळणार,असे भाकीत केले होते. पण ते खरे ठरलेले नाही. जनमताची नाडी ओळखणे हे सोपे नाही, याचा प्रत्यय त्यांना आला असेल.

इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिवी सध्या तुरूंगात आहेत. एकूणच निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत इम्रान समर्थकांनी न्यायालयात धाव घेतली असून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

दुसरीकडे अपक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास नवीन राजकीय शक्ती म्हणून ते सत्तास्थापनेच्या संघर्षात उडी घेऊ शकतात. थोडक्यात, आव्हानांनी बेजार पाकिस्तानच्या समस्यांमध्ये वाढच होऊ शकते.

पाकिस्तानात २०१८मध्ये ‘नया पाकिस्तान’चे स्वप्न दाखवणारे इम्रान खान लष्कराच्या कुबड्यांवर सत्तेवर आले. तेच इम्रान आता लष्कराला डोईजड झाले आहेत. त्यांनी अमेरिकेसह लष्करावरच आगपाखड चालवली. उभयतांमधील विसंवादामुळे अखेर २०२२मध्ये अविश्‍वास ठरावाने त्यांचे सरकार कोसळले.

नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांचे सरकार ‘पीपीपी’च्या मदतीने सत्तारूढ झाले. या राजकीय डाव-प्रतिडावांत पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली. शंभर अब्ज डॉलरचा कर्जाचा बोजा आहे.

आशियातील सर्वाधिक महागाईदर पाकिस्तानात आहे. हवामानबदलाने आपत्तींना तोंड देताना पाकिस्तानची दमछाक होते आहे. एकूण देण्यामध्ये बारा टक्के देणे चीनला आहे. त्याखालोखाल संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आहेत.

तरीही पाकिस्तानचे चीनप्रेम अतूट आहे. ज्या दहशतवादाला अंगाखांद्यावर वाढवले, त्याने सरलेल्या वर्षात पाकिस्तानात हजारवर बळी घेतले. इम्रान अप्रिय झाल्याने लष्कराचे नवाज शरीफ प्रेम पुन्हा उफाळून आले. कायद्याला वळसा घालून त्यांच्या मायदेशी पुनरागमनासाठी लाल गालिचे अंथरले.

तथापि, ज्या इम्रान यांनी लोकशाहीचा डांगोरा पिटला, लष्करी हस्तक्षेपाविरोधात भूमिका घेतली त्यांच्या पाठीशी आता जनता आहे. पाकिस्तानी राजकारणातील परंपरागत प्रतिस्पर्धी घराणी शरीफ आणि भुट्टो यांचाही करिष्मा घटल्याचे निवडणुकीने दाखवून दिले आहे.

इम्रान सध्या भ्रष्टाचार, गुपिते फोडणे, सरकारी मालमत्तेचा अपहार अशा विविध प्रकरणांमुळे तुरुंगात आहेत. तरीही ‘एआय’च्या मदतीने ते कार्यकर्ते आणि जनतेच्या संपर्कात आहेत. काहीही करून सत्तेवर येण्यासाठी आता नवाज शरीफ आणि भुट्टो व त्यांचे वडील, माजी अध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत.

त्यात ते यशस्वी होतात की, त्यांना ‘पीटीआय’चे अपक्ष एकत्रितपणे कोलदांडा घालतात, हे पाहावे लागेल. पाकिस्तानातील लोकशाही लष्कराच्या कृपेनेच नांदते. यावेळी निवडणुकीत गेल्या वेळेच्या तुलनेत कमी मतदान झाले.

बारा कोटींवर मतदारात सुमारे ४५टक्के मतदार पस्तीस वयाखालील आहेत. निकालातून युवकांवर इम्रान यांचे गारूड दिसते. पाकिस्तानात स्थिर, निर्णायक बहुमताचे सरकार सत्तेवर न आल्यास तिथल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्‍नांची तीव्रता अधिक भयावह होऊ शकते. खैबर पख्तुनवा, बलुचिस्तान धगधगते आहे.

दहशतवादाची पिलावळ अस्थिरतेत भर घालते आहे. शेजारील भारतासह अफगाणिस्तान, इराणबरोबरचे संबंध ताणलेले आहेत. जानेवारीतच इराण-पाकिस्तान यांच्यात ‘घुसके मारा’चा प्रकार घडला. परकी चलनाची गंगाजळी आटलेली आहे.

एक अब्ज डॉलरच्या बाँडची परतफेड करावयाची आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतीचा कार्यक्रम येत्या एप्रिलमध्ये संपत असल्याने त्याची फेररचना गरजेची आहे.. महागाईला वेसण घालायचे आव्हान आहेच. सत्तेच्या साठमारीत हे प्रश्‍न बेदखल झाल्यास पाकिस्तानवासीयांचे जगणे आणखी यातनामय होईल, हे मात्र निश्‍चित.