अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी फेरनियुक्ती

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 Months ago
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांची फेरनियुक्ती वर शिक्कामोर्तब झाले आहे. भारत सरकारने एका विशेष प्रसिद्धी पत्रकाद्वारे या नियुक्तीची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 'मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजित डोवाल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यांची १० जून २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.'

अजित डोवाल यांचा कार्यकाळ पंतप्रधानांच्या कार्यकायाशी संलग्न असणार आहे म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तोवर अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहणार आहेत.

डोवाल यांच्यासोबतच पिके मिश्रा यांची प्रधानमंत्री यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती देखील पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असेपर्यंत असणार आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीकडून ही माहिती देण्यात आली आहे. अजित डोवल आणि पिके मिश्रा यांच्या फेरनियुक्तीतून पंतप्रधानांचा या दोन्ही अधिकाऱ्यांवर असलेला विश्वास दिसून येतो दिसून येतो.

डोवाल यांना कॅबिनेट दर्जाच्या अधिकाऱ्याचा दर्जा मिळाला असून, तो पूर्वीसारखाच राहणार आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इटलीला जाणार आहेत. येथे ते जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील.

अजित डोवाल यांनी भारताच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असणारे डोवाल हे २०१४ पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. भारताच्या सुरक्षा धोरणावर अजित डोवाल यांची छाप दिसते. भारताच्या अरब देशांसोबतच्या चांगल्या संबंधांसाठी डोभाल यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे जाणकार सांगतात.

अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी होते. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५मध्ये इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले. अजित डोवाल यांचे गुप्तचर यंत्रणेमधील काम वाखाणण्याजोगे होते. १९९९ मध्ये कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

याशिवाय १९८४मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजवली होती. यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

भारतातील दुसरा सर्वोच्च वीरता पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कीर्ती चक्रानेही अजित डोवाल यांना सन्मानित करण्यात आले आहे.