मौलवी मुमताज अली: स्त्री-मुक्ती चळवळीचा आद्य प्रणेता

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
 मौलवी मुमताज अली
मौलवी मुमताज अली

 

मुस्लिम समाजातील पुरोगामी चळवळीचा इतिहास लिहायचा झाल्यास मौलवी मुमताज अलींचे नाव आणि स्त्री-मुक्ती चळवळीतील त्यांचे योगदान यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. १८६०  मध्ये जन्मलेल्या मुमताज अलींचे शिक्षण पारंपरिक रीतीनेच झाले होते आणि त्या शिक्षणातूनच त्यांना मौलवी ही उपाधी प्राप्त झाली होती. एकीकडे धर्मगुरू असलेला हा माणूस स्त्री-मुक्ती चळवळ हे जीवनध्येय मानतो. हाच मुळी एक विरोधाभास आहे; पण ते सत्य आहे. पारंपरिक धार्मिक शिक्षण घेतानासुद्धा त्यांनी आपली चिकित्सक वृत्ती सोडली नव्हती. त्यामुळेच त्यांना, मुस्लिम समाजाचे स्वयंघोषित धार्मिक नेते कुराणातील आदेशांचा सोईस्कर अर्थ लावून समाजावर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा बसविण्याचा दांभिकपणा कसा करीत आहेत याची सतत जाणीव होत होती. सामाजिक बांधिलकी मानण्याचा त्यांचा स्वभावधर्मच असल्यामुळे त्यांना हा दांभिकपणा सलत होता. हा सलच त्यांच्या स्त्री-मुक्ती चळवळीची प्रेरणा होती.

१८९८ मध्ये त्यांनी हुकुकन निस्वॉं म्हणजे स्त्रियांचे अधिकार हे पुस्तक प्रसिद्ध करून मुस्लिम स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडली. या पुस्तकातील विचार इतके क्रांतिकारक होते की सर सय्यद अहमदसारखा उदारमतवादी शिक्षणतज्ज्ञही हडबडून गेला. १८५७  नंतर भारतात ब्रिटिश सत्ता स्थिर झाल्यावर त्यांनी भारतात इंग्रजी भाषा व आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या. हिंदू समाजाने या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आधुनिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मुस्लिम समाजाच्या सनातनी धार्मिक नेत्यांना मात्र या बदलत्या परिस्थितीचा अर्थच कळला नाही. म्हणूनच त्यांनी या आधुनिक शिक्षणाकडे पाठ फिरवून पारंपरिक शिक्षणाची कास धरणे पसंत केले. पण या सनातनी धोरणामुळे मुस्लिम समाजाची एक संपूर्ण पिढीच आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिली. ही परिस्थिती बदलल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही, याची जाणीव सर सय्यद अहमद यांना प्रथम झाली. या जाणीवेतूनच त्यांनी मुसलमानांनी आधुनिक शिक्षण घ्यावे म्हणून प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांचे फलित म्हणून १८७५ मध्ये अंग्लो महॉमेडन कॉलेजची स्थापना झाली. त्यातूनच पुढे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची निर्मिती झाली. सर सय्यद अहमद यांचे हे प्रयत्न निश्‍चितच मुस्लिम समाजाच्या दृष्टीने हिताचे होते. पण तरीही त्यांना सनातन्यांच्या कठोर विरोधाला सतत तोंड द्यावे लागले होते.
 
या पार्श्‍वभूमीवर मौलवी मुमताज अलींचे पुस्तक म्हणजे सनातन्यांना दिलेले प्रचंड आव्हानच ठरणार होते. त्याचा फटका आपल्या शैक्षणिक कार्यालाही बसेल, अशी एक अनामिक भीती सर सय्यद अहमद यांना वाटत होती. म्हणूनच मौलवींच्या हकुकन निस्वॉं या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांचा विरोध होता. तशी विनंतीही त्यांनी मौलवी मुमताज अलींना केली; पण मुस्लिम स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे असिधारा व्रत स्वीकारलेल्या मौलवींना सर सय्यद अहमद यांची विनंती मान्य होण्यासारखी नव्हतीच. सनातन्यांचा आपल्याला विरोध होणार, आपण पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करीत आहोत असे आणि यापेक्षा अधिक गंभीर आरोप पिसाळलेले विरोधक आपल्यावर करतील, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. पण आपल्या ध्येयावर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यामुळे कुठल्याही प्रखर विरोधाला तोंड द्यायची त्यांची तयारी होती. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच त्यांनी म्हटले आहे की, ""या पुस्तकात स्त्रियांच्या अधिकारांविषयी मी जे लिहिले आहे, ते माझ्या प्रदीर्घ चिंतनाचे फलित आहे. काळाच्या ओघात मी माझे अनेक विचार बदलले असतील. पण या विषयांसंबंधीची माझी भूमिका बदलण्याची गरज मला कधीच वाटली नाही. त्याही पुढे जाऊन ते म्हणतात, की "माझ्या या प्रयत्नांमुळे संपूर्ण देशातील केवळ एका मुस्लिम महिलेच्या अधिकारांचे रक्षण करता आले तरी माझ्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे मला वाटेल.'
 
