बाबूमियाँ बँडवाले : हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले महान स्वातंत्र्यसैनिक

Story by  Shamsuddin Tamboli | Published by  sameer shaikh • 8 Months ago
बाबूमियाँ बँडवाले
बाबूमियाँ बँडवाले

 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे पहिले अध्यक्ष, महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असणारे स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले यांचा जन्म नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे ५ सप्टेंबर १९०५ रोजी झाला. आज त्यांची एकशेअठरावी जयंती आहे. अनेकांच्या विस्मरणात गेलेले, अनेकांना माहीत नसणारे आणि धार्मिक सौहार्दाची सर्वाधिक गरज असणाऱ्या आजच्या काळात  प्रेरक ठरू शकणारे बाबूमियाँ बँडवाले यांचे व्यक्तित्व समजून घेणे अनेकार्थाने महत्त्वाचे आहे. 

बाबूमियाँच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची होती. ते लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. या प्रतिकूल परिस्थितीमुळेच त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. कसेबसे चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षकदिनी जन्म झालेल्या बाबूमियाँनी लोकशिक्षकाची भूमिका घेऊन आपले आयुष्य समाज- शिक्षणासाठी खर्च केले. एक आदर्श कार्यकर्ता, समाजशिक्षक म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजप्रबोधनाच्या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 

वयाच्या दहा-बाराव्या वर्षीच कुटुंबाचा भार पेलण्याची व त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी बाबूमियाँवर आली. शाळा सुटल्यानंतर अगदी लहान वयात त्यांनी श्रीगोंदे गाव ते श्रीगोंदे रेल्वे स्टेशनपर्यंत छकडा चालवण्याचा व्यवसाय केला. उदरनिर्वाहासाठीच आपले जन्मगाव सोडून सोहराब मोदी दिग्दर्शित ‘खून-ए-नाहक’ या नाटकातही त्यांनी स्त्री-भूमिका केली. हे नाटक म्हणजे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे उर्दू रूपांतर होते. नंतर नाटक हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र बनले. या ठिकाणी ते अनेक वर्षे रमले. 

दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले. या कालावधीत त्यांनी ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे अनेक प्रयोग केले. हजारो रुपये उभारले आणि हे पैसे त्यांनी भारताच्या संरक्षणनिधीला दिले. एक मुस्लिम तरुण पाकिस्तान- विरुद्धच्या युद्धात लढणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी असा निधी उभारण्यासाठी महाराष्ट्रभर नाटकाचे प्रयोग करतो, ही कल्पनाच आज अनेकांना अद्‌भुत अशी वाटेल. या नाटकाचा आणखी एक विशेष म्हणजे, त्यांनी स्वत: शिवाजीमहाराजांची भूमिका केली आणि त्यांच्याच पत्नीने सोयराबाईची भूमिका केली. त्या काळात ग्रामीण भागात आपल्या पत्नीला रंगमंचावर आणणारे बाबूमियाँ हे निश्चितच क्रांतिकारी म्हणावे लागतील. 

या नाटकामध्ये त्यांच्या मुलानेही भूमिका केली होती. एकाच कुटुंबातील तिघांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक नाटक राज्यभर सादर केले. आपल्या कुटुंबाला नाट्यकंपनी करणारे आणि शिवाजीमहाराजांचा गौरव सांगणारे- पाकिस्तानविरोधी निधी उभारणारे एक मुस्लिम कुटुंब आजच्या अनेक प्रश्नांचे सडेतोड उत्तर ठरू शकते. त्या काळात भाई वैद्य हे पुण्याचे महापौर होते. भाई वैद्य आणि हमीद दलवाई हे नाटक पाहण्यासाठी श्रीगोंदे येथे मुद्दाम गेले होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीच त्यांनी वाद्यपथकामध्ये वाजंत्री वाजविण्याचेही काम केले आहे. पुढे काही वर्षांनंतर त्यांनी स्वत:चे ‘बाबू ब्रास बँड’ वाद्यपथक स्थापन केले. यामुळेच त्यांचे नाव ‘बँडवाले’ झाले. 

