अखेरचा निरोप! अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत जनसागर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामती येथे लोकांची गर्दी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामती येथे लोकांची गर्दी

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर आज (गुरुवारी) बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. बारामतीमध्ये सकाळपासूनच जनसागर लोटला असून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर व्हिक्टरी ग्राउंडवर ठेवण्यात आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते आणि नागरिक रांगेत उभे राहून आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेत आहेत. 'परत या दादा', अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. कुटुंबातील सदस्य, पत्नी सुनेत्रा पवार आणि मुले पार्थ व जय पवार यावेळी उपस्थित आहेत. पवार कुटुंबावर कोसळलेला हा दुकाचा डोंगर पाहून उपस्थितांची मने हेलावली आहेत.

दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर सायंकाळी मोक्षधाम स्मशानभूमीत किंवा त्यांच्या शेतातील नियोजित ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्य सरकारने त्यांच्या सन्मानार्थ ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या काळात कोणताही शासकीय मनोरंजनाचा कार्यक्रम होणार नाही. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

या अंत्यविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते बारामतीत दाखल होणार आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बारामती शहरासह राज्यातील अनेक बाजारपेठा आणि व्यवहार आज स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले आहेत.

बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग करताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. एक कडक प्रशासक, स्पष्टवक्ता आणि विकासकामांचा ध्यास घेतलेला नेता आज काळाच्या पडद्याआड जात आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद असून प्रत्येकजण जड अंतःकरणाने अजितदादांना निरोप देत आहे.