प्रत्येकाच्या सहमतीने आणि सर्वांना सोबत घेऊन करु भारतमातेची सेवा - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 5 Months ago
नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनानिमित्त विचार मांडताना पंतप्रधान मोदी
नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनानिमित्त विचार मांडताना पंतप्रधान मोदी

 

संसदीय लोकशाहीसाठी हा दिवस वैभवशाली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नव्या संसद भवनात हा शपथविधी सोहळा होत आहे. आतापर्यंत जुन्या संसद भवनात ही प्रक्रिया होत होती. या महत्त्वाच्या दिवशी, मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

या संसदेची स्थापना भारतातील सामान्य माणसाच्या संकल्पांची पूर्तता करण्यासाठी झाली आहे. नव्या उत्साहाने, नव्या गतीने आणि नवी उंची गाठण्याची ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. ही सर्व स्वप्ने आणि या सर्व संकल्पांसह २०४७ पर्यंत विकसित भारत घडवून श्रेष्ठ भारताच्या निर्मितीचे ध्येय घेऊन १८ व्या लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. आपल्या देशाची जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय उत्तमरित्या आणि गौरवशाली पद्धतीने पार पडली, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. १४० कोटी देशवासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. सुमारे ६५ कोटींपेक्षा जास्त मतदारांनी मतदानात भाग घेतला. ही निवडणूकही आणखी एका गोष्टीसाठी खूप महत्त्वाची ठरली, ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदाच देशातील जनतेने एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. आणि ही संधी ६० वर्षांनंतर आली आहे, ही एक अतिशय अभिमानास्पद घटना आहे.

जेव्हा देशातील जनतेने एखादे सरकारला तिसऱ्या कार्यकाळासाठीही पसंती दिली आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, त्यांनी त्यांच्या हेतूंवर मोहर उमटवली आहे, त्यांच्या  धोरणांवर मोहोर उमटवली आहे. जनता - जनार्दनसाठी त्यांच्या समर्पण भावनेवर शिक्कामोर्तब केले आहे आणि यासाठी मी देशवासियांचे मनापासून आभार मानतो. आम्ही गेल्या १० वर्षात हीच परंपरा रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, कारण आमचा असा विश्वास आहे की सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, परंतु देश चालवण्यासाठी सहमती जास्त महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच आमचा असा प्रयत्न असेल की, प्रत्येकाच्या सहमतीने, सर्वांना सोबत घेऊन भारत मातेची सेवा करू,  आणि १४० कोटी देशवासियांच्या आशा - आकांक्षा पूर्ण करू.

आम्हाला सर्वांनो सोबत घेऊन पुढे वाटचाल करायची आहे, संविधानाच्या मर्यादा पाळत सर्वांना बरोबर घेऊन निर्णयांना गती द्यायची आहे. १८ व्या लोकसभेत तरुण खासदारांची संख्या चांगली आहे ही आपल्यासाठीची आनंदाची बाब आहे. आणि जेव्हा आपण १८ बद्दल बोलतो, तेव्हा ज्यांना भारताच्या परंपराविषयी माहित आहेत, जे भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल जाणून आहेत, अशांना माहित आहे की आपल्याकडे १८या अंकाचे मूल्य अत्यंत सात्विक मानले गेले आहे. गीतेमध्येही १८ अध्याय आहेत - त्यातूनच आपल्याला कार्य, कर्तव्य आणि करुणेचा संदेश मिळतो. आपल्याकडील पुराण आणि उपपुराणांची संख्याही १८ आहे. १८ चा मूलांक हा ९  आहे आणि ९ पूर्णतेची हमी देणारा अंक आहे. ९ पूर्णतेचे प्रतीक असेला अंक आहे. आपल्याला वयाच्या १८ व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो. १८ वी लोकसभा ही भारताच्या अमृत काळाची आहे, या लोकसभेची स्थापना हा देखील एक शुभ संकेत आहे.

