उर्दू साहित्याचे महान अभ्यासक, लेखक, समीक्षक आणि अनुवादक प्रोफेसर सी. एम. नईम
उर्दू साहित्याचे महान अभ्यासक, लेखक, समीक्षक आणि अनुवादक प्रोफेसर सी. एम. नईम (चौधरी मोहम्मद नईम) यांचे ९ जुलै रोजी अमेरिकेतील शिकागो येथे निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने उर्दू साहित्य आणि आंतरराष्ट्रीय विद्वत जगत यांना जोडणारा एक दुवा निखळला आहे. उर्दू भाषा आणि साहित्याला जागतिक पातळीवरील आकादमिक जगतात मानाचे स्थान मिळवून देण्यात नईम यांचे मोठे योगदान आहे.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
सी. एम. नईम यांचा जन्म ३ जून १९३६ रोजी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झाला. लखनऊ विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे त्यांचे शिक्षण झाले. लखनऊच्या सांस्कृतिक वातावरणात त्यांचा उर्दू साहित्याशी पहिला परिचय झाला. इथेच त्यांची उर्दू कविता आणि गद्य यांच्याशी जवळीक निर्माण झाली. पुढे बर्कली विद्यापीठात त्यांनी दक्षिण आशियाई साहित्य आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. याच विषयाने त्यांच्या विद्वत्तेचा पाया रचला गेला.
शिकागो विद्यापीठातील योगदान
इसवी सन १९६१ मध्ये नईम यांनी शिकागो विद्यापीठाच्या दक्षिण आशियाई भाषा आणि सभ्यता विभागात अध्यापन सुरू केले. १९८५ ते १९९१ या काळात त्यांनी या विभागाचे प्रमुखपद भूषवले. २००१ मध्ये इथूनच ते प्रोफेसर एमेरिटस म्हणून निवृत्त झाले.
नईम यांच्या अध्यापनाने आणि संशोधनाने उर्दू भाषेला पाश्चिमात्य जगात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी लिहलेले ‘इंट्रोडक्टरी उर्दू’ हे दोन खंड इंग्रजी माध्यमातून उर्दू शिकवण्याचे प्रमाणभूत पुस्तक मानले जाते. याशिवाय त्यांच्या ‘उर्दू रीडर’ आणि ‘रीडिंग्ज इन उर्दू: प्रोज अँड पोएट्री’ यांसारख्या पुस्तकांनी उर्दू शिक्षणाला नवे परिमाण दिले.
नईम यांचे साहित्यिक योगदान
नईम यांनी १९६३मध्ये ‘महफिल’ (आता ‘जर्नल ऑफ साउथ एशियन लिटरेचर’) आणि १९८१ मध्ये ‘अॅन्युअल ऑफ उर्दू स्टडीज’ या नियतकालिकांची स्थापना केली. या नियतकालिकांनी उर्दू साहित्याला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांनी उर्दू कविता, विशेषतः मर्सिया आणि समलैंगिक प्रेम यांसारख्या थीम्सवर सखोल लेखन केले. त्यांचे ‘उर्दू टेक्स्ट्स अँड कॉन्टेक्स्ट्स’ (२००४) हे निवडक निबंधांचे संकलन उर्दू कवितेवर केंद्रित आहे. या पुस्तकातून त्यांचे वैविध्यपूर्ण संशोधनाची झलक दिसते.
त्यांनी मीर तकी मीर यांच्या ‘जिक्र-ए-मीर’ या आत्मचरित्राचा आणि नझीर अहमद देहलवी यांच्या ‘तौबा-तुल-नुसूह’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला. याशिवाय, कुर्रतुलऐन हैदर यांच्या ‘ए सीझन ऑफ बेट्रायल्स’ आणि हरिशंकर परसाई यांच्या ‘इन्स्पेक्टर मतादीन ऑन द मून’ या पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले. उर्दू आणि हिंदी साहित्य पाश्चिमात्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे हे कार्य महत्त्वाचे ठरले.