पुरुष श्रेष्ठ आणि सबळ आहे व स्त्रियांनी त्यांचे श्रेष्ठत्व व अधिपत्य स्वीकारूनच वागले पाहिजे, या भ्रामक समजुतीतूनच मुस्लिम समाजाची सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण झाली आहे हे त्यांनी जाणले होते. म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकात पुरुषांच्या श्रेष्ठत्वाला आव्हान दिले. पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे सिद्ध करण्यासाठी सनातनी मंडळी भक्कम युक्तिवाद, उच्च तत्त्वे आणि दैवी आदेशांचा आधार घेतात, हीच एक शोकांतिका आहे, असे मौलवींना वाटत असे. पुरुष आणि स्त्रिया मानव जातीचे भिन्न घटक आहेत; पण एकापेक्षा दुसरा श्रेष्ठ आहे, असे समजणे चूक आहे. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणविशेष आहेत आणि त्यामुळेच जीवनात त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि भूमिका स्वीकाराव्या लागतात, हे मान्य केले तरी त्यापलीकडे जाऊन विचार केला तर अनेक क्षेत्रात पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही आपले कर्तृत्व दाखविले आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक भिन्नतेचा आधार घेऊन पुरुषांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हा दांभिकपणा आहे, असे मौलवींनी आपल्या पुस्तकात नमूद करून ठेवलं आहे.
 
शिक्षण आणि संस्कारांनी धर्मगुरू असलेले मुमताज अली स्त्री-पुरुष समतेच्या संदर्भात वैज्ञानिक दृष्टिकोनातून किती विचार करीत होते याचे पुरावेही त्यांच्या या पुस्तकात सापडतात. स्त्री आणि पुरुषांच्या शरीररचनेत अल्पसा भेद असून स्त्रियांनी शरीरातील काही अस्थी पुरुषांच्या तुलनेने नाजूक असतात हे तत्कालीन वैज्ञानिकांनी सिद्ध केले होते. ते मान्य करूनही मौलवींनी म्हटले आहे की स्त्रियांच्या मेंदूचा विकास व त्यातून स्त्रियांना प्राप्त होणारी बौद्धिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी असल्याचा पुरावा अजून तरी सापडलेला नाही. तेव्हा केवळ शारीरिकदृष्ट्या पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक बलवान आहे व म्हणून तो श्रेष्ठ आहे हा युक्तिवाद स्वीकारणे म्हणजे जंगलातील पशु हे मानवांपेक्षा अधिक बलवान आहेत व म्हणून ते श्रेष्ठ आहेत, असे मान्य करणे होय! मौलवींच्या या युक्तिवादाशी कुणीही सहमत होईल.
 
मौलवी मुमताज अलींनी कुराणातील आदेश व शरीयतच्या म्हणजेच इस्लामी आचारसंहितेच्या तरतुदींचा योग्य आणि उदारमतवादी अन्वयार्थ लावून स्त्री-पुरुष समतेचा व स्त्रियांच्या अधिकारांचा विचार केला आहे. आजच्या पुरोगाम्यांना त्यांची ही भूमिका कदाचित मान्य होणार नाही. कारण समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित परिवर्तनासाठी चळवळ करताना धर्माचा आधार घेण्याची गरज नाही, अशी आजच्या पुरोगाम्यांची भूमिका आहे. हा मतभेदाचा मुद्दा मान्य केला तरी शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील प्रखर सनातनी वातावरणात मौलवी मुमताज अलींनी स्त्री-पुरुष समतेसाठी केलेले प्रयत्न कुणालाही नाकारता येणार नाहीत. परिवर्तनाची चळवळ हा एक अव्याहत चालणारा प्रवास असतो. या प्रवासात अनेक वळणे येतात, अग्रक्रम बदलत असतात. म्हणूनच पूर्वाश्रमींच्या प्रयत्नांची दखल घेऊनच चळवळींची पुढील दिशा निश्‍चित करावी लागते. म्हणून मुस्लिम समाजातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मौलवी मुमताज अलींच्या योगदानाची दखल घेतली पाहिजे. लाहोरच्या शिरकत गाह्‌ या महिला संघटनेने मौलवींच्या मूळ उर्दू ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे व ते इंटरनेटवर उपलब्ध आहे.
 
- अब्दुल कादर मुकादम