हे सर्व पोट भरण्यासाठी करावे लागत असले तरी, त्यांचे नाट्य-अभिनय-संगीत यांवर प्रेम होते. ‘इस्लामला अमान्य आहे’ असे सांगत असतानाही बाबूमियाँनी आपल्या इबादतबरोबरच या ‘साधने’वरही प्रेम केले. महात्मा गांधींनी पुकारलेल्या ‘असहकार’ आणि ‘चले जाव’ चळवळीतही बाबूमियाँनी उडी घेतली. ९ जानेवारी १९४१ रोजी त्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ९ ऑगस्ट १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीतही स्वत:ला अटक करून घेतली. येरवडा तुरुंगात त्यांना एकवीस महिने कारावास भोगावा लागला. या कालावधीत त्यांचा रावसाहेब पटवर्धन यांच्याशी संपर्क आला. त्यांच्याही विचारांचा प्रभाव बाबूमियाँवर पडला. 

तुरुंगात असतानाच बाबूमियाँना कावीळ झाली. ते आजारी पडले. तुरुंगाधिकाऱ्याने त्यांच्या औषधोपचाराकडे दुर्लक्ष केले. त्यांची प्रकृती गंभीर झाली, तेव्हा स्वत: रावसाहेब पटवर्धनांनी त्याविरुद्ध आवाज उठवला म्हणून बाबूमियाँवर औषधोपचार झाले. बाबूमियाँ नेहमी म्हणत, ‘मला मरणाच्या दाढेतून परत आणण्याचे सर्व श्रेय रावसाहेबांचे आहे.’ आजच्या काळात बाबूमियाँ-रावसाहेब यांचा स्नेह आणि कृतज्ञता यांसारखी उदाहरणे शोधावी लागतील. 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल १७ ऑगस्ट १९७२ रोजी बाबूमियाँना भारत सरकारतर्फे ताम्रपट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र स्वातंत्र्यसैनिकाला मिळणाऱ्या सर्व सवलती नाकारल्या. कोणत्याही प्रकारची पेन्शन, बस-रेल्वे पास, जमीन त्यांनी घेतली नाही. मी त्यांना याचे कारण विचारले तर म्हणाले, ‘‘आम्ही देश स्वतंत्र व्हावा म्हणून देशाची- भूमीची सेवा केली, स्वत:ला काही मिळावे म्हणून नाही.’’ स्वत:ची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या या स्वातंत्र्यसैनिकाने सर्व सवलतींचा त्याग करावा, यांसारखा आदर्श कोणता असू शकतो? 

बाबूमियाँ नेहमीच सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा व राजकारण यांपासून दूर राहिले. एक स्वातंत्र्यसैनिक, चारित्र्यातील पारदर्शकता, लोकप्रियता आणि समाजसेवा विचारात घेऊन काँग्रेसने त्यांना विधानसभा आणि लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचे जाहीर केले. मात्र या सच्च्या कार्यकर्त्याने अतिशय विनम्रपणे त्याला नकार दिला. राजकारणापासून दूर राहण्याचे व्रत स्वीकारले. परंतु मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेविषयीची बातमी वाचून ते पुण्यातील साधना कार्यालयात आले. तेव्हा म्हणजे२२ मार्च १९७०रोजी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद केला. त्यांची मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 

एक नि:स्पृह, निर्मळ आणि पारदर्शक व्यक्तिमत्त्व असणारे बाबूमियाँ हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे तसे दुसरे अध्यक्ष. मंडळाच्या स्थापनेवेळी पुण्यात इजाज शेख यांना अध्यक्ष करण्यात आले, मात्र मंडळाचा विस्तार पुणे- मुंबई या क्षेत्राबाहेर जाऊन राज्यात होत असताना बाबूमियाँ हे मंडळाचे अध्यक्ष झाले. मंडळाच्या सुरुवातीच्या काळात गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक व चारित्र्यसंपन्न असे बाबूमियाँ हे अध्यक्ष म्हणून उपलब्ध होऊ शकले, याचा हमीदभार्इंना सार्थ अभिमान आणि आनंद होता. सुरुवातीच्या काळातील एकूणच प्रतिकूलता, विरोध असताना दलवार्इंना सोबत देणे म्हणजे तळहातावर विस्तव घेण्यासारखेच होते. तसे धाडस बाबूमियाँनी दाखवणे, हा त्यांच्या स्वभावाचा भागच होता. 