जे लोक या देशाच्या संविधानाच्या प्रतिष्ठेसाठी समर्पित आहेत, जे लोक भारताच्या लोकशाही परंपरांवर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांच्यासाठी २५ जून हा एक कधीही विसरता येणार नाही असा दिवस आहे. उद्या २५ जूनला भारताच्या लोकशाहीवर काळा डाग लावणाऱ्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताची नवी पिढी हे कधीही विसरू शकणार नाही की, देशाची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली होती. राज्यघटनेचे तीन तेरा वाजवले गेले होते, या देशाचे रुपांतर तुरुंगात केले गेले होते, लोकशाहीव्यवस्था  पूर्णपणे दडपली गेली होती. आणीबाणीची ही ५० वर्षे असा संकल्प करण्याची आहेत, की आपण आपल्या संविधानाचे अभिमानाने रक्षण करत,  भारताची लोकशाही, लोकशाही परंपरांचे संरक्षण करत, देशाचे नागरिक असा संकल्प करतील की, आपल्या देशात जे ५० वर्षांपूर्वी जे घडले होते ज्याने लोकशाहीवर काळा डाग लावला गेला, असे कृत्य करण्याची हिंमत कोणीही करू शकणार नाही. आपण संकल्प करू, जिवंत लोकशाहीचा, आपण संकल्प करू भारताच्या राज्यघटनेने केलेल्या मार्गदर्शनानुसार, सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत.

देशाच्या जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा संधी दिली आहे, हा एक महान विजय आहे, एक भव्य विजय आहे. त्यामुळे आमची जबाबदारीही तीन पटीने वाढली आहे. म्हणून मी देशाच्या जनतेला आश्वासन देतो की, तुम्ही आम्हाला दिलेली ही जी तिसरी संधी आहे त्याचं आम्ही सोनं करू. या आधी दोनदा सरकार चालवण्याचा अनुभव आम्हाला आला आहे. मी देशाच्या जनतेला आश्वासन देतो की,आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही आधीपेक्षा तीन पट जास्त मेहनत करू आणि परिणामांमध्येही तीन पट वाढ करू आणि या संकल्पनेसह आम्ही हा नवीन कार्यभार घेत पुढे जात आहोत.

सर्व माननीय खासदारांकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. मी सर्व खासदारांना विनंती करतो की जनहितासाठी, लोकसेवेसाठी आपण या संधीचा वापर करूया आणि शक्य तितकी पावले जनहितासाठी उचलूया. देशातील जनता विरोधकांकडून चांगल्या कृतीची अपेक्षा करते, परंतु आतापर्यंत जनतेला निराशा मिळाली असली तरी, कदाचित १८  व्या लोकसभेत विरोधक सामान्य नागरिकांसाठी त्यांची भूमिका निभावतील अशी अपेक्षा आहे, विरोधी पक्षाने विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका बजावावी आणि लोकशाहीची प्रतिष्ठा राखावी अशी अपेक्षा आहे आणि मला आशा आहे की विरोधक त्या अपेक्षांना पूर्ण करतील.

सभागृहात सामान्य माणसाची अपेक्षा असते ती चर्चेची, सजगतेची. लोकांना नखरे, नाटक, किंवा गोंधळ नको असतो. लोकांना मुद्दा हवा आहे, घोषवाक्य नको आहेत. देशाला एका चांगल्या आणि जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे आणि मला खात्री आहे की या १८ व्या लोकसभेत विजयी झालेले आमचे खासदार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.


विकसित भारताचा आपला संकल्प पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपण सर्व मिळून ती जबाबदारी पार पाडू, जनतेचा विश्वास आणखी दृढ करू. २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढल्यानंतर हा नवा आत्मविश्वास निर्माण होतो की, भारताला गरिबीमुक्त करण्यात आपण लवकरच यश मिळवू शकतो आणि ही मानवजातीची मोठी सेवा असेल. आपल्या देशातील लोक, १४० कोटी नागरिक कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. आपण त्यांना शक्य तितक्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ही एक कल्पना आहे आणि आमचे हे सभागृह या कल्पनेला वास्तवात आणण्याचा संकल्प करणारे सदन बनेल.  १८वी लोकसभा संकल्पांनी  परिपूर्ण होवो, जेणेकरून सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण होतील.

पुन्हा एकदा, मी विशेषत: नवीन खासदारांना शुभेच्छा देतो, सर्व खासदारांचे अभिनंदन करतो आणि अनेक अपेक्षांसह आपल्याला सर्वांनी मिळून जी  नवीन जबाबदारी दिली आहे ती पूर्ण भावनेने पार पाडूया, याचबरोबर सर्वांना खूप खूप धन्यवाद.