नईम यांनी ‘अॅम्बिग्युइटीज ऑफ हेरिटेज: फिक्शन्स अँड पोलमिक्स’ (१९९९) आणि ‘अ किलिंग इन फेरोझेवाला: एसेज/पोलमिक्स/रिव्ह्यूज’ (२०१३) यांसारखी पुस्तकेही लिहिली. त्यात त्यांनी उर्दू साहित्य आणि दक्षिण आशियाई संस्कृतीवरील मुलगामी चिंतन केले. ‘उर्दू क्राइम फिक्शन, १८९०-१९५०: अॅन इन्फॉर्मल हिस्ट्री’ या त्यांच्या अलीकडील पुस्तकात उर्दूतील गूढकथांवरील महत्त्वाचे पुस्तक आहे. निवृत्तीनंतर त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला आणि पूर्णत्वास नेला.
साहित्यातून ऐतिहासिक आणि सामाजिक संसोधन
उर्दू साहित्याला ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भात समजून घेण्यावर नईम भर दिला. त्यांनी अशरफुन्निसा बेगम (१८४०-१९०३) यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद केला. त्या लाहोरच्या व्हिक्टोरिया गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. याशिवाय, त्यांनी मुहम्मदी बेगम यांच्यावरही संशोधन केले. त्या उर्दूतील पहिल्या महिला संपादक होत्या. १८९८ मध्ये ‘तहजीब-ए-निसवां’ या साप्ताहिकाची त्यांनी स्थापना केली होती. उर्दू साहित्यातील महिलांच्या योगदान अधोरेखित करणारे हे सर्वांत मोलाचे संशोधन मानले जाते.
नईम यांनी उर्दू पत्रकारिता, साहित्यिक चळवळी आणि सामाजिक बदल यांवरही विपुल लेखन केले. उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा नसून, ती संमिश्र संस्कृतीचे प्रतीक आहे, असे ते मानत. त्यांनी ‘जश्न-ए-रेख्ता’ आणि ‘दास्तानगोई’ यांसारख्या आधुनिक उपक्रमांचे कौतुक केले, परंतु लखनऊ, पाटणा किंवा भोपाळसारख्या शहरांपर्यंत त्यांचा प्रभाव मर्यादित असल्याचेही त्यांनी प्रामाणिकपणे नमूद केले होते.
वैयक्तिक जीवन आणि आठवणी
नईम यांनी बाराबंकीतील बालपण आणि इसवी सन १९४७ च्या पाकिस्तान निर्मितीच्या आठवणी ‘अॅम्बिग्युइटीज ऑफ हेरिटेज’ मध्ये मांडल्या आहेत.
१९८९मध्ये पॅलेस्टाइनला दिलेल्या भेटीचे त्यांचे वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यातून त्यांच्या संवेदनशील मनाची आणि मानवतावादी दृष्टिकोनाची झलक मिळते. त्यांनी आपल्या संशोधनात नेहमीच सत्य आणि प्रामाणिकपणावर भर दिला.
पुरस्कार आणि मानमर्ताब
नईम यांना २००३मध्ये नवी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया येथे आणि २००९ मध्ये शिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडी येथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. २००५ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ ‘अ वाइल्डरनेस ऑफ पॉसिबिलिटीज: उर्दू स्टडीज इन ट्रान्सनॅशनल पर्स्पेक्टिव्ह’ हा निबंधसंग्रह प्रकाशित झाला. त्याचे संपादन कॅथरीन हॅन्सन आणि डेव्हिड लेलीव्हेल्ड यांनी केले होते. नईम यांना ‘उर्दू अभ्यासाचा अग्रदूत’ आणि ‘सिलसिला-ए-नईमिया’चे जनक संबोधले गेले.
नईम यांचा वारसा
नईम यांच्या निधनाची वार्ता पसरल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कार्याला श्रद्धांजली वाहिली. ‘त्यांचे लेखन त्यांना नेहमी जिवंत ठेवेल,’ असे इतिहासकार इरफान हबीब यांनी म्हटले.
उर्दूला केवळ भाषा म्हणून नव्हे, तर संस्कृती, इतिहास आणि मानवी भावनांचे माध्यम म्हणून मांडण्याचे मोठे कार्य नईम यांनी केले. त्यांनी केलेले संशोधन आणि अनुवाद, त्यांनी चालवलेली नियतकालिके यांनी उर्दू साहित्याला जागतिक पातळीवर पोहोचवले. त्यांनी आकादामिक जगतात उर्दूला मानाचे स्थान मिळवून दिले.
गंगा-जमनी संस्कृती जपणाऱ्या जुन्या जाणत्या विद्वानांपैकी एक असलेले नईम यांचे लेखन आणि विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील यात शंका नाही.
- समीर शेख