दलवार्इंनंतरच्या काळातील अनेक उपक्रमांत त्यांचा पुढाकार होता. शहाबानो प्रकरण, तलाक मुक्ती मोर्चा परिषदांचे त्यांनी नेतृत्व केले. निधनापूर्वी काही दिवस वय आणि वृद्धापकाळ विचारात घेऊन ते या पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. बाबूमियाँचा सहवास लाभला, त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच. मला आठवतं- हमाल भवन येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची निवासी शिबिरे होत असत. तसंच कोल्हापूर, मुंबई येथील शिबिरातही एखादा नवा तरुण कार्यकर्ता भेटला की, बाबूमियाँ त्याची ओळख करून घेऊन संवाद करीत. कार्यकर्ता हिंदी-मराठीमिश्रित उर्दू भाषेत बोलायला लागला की, ते म्हणत, ‘आपको मराठी आती ना- तो फिर मराठी मे बोलो.’ मुसलमान उर्दूला मातृभाषा समजतात; मात्र हा समज कसा चुकीचा आहे, हे बाबूमियाँ पटवून देत असत.

रयत शिक्षण संस्था आणि बाबूमियाँ यांचा फार जवळचा संबंध होता. कर्मवीर भाऊराव पाटील १९५३मध्ये श्रीगोंद्याला आले होते, तेव्हा ते म्हणाले, ‘‘बाबूमियाँ, तुम्ही स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतले, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता आपल्याला समाज घडवायचाय, त्यासाठी शिक्षणाविषयी काम करावं लागणार आहे. तुम्ही आता शिक्षणाकडे लक्ष द्या.’’ या चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या बाबूमियाँनी कर्मवीरांना दिलेला शब्द पाळला आणि नगर जिल्ह्यात शिक्षणसंस्था उभारण्यात पुढाकार घेतला. ७ सप्टेंबर १९९७ रोजी श्रीगोंदे येथील नागरिकांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. 

बाबूमियाँ हे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते- ते एक सच्चे मानवतावादी कार्यकर्ते होते. त्यांनी गांधीवादाचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. खादीचे कपडे, गांधी टोपी, धोतर हा त्यांचा कायमचा पोशाख. सामाजिक कृतज्ञता निधीमार्फत पु.ल.देशपांडे यांच्या हस्ते जीवनगौरव देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आले होते. बाबूमियाँचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या वाढदिवशी काही तरी प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यायचे. एका वाढदिवशी घरातील बुरखापद्धत बंद केली. बकरी ईदच्या दिवशी देशासाठी वैयक्तिक सत्याग्रह करणे, १९५५मध्ये चाली-रीतींना फाटा देण्यासाठी मुलाच्या लग्नात वधू-वरांना स्टेजवर आणून बसवणे, स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीचे स्थान देणे, इत्यादी. 

त्यांची सांस्कृतिक समज व्यापक होती. सर्वधर्म सन्मान आणि धर्मनिरपेक्ष संस्कृती त्यांनी आचरणातून दाखवली. ती त्यांची जीवनपद्धत होती. ज्या पद्धतीने ग.प्र.प्रधान सरांनी आपल्या आजारी पत्नीची सेवा केली, तशीच सेवा बाबूमियाँनी त्यांच्या काळात आपल्या वृद्ध-आजारी पत्नीची करून एक नवा आदर्श घालून दिला. मृदू भाषा पण कणखरपणा हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. जन्माने मुसलमान, घरातील लोक मांसाहार करायचे; पण बाबूमियाँनी आयुष्यभर शाकाहारी राहण्याचे व्रत पाळले. ते त्याग, सेवा, संयम याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचे जीवन हे कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभासारखे होते. ८ डिसेंबर १९९७ रोजी त्यांचे निधन झाले. त्या वेळी त्यांचे वय ९२ वर्षे होते. 

‘दर्दे दिल के वास्ते पैदा किया इन्सान को 
वरना ताअत के लिए कुछ कम नही फरिश्ते’ 

म्हणजेच ईश्वराने मानवाला दया, परोपकार, मानवता याच्यासाठी निर्माण केले. केवळ त्याची पूजा-अर्चा करण्यासाठी तर त्याच्याजवळ देवदूतांची कमी नाही. हा शेर व त्याचा अर्थ बाबूमियाँचे संपूर्ण जीवनसार प्रकट करणारा आहे. आजच्या धर्मांध, धर्मद्वेषी व संशयाच्या अंधारमय वातावरणात बाबूमियाँ हे प्रकाशाचे अस्तित्व दाखवणारी पणती आहे. ही पणती सर्व अंधार दूर करू शकणार नाही, मात्र प्रकाशाचे अस्तित्व निश्चितच प्रकट करते. 

- डॉ. शमसुद्दीन तांबोळी

(लेखक माजी प्राध्यापक असून मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत. पूर्वप्रसिद्धी - साधना साप्ताहिक (१० सप्टेंबर २०१६))